
समर्थ रामदासस्वामी आणि शिवाजी महाराज या दोघांचीही कुलस्वामिनी तुळजापूरची भवानीदेवी आहे. दोघांच्या कुलपरंपरेत चालत आलेली ही भवानीमातेची उपासना हा कदाचित योगायोगाचा भाग असू शकेल. तथापि दोघांची विचार करण्याची पद्धत, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीची तळमळ, प्रयत्न, हिंदू संस्कृतीचा अभिमान, सामर्थ्य, चतुरस्रता, विवेक, लोकसंग्रह, प्रतिकाराची तयारी या गुणांतील त्यांच्यातील साम्य पाहिले म्हणजे ही भवानीमातेची कृपा असा प्रत्यय येतो. दोघांनाही आपल्या कुलस्वामिनीविषयी आदर आणि विश्वास होता. संवादसमयी व युद्धप्रसंगी शिवाजी महाराज भवानीचे स्मरण करत. त्यांच्या तलवारीचे नाव ‘भवानी’ होते, हे सर्वांना माहीत आहे. समर्थांनी वेळोवेळी भवानीमातेची आराधना केली आहे. तुळजाभवानी मातेची पाच-सहा स्तोत्रे स्वामींनी लिहिल्याचा उल्लेख मागे आला आहे. शक्तिरुपाने विराजमान झालेली ही देवी त्रिकाल प्रकट होऊन भक्तांना वर, आशीर्वाद देणारी आहे. प्रभू रामचंद्रांच्या काळात तिने श्रीरामांना दर्शन दिले होते व कार्यसिद्धीसाठी वर दिला होता. त्याचे वर्णन रामदासांच्या पहिल्या स्तोत्रात आले आहे, ज्यांनी धर्मस्थापना केली आणि न्यायनीतीचे धडे ज्यांच्यापासून सुरू झाले असे राम-लक्ष्मण सीताशोधार्थ रानावनातून पायी भटकत होते. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, अशाप्रसंगी भवानीमाता तेथे अकस्मात प्रकट झाली. ही रुपलावण्यसंपन्न युवती कोण? असा दोघांनाही प्रश्न पडला. ही त्रैलोक्यजननी आहे, हे रामांनी ओळखले तरी पार्वतीचे, लक्ष्मीचे सौंदर्य मुखावर विलसत असलेली ही देवी कोण, असा प्रश्न त्यांनी तिला केला.
‘कैंची तू कोण? कोण तू काई?
नाम कोणते तुझे॥’
त्यावर उत्तर देताना ही
त्रैलोक्यजननी म्हणाली -
म्हणे रे मीच तुकाई।
जा तुम्हा वर दिधला।
मनाच्या कामना होती।
सीताशुद्धी करा तुम्ही॥
यावेळी भवानीमातेने आपले नाव ‘तुकाई’ असे सांगितले. ही आदिमाया, आदिशक्ती महाराष्ट्रातील चार शक्तिपीठांमध्ये वेगवेगळ्या नावाने स्थित आहे. तुळजापूरच्या भवानीला ‘तुकाई’ म्हणतात. यावर ल. रा. पांगारकरांनी टिप्पणीत लिहिले आहे की, “जेव्हा रामलक्ष्मणांनी त्या देवीला ‘तू कोण?’ असा प्रश्न केला, तेव्हा त्या आदिमायेने ‘मीच आहे तू-काई’ असा प्रश्न केला. त्यातील अर्थ असा होता की, देवीला सांगायचे होते सर्व कर्तृत्व माझे आहे. मी शक्तिरुपाने वावरत असताना तू कोणी नाहीस. तू निमित्तमात्र आहेस, असे समज.” नंतर त्या आदिमायेने “तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही सीतेचा शोध लावाल,” असा वर दिला. तेथून तिने लक्ष्मणाला लंका दाखवली, असे स्वामींनी स्तोत्रात म्हटले आहे. तेव्हापासून ‘रामवरदायिनी’ अशी तिची ओळख झाली. ही आदिशक्ती पहिल्यापासून तुळजापूरला आहे. तेथून ती आता प्रतापगडावर आली, असे समर्थांनी म्हटले आहे. कुलदेवी तुळजाभवानीच्या दुसर्या स्तोत्रात स्वामींनी तिचा उल्लेख आदिशक्ती, आदिमाया असा केला आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती ध्यानात घेऊन या स्तोत्रात स्वामींनी शक्तीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ही तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे. तिनेच आमचे कुळ पाळले आहे. अनेक कठीण प्रसंगांतून आमचे रक्षण केले आहे. शक्ती हे तिचे खास आहे. माणसाला शक्तीने सर्व काही मिळणार, हे ध्यानात ठेवावे.
