नाशिक : नाशिक रोड परिसरातील संत फिलीप चर्चचे बिशप शरद गायकवाड यांच्या विरोधात येथील उपनगर पोलीस ठाण्यात ‘सामाजिक बहिष्कृत संरक्षण कायदा-२०१६’ अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच चर्चचे पदाधिकारी असलेले रुपेश निकाळजे यांनी गायकवाड यांच्यावर मूलभूत हक्कावर गदा आणल्याची तक्रार थेट न्यायालयात दाखल केल्यावर न्यायालयाच्या आदेशाने या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अशाप्रकरे धर्मगुरूवर सामाजिक ‘बहिष्कृत संरक्षण कायदा-२०१६’ अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही बहुदा पहिलीच वेळ असल्याची बाबदेखील यामुळे समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना रुपेश निकाळजे व उपनगर पोलीस ठाण्याचे सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२१ मध्ये नाशिक धर्मप्रांताचे धर्मगुरू म्हणून बिशप शरद गायकवाड यांची नियुक्ती झाली. त्यावेळी रुपेश निकाळजे हे संत फिलीप चर्चचे खजिनदार होते. त्यानंतर निकाळजे यांनी चर्चचे कार्यकारी सदस्य म्हणून कारभार सांभाळला. त्यावेळी बिशप शरद गायकवाड यांनी चर्चच्या आचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी कपात करण्यात आलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार केला.
त्याबाबत निकाळजे यांनी बिशप गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्याचा राग येऊन बिशप गायकवाड यांनी त्यांना दि. ४ ऑगस्ट रोजी लेखी पत्र देत निकाळजे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. तसेच, त्यांचा चर्च अंतर्गत मतदानाचा मूलभूत हक्क हिरावून घेत त्यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठीदेखील बंदी आणली. याबाबत निकाळजे यांनी दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला कळवले असता तेथूनदेखील कोणतीही कारवाई झाली नाही.
शेवटी निकाळजे यांनी बिशप गायकवाड यांनी केलेल्या अन्यायाविरोधात नाशिक रोड न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने निकाळजे यांचे म्हणणे ग्राह्य धरत गुन्हा नोंदविण्याचे आदेशित केले. त्यानुसार नुकताच उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अद्याप जबाब घेण्यात आले नसून लवकरच कायदेशीर तपास सुरु करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.