मुंबई : “जो हिंदू बांधवाच्या हिताची गोष्ट करेल, तोच या देशावर राज्य करेल. शिवरायांच्या महाराष्ट्रात आज हिंदूंची फसवणूक केली जात असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. ‘सनातन’ संस्थेवर बंदीची चर्चा सभागृहात करणारे ‘रझा अकादमी’च्या बाबतीत मौन का बाळगतात?,” असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सत्ताधार्यांना केला.
हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या मुद्द्यांवर आ. मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा सभागृहात आवाज उठवला. यावेळी ते म्हणाले की, “बंगालमध्ये एखादी घटना घडते, त्याचा विरोध दर्शवण्याकरिता भारतात काही केले जात नाही. पण, याउलट फक्त महाराष्ट्रात जुलूस काढले जातात आणि जल्लोष व्यक्त केला जातो. हे ‘रझा अकादमी’चे लोक जाणूनबुजून करत असल्याचे निदर्शनात येत आहे. ‘सनातन’ संस्थेवर प्रतिबंध लावण्यासंदर्भात बोलले जाते. परंतु, सभागृहामध्ये ‘रझा अकादमी’वर प्रतिबंध लावण्यासंदर्भात मौन पाळले जाणे, ही एक दुर्दैवी बाब आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
“सनातन संस्था असे ‘गुगल’वर ‘सर्च’ केल्यास तिकडे आरतीचा फोटो दिसतो. तर, ‘रझा अकादमी’ ‘सर्च’ केल्यास ‘शहीद स्तंभा’वर लाथ मारल्याचे चित्र दिसते. अशा ‘रझा अकादमी’ला आपण संरक्षण देतो. १९९२ मध्ये झालेल्या दंगलीमध्ये मुंबईच्या २५० लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागला. बॉम्बस्फोट घडवून आणणार्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळी आनंद व्यक्त करण्याऐवजी बॉम्बस्फोटातील दाऊदच्या निकटवर्तीय गुन्हेगारांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपतींना पत्राद्वारे करण्यात आली. ती मागणी करणारे आजही विधानसभेचे सदस्य म्हणून अधिवेशनात बसले आहेत. राष्ट्रपती यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये १२ आमदारांच्या सह्या होत्या, ही लाजिरवाणी बाब आहे. १२ आमदारांना विधानसभा सदस्य पदावरून काढावे,” अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात केली.
“गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असून आता त्याची पातळी कमी झाली असली, तरी सणांवर बंधन कायम आहेत. नवरात्री असो व गणपती विसर्जन या दोन्ही सणांमध्ये विसर्जनाच्या वेळी भाविकांची संख्या कमी करण्याचे नियम लादले गेले. हिंदू सणांवर बंधने घातली जातात, पण दुसर्या बाजूला पाहिले, तर दर शुक्रवारी नमाज पठणादरम्यान रस्त्यावर झालेल्या गर्दीवर कोणतेही नियम लादले जात नाहीत, हा कोणता कायदा आहे. संस्कृती टिकली तर देश टिकेल, देश टिकला तर तुम्ही आणि आम्ही जगू,” अशी खंत मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
“मुंबईमध्ये प्रथम नागरिक मानल्या जाणार्या कोळी बांधवांवरदेखील अन्याय होताना दिसत आहे. आधी मुंबईमध्ये कोळीबांधव मासे विकत होते. पण आता आपल्याला मासे विकताना कोण दिसतात? ९० टक्के मासे विक्री व्यवसाय कोळी समाज करत होता, पण आता वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये १५ पेक्षा जास्त व्यवसाय हे एका विशिष्ट जातीतील समाजाने काबीज केले आहेत. यावरून मुंबईमध्ये हिंदू नागरिक किती असुरक्षित आहेत, हे स्पष्ट होते. हिंदू नागरिकांचे रक्षण कसे केले जाईल, यावर सरकारने विचार करायला हवा,” असे प्रतिपादन मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात केले.
“मुंबईमध्ये ‘एसआरए योजने’अंतर्गत बांधण्यात येणार्या नवीन इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नाही, त्यामुळे रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेथे योग्य पार्किंगची व्यवस्था करावी,” अशी मागणीदेखील लोढा यांनी सभागृहात केली.