शून्य फोडणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2021   
Total Views |

Sameer _1  H x
२०१८ मध्ये समीरने Sameer Gaikwad आपलं स्वत:चं ‘प्रॉडक्शन हाऊस’ असावं, हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केलं. ‘नवयान फिल्म’ नावाची कंपनी सुरू केली. ‘व्हिडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग’, ‘अ‍ॅनिमेशन’, ‘ग्राफिक डिझाईन’, ‘फोटोग्राफी’ आदी सेवा तो देऊ लागला. ‘कॉर्पोरेट’ कंपन्या, सूक्ष्म-लघु-मध्यम दर्जाचे उद्योग यांच्यासाठी ‘नवयान फिल्म्स’ जाहिरात, ‘ग्राफिक डिझाईन’, फोटोची सेवा देते. गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा अधिक ग्राहकांना ‘नवयान’ने सेवा दिलेल्या आहेत.
 
 
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे जातीय व्यवस्थेमुळे न्यूनगंडात गेलेल्या वंचित समाजाला त्यांनी आत्मविश्वास मिळवून दिला. स्वाभिमान मिळवून दिला. आपण इतर माणसांप्रमाणे जगू शकतो, ताठ मानेने वागू शकतो, शिक्षण घेऊन स्वत:चा, समाजाचा, या देशाचा उद्धार करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात आला. बाबासाहेबांच्या या महत्कार्यामुळे वंचित समाजातील मुले आज मुख्य प्रवाहात येत आहेत. जगाच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी सज्ज होत आहेत. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा मूलमंत्र त्यांनी अंगीकारला. ज्या कोणी हा मूलमंत्र आत्मसात केला, त्यांच्यासाठी यशाची कवाडे सताड खुली झाली. कर्जतसारख्या छोट्या शहरांतून येणारा समीर गायकवाड Sameer Gaikwad याने हा मूलमंत्र आत्मसात केला. स्वत:ची ‘नवयान फिल्म्स’ नावाची संस्था उभारली.
 
 
 
कर्जत... मध्यस रेल्वेवरील मुंबई लोकलचे शेवटचे स्थानक. उद्योगपती, राजकारणी, सेलेब्रिटी या सर्वांची ‘फार्म हाऊसेस’ याच परिसरात. मात्र, येथील वंचित समाज आजदेखील व्यवस्थेच्या परिघावर आहे. या परिघावरील एक कुटुंब गायकवाडांचं. विजय गायकवाड हे अंबरनाथच्या ‘एमआयडीसी’मध्ये खासगी कंपनीत कामाला होते, तर त्यांची पत्नी शोभा गायकवाड गृहिणी होत्या.
 
 
या दोघांना एकुलता एक मुलगा. तो मुलगा म्हणजे समीर गायकवाड Sameer Gaikwad. समीरचं शालेय शिक्षण कर्जतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, तर माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब राऊत विद्यालयात झाले. ‘नेरळ ज्युनिअर कॉलेज’मधून अकरावी-बारावी झाली. आपल्या मुलाने कर्जतमध्येच कॉलेज पूर्ण करावं, अशी समीरच्या आईवडिलांची इच्छा होती. मात्र, पुढे काही करायचं असेल तर मुंबईच्या कॉलेजमधून शिकावं लागेल. इंग्रजी भाषेसाठी मुंबईच्या कॉलेजला पर्याय नाही, हे त्याने आपल्या आईवडिलांना पटवून दिले. उल्हासनगरच्या एका प्रख्यात महाविद्यालयात प्रवेश घेतला.
 
 
 
खरंतर महाविद्यालयाचे शुल्क भरण्याची आर्थिक स्थिती नव्हतीच मुळी. मात्र, समीरने बारावी परीक्षा दिल्यानंतर लागलेल्या सुट्टीत उल्हासनगरच्या एका बेकरीमध्ये काम केले. दर आठवड्याला ५७० रुपये पगार मिळायचा. ते पैसे समीरने शिक्षणासाठी साठवले होते. तेसुद्धा तोकडे होते. मात्र, शिष्यवृत्तीमुळे समीरला Sameer Gaikwad शिक्षण पूर्ण करता आले. ‘राज्यशास्त्र’ हा विषय घेऊन समीर बीए झाला. समीरला त्याच्या मामांचा, रवींद्र जाधव यांचा मोठा आधार होता. त्यांनी अनेकवेळा समीरच्या शिक्षणासाठी मदत केली. कॉलेजमध्ये असतानाच समीर नाटकांमध्ये रमू लागला. नाटक आणि गायन यांचं त्याला लहानपणापासून वेड होतं. मात्र, आर्थिक परिस्थिती अभावी समीरला गाणं शिकता आलं नाही. मात्र, कॉलेजमुळे नाटकाची आवड जोपासता आली.
 
 
सकाळी कॉलेज करून समीर ‘कॉल सेंटर’मध्ये नोकरी करू लागला. त्यामुळे भाषेमध्ये सफाईदारपणा येण्यास मदत झाली. इंग्रजीचा न्यूनगंड काहीअंशी दूर झाला. अनोळखी लोकांसोबत संवाद साधण्याचे कौशल्य आले. पदवी झाल्यानंतर पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशातून या अभ्यासक्रमासाठी १२ जणांची निवड होते. त्यातील दोन अनुसूचित समाजातील असतात. यामध्ये समीरचा क्रमांक तिसरा होता. त्याला प्रतीक्षायादीमध्ये वाट पाहणं क्रमप्राप्त होतं. मात्र, घरची परिस्थिती बिकट असल्याने वाट पाहणं अवघड होतं. त्यामुळे समीरने ‘डिजिटल फिल्म अकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला. समीरच्या म्हणण्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या ‘गरवारे इन्स्टिट्यूट’ने या अकॅडमीसोबत या अभ्यासक्रमासाठी करार केल्याने समीरला Sameer Gaikwad ‘एससी’ वर्गातून प्रवेश मिळाला. दीड वर्षांचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला.
 
