कोरोना महामारीमुळे अपरिहार्यपणे घ्याव्या लागणाऱ्या ‘लॉकडाऊन’च्या कठोर निर्णयामुळे भारतासह जगभरात अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागले. अनेक औद्योगिक संस्था आर्थिक गणित कोलमडल्याने लयास गेल्या. कर्मचाऱ्यांचे हाल झाले. हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अशा बिकट परिस्थितीत काही उद्योजकांनी हार मानली नाही. नव्याने भरारी घेऊन त्यांनी नेटाने उत्पादनाला सुरुवात केली. यापैकीच एक नाव म्हणजे ‘क्रिएटिव्ह कंपोनंट्स’ कंपनीचे उद्योजक सुभाष जयसिंघानी. कोरोना काळातील त्यांची ही संघर्षकथा...
गेल्या दोन दशकांपासून पुण्यातील ‘क्रिएटिव्ह कंपोनंट्स प्रा.लि.’ ही कंपनी ऑटो मोबाईल भागांची निर्मिती करणाऱ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. १९९६ साली या कंपनीची स्थापना झाली. सद्यःस्थितीत या कंपनीचे युनिट्स पुण्यामध्ये भोसरीतील ‘एमआयडीसी’मध्ये आहेत. या कंपनीच्या निर्मितीची चार प्रमुख माध्यमे आहेत. ही कंपनी प्लास्टिकच्या ‘कंपोनंट्स’करिता ‘मोल्ड’ तयार करण्याचे काम करते. हे ‘मोल्ड’ ग्राहकाच्या गरजेनुसार बनविण्यात येतात. याशिवाय कंपनीचे प्रेस शॉप असून, गोदरेजकरिता कुलूप तयार करण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून करण्यात येते. सुभाष जयसिंघानी हे ‘क्रिएटिव्ह कंपोनंट्स प्रा.लि.’चे संचालक. देशात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे कंपनीसमोर नानाविध प्रकारची आव्हाने उभी राहिली. मात्र, त्यानंतर कंपनीला नवउत्तेजना मिळून देण्याचे काम जयसिंघानी यांनी केले.
जगाच्या इतिहासामध्ये २०२० हे साल ‘कोविड वर्ष’ म्हणून ओळखले जाईल. कोरोना संसर्गवाढीच्या भीतीने देशात मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ लागू झाला आणि जवळपास पुढील दोन महिने देशाच्या अर्थव्यवस्थेला टाळे लागल्याची स्थिती निर्माण झाली. याचा सर्वाधिक फटका उद्योगधंद्यांना बसला. सर्व काही ठप्प असल्यामुळे कामगारवर्ग पांगला आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. ‘क्रिएटिव्ह कंपोनंट्स प्रा.लि.’ या कंपनीमध्येही काही वेगळी परिस्थिती नसल्याचे जयसिंघानी सांगतात. मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर कंपनीतील कामगार आपापल्या गावी परतले. त्याचा फटका कंपनीला बसला. शिवाय, प्रशासनाकडून कंपनीमधील कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगीही मिळत नव्हती. ही परिस्थिती एप्रिल आणि मे महिन्यात ‘जैसे थे’ राहिली. जयसिंघानी यांची कंपनी अग्निशमन उत्पादनासाठी आवश्यक काही उपकरणांची निर्मिती करते. असे साहित्य अमेरिकेत निर्यात करावयाचे असल्याने जून महिन्यापासून कंपनीला पुन्हा उत्पादन सुरू करण्याची परवानगी मिळाली.
