ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच व्यापक प्रमाणात जनजागृतीही केली जात आहे. विविध प्रकारचे प्रसिद्धी साहित्य तयार करून त्याद्वारे लोकजागृतीचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिल्हा परिषदेने पोतराज ही ध्वनी चित्रफीत प्रदर्शित केली असून हा पोतराज कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी पाळावयाचे नियम सांगत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क कक्ष (सामान्य प्रशासन विभाग) माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह, ग्रामपंचायत, महिला व बालविकास, शिक्षण आदी विभागाचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. खबरदारीच्या उपाययोजनासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे कामही नियमितपणे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधी दवंडी पिटण्याचा प्रयोग साकारण्यात आला.
आता गावोगांवीं चाबूक अंगावर मारत भिक्षूकी करणारा पोतराज सज्ज झाला असुन गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती सांगत आहे. अशा स्वरूपाच्या या ध्वनीचित्रफीतीद्वारे गावांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करत आहे. यासाठी गर्जा प्रतिष्ठान मुरबाड या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. या चित्रफितीची निर्मिती हि गर्जा प्रतिष्ठान या संस्थेने केली असून लेखन योगेंद्र बांगर व दिग्दर्शन नितेश मंगल डोंगरे यांनी केले आहे. समीर खुटारे या मुरबाडच्या मातीतील सुप्रसिद्ध कलावंताने पोतराजाची भूमिका साकारली आहे. या चित्रफितीचे छायाचित्रण संदीप देशमुख,वेशभूषा भूषण मोरे,रुपेश खाटेघरे यांनी केले आहे. रंगभूषा, वैजयंता डोंगरे तर निर्मिती साहाय्य सचिन थोरात, संदीप खरे यांनी केले आहे.