 
दरम्यान समीरचे वडील, विजय गायकवाड अंबरनाथवरून, कामावरून घरी लोकलने परतत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचे निधन झाले. अवघ्या २३ वर्षांच्या समीरसाठी हा एक प्रचंड आघात होता. त्याचं आभाळंच हरवलं होतं. आईसाठी समीरला सावरणं गरजेचं होतं. त्या धक्क्यातून कसाबसा तो बाहेर आला. ‘डिजिटल फिल्म अकॅडमी’मध्ये अशोक पुरंग नावाचे प्राध्यापक होते. मुलांनी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये जाऊन जगभरातील उत्कृष्ट फिल्म्स पाहिल्या पाहिजेत, हा त्यांचा प्रयत्न होता. समीरला या चित्रपटांचे तिकीट काढणे अवघड आहे, हे त्यांना कळल्यावर समीरला ते चित्रपट पाहण्यासाठी पैसे देत. अशोक सरांमुळे जगभरातील चित्रपट पाहता आले, असे समीर कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.
 
 
कांजूरमार्गवरून ‘एमआयडीसी’ला ‘डिजिटल फिल्म अकॅडमी’मध्ये जाण्यासाठीचे दहा रुपयेही समीरकडे कधी कधी नसायचे. त्यामुळे कधी बसने, तर कधी पायी चालत तो प्रवास करायचा. आई आजारी असल्याने जेवणाचा प्रश्नच असायचा. काहीवेळेस दहा रुपयांची केळी खाऊन संपूर्ण दिवस समीरने काढलेला आहे. त्याच्या या परिस्थितीची माहिती झाल्यावर स्नेहा पोळ आणि अनुराधा राठोड या दोन मैत्रिणींनी समीरला खूप मोठा आधार दिला. ‘एक दिवस माझंसुद्धा प्रॉडक्शन हाऊस असेल’ या समीरच्या स्वप्नांना स्नेहा आणि अनुराधाने नेहमीच पाठिंबा दिला. “स्नेहा आणि अनुराधाची त्या काळातील मदत ही माझ्यासाठी शब्दातीत आहे,” असे भावनिक होऊन समीर सांगतो.
 
 
या अभ्यासक्रमानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी समीरला आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली. ‘वनटूथ्रीफोर’, ‘शिनमा’ सारख्या चित्रपटांसाठी समीरने ‘प्रॉडक्शन हाऊस’ची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर समीर ‘एनडी स्टुडिओ’मध्ये ‘कन्टेंट रायटर’ म्हणून काम करू लागला. त्याचसोबत मिलिंद शिंदेंच्या ‘कॉपी’ सिनेमासाठी मुख्य साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले.
 
 
२०१८ मध्ये आपलं स्वत:चं ‘प्रॉडक्शन हाऊस’ असावं, हे उराशी बाळगलेलं स्वप्न समीरने पूर्ण केलं. ‘नवयान फिल्म’ नावाची कंपनी सुरु केली. व्हिडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग’, ‘अ‍ॅनिमेशन’, ‘ग्राफिक डिझाईन’, ‘फोटोग्राफी’ आदी सेवा तो देऊ लागला. ‘कॉर्पोरेट’ कंपन्या, सूक्ष्म-लघु-मध्यम दर्जाचे उद्योग यांच्यासाठी ‘नवयान फिल्म्स’ जाहिरात, ‘ग्राफिक डिझाईन’, फोटोची सेवा देते. गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा अधिक ग्राहकांना ‘नवयान’ने सेवा दिलेल्या आहेत. यामध्ये ‘हिरानंदांनी’, ‘टाटा टी’, ‘किड्झी’, ‘ल्युपिन फार्मा’ सारख्या नावाजलेल्या ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांचा समावेश आहे. ‘नवयान फिल्म्स’ चार लोकांना थेट रोजगार देते. ’‘भविष्यात ‘टॉप टेन प्रॉडक्शन हाऊसेस’पैकी ‘नवयान फिल्म्स’चा समावेश असेल, यासाठी प्रयत्न करू,” असे समीर म्हणतो. ‘नवयान’च्या प्रवासात प्राची पाटील या मैत्रिणीचा फार मोठा वाटा आहे. किंबहुना, प्राची ‘नवयान’चा कारभार सांभाळत असल्याने समीर दिग्दर्शन, लेखन या गोष्टींनादेखील वेळ देऊ शकतो. सध्या ‘पायल’ नावाचा लघुपट आणि ‘मॅड’ नावाच्या चित्रपटाचा प्रकल्प सुरू आहे.
 
 
“वाचनाने मला समृद्ध केले. पुस्तक आणि माणसे वाचण्याचा छंद जडला. आयुष्याचा प्रवास खडतर होता. मात्र, प्रत्येक टप्प्यावर काही योग्य माणसे भेटली. त्यांच्यामुळे इथवर पोहोचलो. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्यासारख्या अगणित तरुणांवर बाबासाहेबांचे न फिटणारे उपकार आहेत. बाबासाहेब नसते, तर सर्जनशील क्षेत्रातला उद्योजक न होता एखादा मजूर बनून राहिलो असतो,” अशा भावूक शब्दांत समीर Sameer Gaikwad बाबासाहेब आंबेडकरांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतो. अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. मात्र, प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता स्वत:चं अस्तित्व निर्माण करून शून्य फोडणारा उद्योजक खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचा अनुयायी आहे, हे समीरने सिद्ध केले आहे.



@@AUTHORINFO_V1@@