आघाडी होण्यापूर्वीच विरोधकांच्या ऐक्याचे वाजले तीन-तेरा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2021   
Total Views |

Mamata oppositions_1 
 
 
ममता बॅनर्जी यांचा महाराष्ट्र दौरा विरोधकांचे ऐक्य साधण्यास उपयुक्त ठरण्याऐवजी एक वादळ निर्माण करून गेला. विरोधकांची आघाडी निर्माण झाल्यानंतर त्या आघाडीचे नेतृत्व सामूहिकपणे केले जाईल, असे वक्तव्य या वादाच्या दरम्यान करण्यात आले. पण महत्त्वाकांक्षी ममता बॅनर्जी यांना ते मान्य होईल का? ज्या शरद पवार यांचा उल्लेख राष्ट्रीय नेते असा शिवसेनेकडून केला जात आहे, ते सामूहिक नेतृत्व मान्य करतील?
 
 
पुढील वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या ममता बॅनर्जी या तर आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू लागल्या आहेत. त्यासाठी विरोधकांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास प्रारंभही केला आहे. गोवा राज्याच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन गोव्यात हातपाय पसरण्यास तृणमूल काँग्रेसने प्रारंभ केला आहे. तेथील लुईझिनो फालेरो यांच्यासारख्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांची राज्यसभेवर रवानगी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यामुळे विरोधी ऐक्य साधण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले जाईल, अशी शक्यता वाटत होती. पण स्वतः ममता बॅनर्जी यांनीच एक खळबळजनक वक्तव्य करून विरोधकांचे ऐक्य सहजशक्य नाही, हे दाखवून दिले. आपल्या या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्यादेखतच संयुक्त पुरोगामी आघाडीवर ममतादीदी यांनी तोंडसुख घेतले! संयुक्त पुरोगामी आघाडी आहे कुठे, असा प्रश्न करून ही आघाडी कधीच लयाला गेली असल्याचे त्यांनी सूचित केले. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भलतीच कुचंबणा झाली. आपण काय करायला निघालो आणि काय भलतेच झाले, अशी त्यांची अवस्था झाली. त्यामुळे लगेचच शरद पवार यांनी, सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधात आघाडी व्हायला हवी, असे स्पष्ट केले.
 
 
ममतादीदी यांच्या राज्यात अलीकडील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. त्यामुळे आपल्या राज्यातून अस्तित्वहीन झालेला हा पक्ष अन्यत्रही प्रभावहीन असल्याचे त्यांना वाटले असावे. त्यातून त्यांनी काँग्रेसवर टीका केली असावी. देशातील काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे, हे त्या विसरून गेल्या. भाजपविरोधात आघाडी करायची असेल, तर काँग्रेसला बरोबर घेणे गरजेचे आहे, हा विचार त्यांच्या मनात आला नाही. काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीवर टीका करून ममतादीदी प. बंगालला निघून गेल्या. पण त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये मोठे वादळ निर्माण झाले. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांनी कडाडून टीका केली. ममता बॅनर्जी या संधीसाधू असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी संधी मिळताच आपला नवा पक्ष स्थापन केला. प. बंगालमधील प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेले मार्क्सवादी सरकार उलथवून टाकले आणि त्या प. बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. मध्यंतरीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या प. बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नाकात दम आणला होता. त्यांचे अनेक ज्येष्ठ सहकारी भाजपच्या आश्रयाला गेले होते. पण विधानसभा निवडणुकीमध्ये दान त्यांच्या बाजूने पडले आणि त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. आपण भाजपचा पराभव केल्याने राष्ट्रीय राजकारणात आपणास महत्त्वाचे स्थान असल्याचे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटू लागले. त्यातून त्यांनी विरोधकांचे ऐक्य करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली. पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जे वक्तव्य केले ते पहिल्याच घासाला पानात माशी पडल्यासारखे होते.
 