जून महिन्यात गावी गेलेले कामगार पुन्हा परतल्याने कंपनीची उत्पादन प्रक्रिया कार्यान्वित झाली. मात्र, दरम्यानच्या काळात उद्योग पूर्णपणे ठप्प असल्याने जयसिंघानी यांना उत्पादन सुरू करताना अनेकविध आव्हानांचा सामना करावा लागला. पैशांचे सोंग आणता येत नसल्याने आर्थिकचक्राचा प्रवाह सुरळीत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. ग्राहकांकडून येणारी देयकेही रखडली होती. मात्र, जून महिन्यात सुरू झालेल्या उत्पादनामुळे काही प्रमाणात निर्यातीला सुरुवात झाली. सोबतच कंपनीकडे असलेल्या आर्थिक साठ्यामुळे जयसिंघानी यांच्यावरील आर्थिक देण्यांचा व्याप वाढला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांची देणी फेडणे आवश्यक होते. अशावेळी बँकेतून त्यांना आर्थिक मदत मिळाली. सहा महिन्यांच्या क्रेडिट तत्त्वावर ही मदत मिळाल्याने जयसिंघानी यांची आर्थिक बाजूची चिंता मिटली.
कामगारवर्ग हाच कंपनीसाठी सर्वकाही असल्याची जाणीव जयसिंघानी यांना आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक उद्योगधंदे बंद होत होते, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात होते. अशा कठीण परिस्थितीत कर्मचारीवर्ग हवालदील झाला होता. यावेळी जयसिंघानी आपल्या कामगारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. एप्रिल-मे या पूर्णपणे ‘शटडाऊन’च्या काळात कामगार घरी बसून होते. अशा वेळी जयसिंघानी यांनी आपल्या कामगारांना घरपोच अन्नधान्यांचे वाटप केले. शिवाय मार्च-एप्रिल-मे या तिन्ही महिन्यांचा पगारही कामगारांना दिला. ज्यामुळे जून महिन्यात उत्पादन पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्यावर जयसिंघानी यांना कामगारांचा पाठिंबा मिळाला.
‘रोटरी क्लब ऑफ निगडी’चे जयसिंघानी हे माजी अध्यक्ष आहेत. कोरोनाच्या काळात ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून जयसिंघानी यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग नोंदवला. ‘रोटरी’च्या माध्यमातून निगडी परिसरातील पोलीस चौक्यांना तीन महिन्यांसाठी दिवसभराच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या काळात ‘पीपीई किट’ आणि मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. अशावेळी ‘रोटरी’च्या माध्यमातून या गोष्टी विकत घेऊन ‘ससून रुग्णालय’ आणि पोलिसांमध्ये वाटण्यात आल्या. सॅनिटायझरचीही कमतरता असल्याने उत्पादकांकडून सॅनिटायझर बनवून ते गरजूंना वाटण्यात आले. याशिवाय मित्रमंडळींनी एकत्र घेऊन आपापल्या स्तरावर निधी संकलित केला. या निधीच्या आधारे गरजूंना अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.
‘लॉकडाऊन’ची शिथिलता कमी झाल्यामुळे बाजाराला चालना मिळाली. त्यामुळे उत्पादनामध्ये अनेक संधी मिळाल्याचे जयसिंघानी सांगतात. “सद्यःस्थितीत औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने भारत योग्य वाटेवर आहे. कोरोनासंकटाची तीव्रता कमी होत असल्यामुळे भारत औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा उभारी घेईल,” असा विश्वास जयसिंघानी यांना आहे. त्यांनी सांगितले की, “यापूर्वी आम्हाला चीनमधून कच्चा मालाची आयात करून घ्यावी लागत होती. मात्र, आम्ही ते बंद करून ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीने काम केले, म्हणूनच सद्यःस्थितीत आम्हीच चीनला माल निर्यात करत आहोत.” कोरोनाचा काळ जगण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकून गेल्याचे जयसिंघानी आवर्जून नमूद करतात. त्यांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
"‘कोविड’काळात कामगारांच्या साथीमुळे आमचा उद्योग पुन्हा उभा राहू शकला. मला स्वत:ला ‘कोविड’चा संसर्ग झाल्यामुळे मास्क, सॅनिटायझर या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला मी नक्कीच देतो. नवखा उद्योग सुरू करताना तरुण उद्योजकांमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे."
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.