कळसुबाई-हरिश्चंद्रगडाचा वनाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2021   
Total Views |
ganesh randeve _1 &n
 
 
वनसेवेच्या माध्यमातून जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या भल्याचा विचार करुन वन्यजीवांच्या रक्षणासाठी झटणारे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे साहाय्यक वनसंरक्षक गणेश रामहरी रणदिवे यांच्याविषयी...
 
 
प्रबळ राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही या माणसाने राजकारणामुळे येणारी संभाव्य संकटं लक्षात घेता, आपला वेगळा मार्ग निवडला. सुरुवातीला या मार्गाला दिशा होती ती म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून समाजसेवेची. मात्र, प्रवासादरम्यान या मार्गाला दिशा मिळाली ती म्हणजे वनसंवर्धनाची. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळणारे अपयश पचवत, या माणसाने सतत प्रयत्नशील राहून यशाचा टप्पा पार केला. वन अधिकारी झाल्यावर मनी बाळगलेले समाजसेवेचे व्रत हे वनांचे रक्षण आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या समाजासाठी ते खर्ची करत आहेत. सध्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तत्त्वांशी एकनिष्ठ राहून तत्परतेने जंगल राखण्यासाठी प्रयत्नशील असलेला हा माणूस म्हणजे नाशिक वन्यजीव विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे.
 
 
रणदिवे यांचा जन्म दि. १६ मे, १९८७ साली पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावी झाला. त्यांचे आजोबा अनंतराव रणदिवे हे तुंगत गावचे १५ वर्षं सरपंच, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य होते. १९७६ साली आजोबांचे निधन झाल्यावर वडील रामहरी रणदिवे यांनी राजकारणाचा वारसा चालवला. घरचे विचार पुढारलेले असल्याने वडिलांनी रणदिवे यांना ग्रीन फिंगर स्कूल, अकलुज येथे शिक्षणाकरिता प्रवेश घेऊन दिला. घरातील राजकीय वारशामुळे रणदिवेदेखील राजकारणी स्वप्न रंगवत होते. पार्टी प्रमुखाचा मुलगा असल्याने उमलते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, २००० साली वडिलांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. राजकारणामुळे कर्जाचा डोंगर झाला. ते फेडण्यासाठी वडिलोपार्जित जमीन विकावी लागली.
 
 
या सर्व गोष्टींमुळे रणदिवेंना धडा मिळाला. राजकारणापासून लांब राहण्याचा विचार करुन त्यांनी अधिकारी होऊन समाजसेवा करण्याचा निर्धार केला. त्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रत्येक वर्षी विद्यापीठात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रम, त्यांची भाषणे त्यातून स्पर्धा परीक्षेसाठी आणखी प्रेरणा त्यांना मिळाली. २००९ ते २०१३ या कालावधीत ‘पीएसआय’, ‘एसटीआय’, ‘असिस्टंट सीडीएस’, ‘एसएससी’ अशा अनेक परीक्षा आणि मुलाखती त्यांनी दिल्या. पण, त्यांच्या पदरी पडले ते अपयशच! मात्र, प्रयत्न सुरू ठेवल्याने २०१३ साली रणदिवे ‘एमपीएससी’च्या माध्यमातून उपविभागीय वनाधिकारी (साहाय्यक वनसंरक्षक) या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून राज्यात पहिले आले. २०१६ साली वनप्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रणदिवे यांची पहिली नियुक्ती धुळे वन विभागात झाली आणि त्यानंतर काही महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्यात साहाय्यक वनसंरक्षक पदावर बदली झाली. या काळात त्यांनी वनसंपत्तीची अवैधपणे वाहूतक करणारी सुमारे १०० हून अधिक वाहने जप्त केली. त्यातील अनेक वाहने सरकारजमा केली. सुमारे ४०हून अधिक ठिकाणी धाड टाकून खैर, चंदन, साग, शिसम इ. मौल्यवान प्रजातींची तस्करी उघडकीस आणली आणि शासनाला करोडो रुपयांचा महसूल जमा करून दिला. वनालगत असलेल्या गावांमध्ये एलपीजी गॅस वाटप व इतर शासनाच्या प्रभावी योजना अंमलबजावणी केली. वन्यजीवांची शिकार रोखण्यासंदर्भात काम केले. गुजरात राज्यातील वन अधिकारी कर्मचारी यांची ‘स्टेट बॉर्डर मीटिंग’ घेऊन वेळोवेळी तस्करांवर संयुक्त कारवाई करून राज्यांच्या सीमा भागातील तस्करी कमी केली. ‘गाव तिथे समिती’ उपक्रम राबविला. यामुळे रणदिवे कार्यरत असणाऱ्या गावांना ‘संत तुकाराम वनग्राम पुरस्कार’ही प्राप्त झाला.
 
 
वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुधारणा, पाणवठे तयार करणे, गवत लागवड, योग्य त्या प्रजातींची निवड केल्यामुळे नंदुरबारसारख्या ठिकाणी सुमारे २५ वर्षांनंतर वाघाचे अस्तित्व निदर्शनास आले आणि इतर वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली. रणदिवे यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना सन २०१८-१९ मध्ये वन्यजीव संरक्षणासाठी सुवर्ण पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सप्टेंबर, २०२० पासून ते कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात कार्यरत आहेत. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी वनपर्यटन आणि संवर्धनासाठी विशेष काम केले आहे. कळसुबाईला जाण्यासाठी पांजरेमार्गे पायवाट शिड्या, रेलिंगच्या माध्यमातून तयार केली. अभयारण्यातील गाव ग्राम परिस्थिती विकास समित्यांच्या बैठका घेऊन अभयारण्य प्लास्टिक, दारूमुक्त केले. हरिश्चंद्रगडावरील मंदिरासमोरील अवैध अतिक्रमण हटविले. अभयारण्य क्षेत्रातील गाईड प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम, गड-किल्ले संवर्धनासाठी मोहीम, कोल्टेंबे चिल्ड्रन पोंड व सांदन दरी येथे ‘कंट्रोल टुरिझम’ व ‘एक गाव, एक दर’ ही मोहीम राबविली. चेक पोस्ट पर्यटन शुल्क नाक्यांचे मजबुतीकरण केले. शेकरू प्रगणनाही सुरू केली.
 
हे सर्व काम वरिष्ठ वनाधिकारी सुनिल लिमये, विरेंद्र तिवारी आणि अनिल अंजनकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत केल्याचे रणदिवे सांगतात. आज वन विभागाला रणदिवेंसारख्या तत्वनिष्ठ आणि तत्परतेने काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@