शक्तीने पावती सुखे।
शक्ती नसता विटंबना।
शक्तीने नेटका प्राणी।
वैभव भोगता दिसे।
कोण पुसे अशक्ताला।
रोगीसे बराडी दिसे॥
शक्ती तो सर्वही सुखे।
शक्ती आनंद भोगवी॥
या जगात नित्याच्या व्यवहारासाठीही शक्ती ही अत्यंत आवश्यक आहे. ही शक्ती देहबल, बाहुबल, मानसिक-भावनिक बल, विचारपूर्वक कार्य करायला लावणारे बुद्धिबल, न्यायनीतीने वागणारे चारित्र्यबल या अनेक रुपात प्रगट होते. या सर्व बलांची माणसाला आवश्यकता असते. ही शक्ती किंवा बल माणसाच्या ठिकाणी नसेल, तर त्याला मानहानी सहन करावी लागते. ज्याच्या ठिकाणी अशी शक्ती नाही, अशा अशक्ताला कोणी विचारीत नाही. या कारणाने ही सर्व प्रकारची शक्तीच माणसाला सर्व सुखे मिळवून देते. शक्तीने माणसाला आनंद उपभोगता येतो. ‘शक्तिवीण दरिद्रता’ हे सदैव लक्षात ठेवावे. सामाजिक पातळीवरही या शक्तीचे महत्त्व आहे. तरीही समाजकारण आणि राजकारण करताना शक्तीबरोबर युक्तीचाही विचार करावा लागतो. देहबलासोबत बुद्धिबल असणे जरुर आहे. त्यानेच यशप्राप्ती होते.
शक्तीने मिळती राज्यें।
युक्तीनें यत्न होतसे।
शक्ति मुक्ति जयें ठायी।
तेथे श्रीमंत धावती॥
राज्याचा विचार करता जेथे शक्ती आणि बुद्धी दोन्ही असतील, तर तेथे वैभवप्राप्ती होते. शिवरायांच्या ठिकाणी शक्ती व बुद्धी दोघांचाही संगम होता. तलवारीच्या शक्तीने त्यांनी शत्रूंना नामोहरम केले आणि बुद्धिवंतांचा आदर करून लौकिक मिळवला. त्यामुळे वैभव त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. प्रजा सुखी होती. शक्तीचे बळ आणि युक्तीचे बळ एकवटले, तर परमात्मा तेथे असतो, असे स्वामींचे मत आहे. भगवद्गीतेतही भगवंतांनी असाच अभिप्राय व्यक्त केला आहे.
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र
पार्थो धनुर्धरः।तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम्॥
धनुर्धारी युद्धविशारद अर्जुनाच्या साथीला युक्तीच्या चार गोष्टी सांगणारा योगेश्वर कृष्णा असेल, तर तेथे वैभव, विजय, ऐश्वर्य, नीती, बुद्धी असणारच. स्वामींचे हे वैशिष्ट्य आहे की, कुलदेवी तुळजाभवानीची स्तुतिस्तोत्रे लिहीत असतानाही सदैव त्यांच्यासमोर तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. आदिशक्ती भवानीमातेची उपासना तर केली पाहिजे. पण, तचे शक्तिशाली प्रेरणादायी रूप सतत स्मरणात ठेवून राज्यकारभार केला पाहिजे, असे स्वामींचे सांगणे असे. स्वामींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखादा विषय चर्चेलाघेतला की, त्यातील सर्व बारकावे तपशील स्वामी समजावून सांगतात. दासबोधात असे अनेकदा घडते, तसेच येथेही तुळजाभवानी स्तोत्राच्या निमित्ताने राजकारणातील बारकावे ते सांगतात. ‘शक्तीने मिळती राज्यें’ असे स्वामी म्हणाले खरे, पण मिळालेले राज्य वाढवणे किंवा चांगले चालवणे यासाठी इतर काही गोष्टींची आवश्यकता असते, असे या स्तोत्राधारे स्वामींनी सांगितले आहे- राजकारणात शक्ती-युक्ती लोकांना राजी राखणे आणि योग्य ती खबरदारी व सावधानता यांकडे लक्ष द्यावे लागते. राजकारणात फितुरी करणार्यांपासून सावध राहावे लागते. या फितुरीखोरांंमुळे राज्ये बुडल्याची उदाहरणे आहेत.
‘फितव्याने बुडती राज्यें।
खबर्दारी असेचिना ॥
तसेच राजाचा आपल्या सेवकांवर सैनिकांवर पूर्णपणे ताबा असला पाहिजे.
सेवका आवरूं नेणे।
तो राजा मूर्ख जाणिजे।
मूर्खाचे राज्य राहेना।
कोणाचे कोण ऐकतोे॥
ज्याला सेवक किंवा सैन्य ताब्यात ठेवता येत नाही, अशा मूर्खाचे राज्य कसे राहील, राज्य करायचे म्हणजे ते युक्तीशिवाय करता येणार नाही, हे जरी खरे असले तरी त्या युक्तीमागे शक्ती असली पाहिजे म्हणून राज्यासाठी शक्ती हे प्रमाण आहे.
युक्तीला पाहिजे शक्ती।
तस्मात् शक्ती प्रमाण हे॥
शक्तीला दिलेले प्रामाण्य हे रामदासांचे तत्त्वज्ञान आहे. या स्तोत्राच्या शेवटी स्वामी म्हणतात की, “मी तिला शोधून काढले आहे. सर्व प्राणिमात्रांमध्ये ती अखंड खेळते आहे. ही आदिशक्ती प्रसन्न व्हावी म्हणून मोठमोठे सम्राट हिचे दास्य घेऊ इच्छितात. माझे हे प्रचितीचे, अनुभवाचे बोध आहेत. शिवाजी महाराजांसारखा महिंद्र हिच्या पायी न्रम होतो.”
बोलता भवानीमाता।
महिंद्र दास्य इच्छिती॥
बोलणे हे प्रचितींचे।
अत्यथा वाडगे नव्हें॥
-सुरेश जाखडी
7738778322