 
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याने काँग्रेस पक्ष नाराज झाला. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य देश विकणाऱ्या भाजपच्या बाजूचे असल्याचा आरोप केला. (देश डबघाईला कोणी नेला, हे देशातील जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे. त्यामुळेच जनतेने काँग्रेसला झिडकारले हे पटोले विसरून गेले की काय?) नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना, देशाची सद्य:स्थिती लक्षात घेता, देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की राखणाऱ्यांसोबत, याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यावा, असा टोलाही लगावला. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. काँग्रेसखेरीज विरोधकांची मोट बांधणे शक्य नाही. भाजपविरुद्ध लढण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे, अशी भूमिका शरद पवार यांची असल्याचे मलिक यांना लक्षात आणून द्यावे लागले. कोणालाही आम्हाला बाजूला सारायचे नाही. संपुआ आणि आंध्रप्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील बिगर संपुआमधील पक्षांना एकत्र आणून देशाला दुसरा पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांना करावे लागले. ममता बॅनर्जी राज्यात आल्या कशासाठी आणि त्यांच्याच वक्तव्याने काय होऊन बसले, असे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना नक्कीच वाटले असणार!
 
 
ममता बॅनर्जी येणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी शिवसेनेने मोठ्या उत्साहाने केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत त्यांच्या दिमतीला होते. पण ममतादीदी यांनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेवरही सारवासारव करण्याची वेळ आली. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करता येत नाही आणि काँग्रेस पक्षालाही दुखावून चालणार नाही, अशी शिवसेनेची स्थिती झाली. एकीकडे, संपुआ कुठे आहे, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला असून त्यांच्या म्हणण्यात दम आहे, असे शिवसेनेने म्हटले. पण त्याचवेळी, काँग्रेसला वगळून वेगळी आघाडी होऊ शकत नाही. कोणतीही वेगळी आघाडी केल्यास त्याचा भाजपला फायदा होईल, असेही शिवसेनेने म्हटले. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. भाजप विरोधात जी लढाई सुरू आहे, त्यातील त्या सर्वात महत्त्वाच्या योद्धा आहेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे. एकूण ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यापैकी कोणीच दुखावले जात नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी घेतल्याचे दिसून येते. काँग्रेसचे अस्तित्व संपलेले नाही. काँग्रेसला इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून आघाडी केली, तर चांगली आघाडी तयार होईल, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
 
 
एकूणच ममता बॅनर्जी यांचा महाराष्ट्र दौरा विरोधकांचे ऐक्य साधण्यास उपयुक्त ठरण्याऐवजी एक वादळ निर्माण करून गेला. विरोधकांची आघाडी निर्माण झाल्यानंतर त्या आघाडीचे नेतृत्व सामूहिकपणे केले जाईल, असे वक्तव्य या वादाच्या दरम्यान करण्यात आले. पण महत्त्वाकांक्षी ममता बॅनर्जी यांना ते मान्य होईल का? ज्या शरद पवार यांचा उल्लेख राष्ट्रीय नेते असा शिवसेनेकडून केला जात आहे, ते सामूहिक नेतृत्व मान्य करतील? या विरोधी आघाडीत एवढा अवमान झाल्यानंतरही काँग्रेस पक्ष सहभागी झाल्यास तो पक्ष सामूहिक नेतृत्व मान्य करेल? सोनिया गांधी, राहुल गांधी हेच आमचे नेते असल्याचे म्हणणाऱ्या काँग्रेसला सामूहिक नेतृत्व ही कल्पना पटेल? तसेच या आघाडीत प्रादेशिक पक्ष सहभागी झाल्यास त्या पक्षांच्या नेत्यांकडून सामूहिक नेतृत्वास मान्यता मिळेल? असे आणि यासारखे अनेक प्रश्न या संभाव्य आघाडीसंदर्भात उभे राहत आहेत. काही तात्त्विक बैठक नाही. केवळ भाजपला विरोध करणे, या एकाच हेतूने एकत्र आलेल्या विरोधकांना आवळ्या-भोपळ्याची मोट बांधणे जमेल का? समजा, जमले तरी हे सर्व आवळेभोपळे भविष्यात एकत्र बांधून ठेवणे शक्य आहे का?
 
 
@@AUTHORINFO_V1@@