शालेयस्तर ते संशोधक – अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यासपीठ
मुंबई: मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठीप्रेमींना उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याबद्दल माहिती देत आनंद व्यक्त केला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी विकसित केलेल्या ‘साहित्यवेदी’ या संकेतस्थळाचे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार केलेले हे संकेतस्थळ अत्यंत नाविन्यपूर्ण असं आहे. अधिक माहिती देताना मराठी भाषा मंत्री पुढे म्हणाले की, हे संकेतस्थळ शालेयस्तर ते संशोधक – अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला उज्ज्वल परंपरा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिक्षकांनी केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.
मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी www.sahityavedi.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. विविध प्रकारचे कोश, शब्दांची व्युत्पत्ती, मराठी भाषेविषयीचे डॉ. गणेश देवी, डॉ. नीलिमा गुंडी, प्रा. हरी नरके, डॉ. विद्या देवधर यांच्यासह अनेकांचे अभ्यासपूर्ण लेख, सुलेखन, वाङ्मयीन नियतकालिके, युवा साहित्यकार, भाषा आणि बोली यांचा संबंध, सार्वजनिक ग्रंथालये आणि साहित्य परिक्रमा यासारख्या विविध विषयांचा अंतर्भाव दृक्-श्राव्य फितींसह यात केला आहे.