घानातील विचारांची घाण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2021   
Total Views |

ss_1  H x W: 0
 
 
 
‘त्या’ गटाच्या शारीरिक, मानसिक गरजा नाकारणे आणि त्यांना असुरक्षित वाटून देणे हा शुद्ध क्रूरपणा. काही वर्षांपूर्वी भारतात तृतीयपंथींना ‘माणूस’ म्हणून सगळेच हक्क मिळण्याचा कायदा झाला. पण, जगाच्या पाठीवर काय? तर जगाच्या पाठीवर आजही तृतीयपंथींना माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारले आहेत. त्यामुळे या तृतीयपंथींचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा सर्रास परवानाच विकृतांना दिल्यासारखे आहे. नुकतीच घानामध्ये एक घटना घडली. तिथे तृतीयपंथींच्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी एक समाजकेंद्र उभारले गेले. पण, त्या केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली आणि ते केंद्र बंद केले. का तर? म्हणे या केंद्रात तृतीयपंथी होते, तसेच ते एकमेकांशी शरीरसंबंध ठेवायचे. हे ख्रिस्ती धर्माच्या पालनाप्रमाणे पाप आहे. तसेच घानामध्ये स्त्री-पुरूष यांचाच विवाह कायद्याने वैध असून इतर समलिंगी किंवा तृतीयपंथींचे विवाह हे सजायुक्त (शिक्षेस पात्र)आहेत.
 
 
तसे पाहायला गेले तर एका अहवालानुसार, मध्य-पूर्वेतल्या मुस्लीम देशासोबतच घाना या आफ्रिकन देशात तृतीयपंथी आणि समलिंगी शरीरसंबध ठेवणाऱ्यांसाठी जगणे मुश्किलच आहे. घानाचा राष्ट्रीय धर्म ख्रिश्चन. या देशावर ब्रिटिशांचे पारतंत्र्य होतेच. त्यामुळे घानावासीयांना आपला मूळ धर्म सोडावा लागला. ७२ टक्क्यांच्या जवळपास लोकसंख्या ख्रिश्चन झाली. घानाने आपला राष्ट्रीय धर्म ख्रिश्चनच ठेवला. त्यामुळे बायबल आणि संबंधित धार्मिक साहित्य यांचा पगडा घानावासीयांवर आहे. घानामध्ये तृतीयपंथी आणि समलिंगी शरीरसंबंध ठेवणाऱ्यांसाठी तिरस्काराची भावना आहे. म्हणूनच मानवी हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांनी घानावर लक्ष केंद्रित केले आहे. घानामधील स्त्री आणि पुरुषांसारखेच तृतीयपंथींना हक्क मिळावेत, त्यांना इतरांसारख्याच मूलभूत सुविधा आणि संधी मिळाव्यात, यासाठी जगभरातील अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. पण, तरीही घानामधील प्रशासन, धर्मसंस्था आणि नागरिक यांबाबत अजिबात सकारात्मक नाही. कारण काय, तर बायबलमध्ये केवळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी लिहिले आहे. आमच्या धर्मात सांगितले आहे की, पुरुष एखाद्या पुरुषासोबत महिलेसारखं राहणे हे नैसर्गिक नाही. त्यामुळे हे संबंध सजेसाठीच आहेत. समलिंगी शरीरसंबंध ठेवणारे व्यक्ती हे सैतानच असतात. याचाही आधार म्हणून ते बायबलच देतात.
 
 
अर्थात, काय खोटे? काय खरे? हे त्यांचे त्यांनाच माहीत. काहीजण बायबल त्यातही हिब्रू आणि रोमन बायबलचा दाखला देत, तृतीयपंथी आणि समलिंगी शरीरसंबंध ठेवणाऱ्यांना दोषीच ठरवतात. यासाठी हे लोक बायबलचे उतारेही देतात. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, काही लोक बायबलच्या वचनांचा गैरअर्थ लावत आहेत. बायबलमध्ये असे काहीही लिहिलेले नाही. बायबलमध्ये काय लिहिले किंवा काय लिहिले नाही, याहीपेक्षा बायबलचा आधार घेऊन धर्माची ग्वाही देऊन बरेच काही घडत असते. जसे घटस्फोट घेणे हे धर्माने अधम कृत्य आहे. मग पती-पत्नीने एकमेकांच्या जीवनाचा नरक केलेला असू दे, पण धर्माच्या नियमानुसार घटस्फोट घेणे वाईटच! दुसरीकडे एखाद्या मुलीवर महिलेवर बलात्कार झाला आणि तिला गर्भपात करायचा असेल, तर कट्टर ख्रिश्चन गर्भपातास नकारच देतात. कारण, गर्भपात करणे हेदेखील ख्रिश्चनांच्या मते गुन्हा आहेच. या अशा प्रकरणाची कितीतरी उदाहरणे देता येतील. आधुनिक जगात आणि समाजजीवनात असे महिलांवर अन्याय करणारे नियम का पाळले जातात? तर ते केवळ ख्रिश्चन धर्माचे पालन म्हणून असेही काहीजण सांगतात. अर्थात, ज्याला ज्या श्रद्धा ठेवायच्या आहेत, त्या व्यक्तीसाठी ते स्वातंत्र्य आहे.
 
 
पण, स्त्री-पुरुषांपलीकडेही एक समाजगट आहे, त्याला ‘तृतीयपंथी’ म्हणतात. त्यांच्या जगण्याबाबत, त्यांच्या मूलभूत गरजांबाबत काय? तृतीयपंथी असला, तरी तो माणूसच आहे आणि माणसाला असणाऱ्या सर्वच गरजा त्यालाही असतात. घानावासीयांना कोण सांगणार की, ‘पृथ्वी गोल आहे’ हेसुद्धा बायबलमध्ये लिहिले नव्हते, पण पृथ्वी गोलच आहे. त्यामुळे ‘एलजीबीटी’ गटात मोडणाऱ्यांवर बायबलमध्ये काहीही लिहिलेले नसले, तरी ती माणसंच आहेत. त्यांना माणसासारखे जगण्याचा धार्मिक, सामाजिक आणि कायदेशीर अधिकार हवाच!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@