‘त्या’च्या आयुष्याला मिळाली ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे कलाटणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2021   
Total Views |

ketamn.jpg_1  H


मूळचा डोंबिवलीकर असलेला गायक आणि संगीतकार केतन पटवर्धन याने गायलेले गणपतीस्तोत्र आणि अथर्वशीर्ष भारताबाहेरील मराठी माणूस व अमराठी माणूसदेखील ऐकत आहे. भारताबाहेरील लोक या सगळ्याकडे ‘मेडिटेशन’ म्हणून पाहत आहेत. केतनचा गायन क्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया...

केतनचा जन्म डोंबिवलीत झाला. त्याचे शालेय शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर या शाळेत झाले. डोंबिवलीतील ‘मॉडेल महाविद्यालया’तून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बी.कॉम झाल्यानंतर त्याने ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मधून ‘फायनान्स’मध्ये ‘एमबीए’ची पदवी घेतली. केतन वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय गाणं शिकत होता. त्याच्या वडिलांकडून त्याला हा वारसा मिळाला. वडिलांना गायनाचे शिक्षण घेता आले नसले, तरी बाबूजींच्या गाण्याचे त्यांनी अनेक कार्यक्रम ऐकले आहेत. त्यामुळे बाबूजींची सर्व गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. केतनने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका बँकेत नोकरी स्वीकारली. सहा वर्षं नोकरी केल्यानंतर अचानक आयुष्याला कलाटणी मिळणारी घटना केतनच्या आयुष्यात घडली. केतनला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. केतनचा मित्र अमोघ दांडेकर यांनी त्याला ‘सारेगमप’च्या ‘ऑडिशन’ला जाण्याबाबत विचारले. त्यावर केतनसुद्धा ‘जाऊया’ असाच विचार करत ‘हो’ म्हणाला. केवळ मित्रासोबत जावे म्हणून तो ‘सारेगमप’च्या ‘ऑडिशन’ला पोहोचला. २००५ मध्ये ‘सारेगमप’च्या झालेल्या ‘ऑडिशन’मध्ये मुंबईतील ‘टॉप १६’मध्ये केतनची निवडदेखील झाली. केतनसाठी ही गोष्ट खूपच आश्चर्यकारक अशी होती. केतनला ‘सारेगमप’मध्ये निवड झाली, या गोष्टीचे जसे आश्चर्य वाटत होते. तसाच आनंदही गगनात मावनेसा झाला होता. लगेचच दोन दिवसांत ‘फायनल ऑडिशन’ होणार होती. ३२ स्पर्धकांमधून गायक निवडणार होते. केतनचा आवाज ‘सारेगमप’मधील परीक्षकांना आवडला होता. पण केतनची फारशी गाणी बसविलेली नव्हती. त्यामुळे त्याला ३२ स्पर्धकांमध्ये येता आले नाही. एखादा गायक गाऊ शकला नाही, कुणी आजारी पडला तर केतनला गायनासाठी उभे करता येईल, यासाठी त्याची निवड केली होती. पण तो योग आला नाही. ‘ऑनस्क्रीन’ केतन कधीच आला नाही. मुंबईतून निवड झालेल्या स्पर्धकांचे एक ‘फोटोशूट’ करण्यात आले होते. त्यामध्ये केतनला ‘इंजिनिअर’चे कॅरेक्टर दिले होते. त्यामध्ये मराठी माणूस, माझा मुलगा महागायक व्हावा, असे म्हणायचे होते. आधीपर्यंत तो डॉक्टर, इंजिनिअर होईल हेच स्वप्न पाहत होता. पण आता त्याचे स्वप्न वेगळे असेल. रवी जाधव यांनी ‘फोटोशूट’चे दिग्दर्शन केले होते. प्रसिद्धीच्या जवळ जाऊनही केतनला नशिबाने हुलकावणी दिली होती. ही गोष्ट केतनच्या मनाला खूप लागली होती. केतनला स्पर्धांचा अनुभव नव्हता. त्याची गाण्याची तयारी नव्हती. त्यामुळे तो मागे राहिला. पण त्यानंतर केतनने अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. २००९ पर्यंत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये जात अनेक गाणी बसविली. २००७ मध्ये ‘सह्याद्री संगीतरत्न’मध्ये त्याची निवड झाली होती. २००८ मध्ये ई-टीव्हीवरील ‘स्वर संग्राम’मध्ये सहभाग होता. त्यात ‘टॉप थ्री’पर्यंत केतन पोहोचला होता. यशवंत देव यासारखे दिग्गज गाणी ऐकायला समोर होते. या दोन स्पर्धांचा अनुभव केतनच्या गाठीशी होता. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये गायन तो करीत होता. २००९ मध्ये ‘सारेगमप’च्या पुढच्या पर्वामध्ये केतनची निवड झाली. तिथे त्याला गायनाची संधी मिळाली. केतनचे ‘सारेगमप’मध्ये ‘रिजेक्ट’ होणे हीच गोष्ट त्याच्या संगीत क्षेत्रामध्ये येण्यासाठी कारणीभूत ठरली. केतनच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली होती. तो गायन गांभीर्याने करू लागला. नोकरी त्याने कधीच सोडली नाही. नोकरी सांभाळून गायन क्षेत्रही तो सांभाळत होता. करिअर ‘फायनान्स’मध्ये सुरू होते. गाणं ही दुसर्‍या बाजूला सुरू होते. ‘सारेगमप’नंतर त्याने गायनाचे अनेक कार्यक्रम केले. केतन सध्या ‘अल्ट्रा म्युझिक’मध्ये काम करीत आहे. डोंबिवलीत झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’साठी संमेलन गीतदेखील केतनने लिहिले होते.



 

केतनने २०१३ मध्ये ‘रे सख्या’ हा पहिला अल्बम केला. त्यातील सर्व गाण्यांचे गायन, कंपोझिशन त्याचे असून त्याने तीन ते चार गाणी लिहिलेलीसुद्धा आहेत. केतनने हा अल्बम ‘रिलीज’ झाल्यावर सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केला होता. केतनचा एक मित्र ‘राजश्री म्युझिक’ कंपनीमध्ये काम करीत होता. या कंपनीने ‘हम आपके हैं कौन’सारखा चित्रपट, तर ‘गारवा’सारखा अल्बम केला होता. आम्हाला गायक आणि संगीतकार लागतात. त्यामुळे ‘तू एकदा कंपनीत ये’ असे सांगितले. ‘फ्री लान्सिंग’मध्ये केतन गात होता. त्याने प्रथम मनाचे श्लोक गायले. अथर्वशीर्षाचेही पठण केले. २०१४ मध्ये रज्जत बडजात्या यांनी केतनला पूर्ण वेळ काम करण्याची ऑफर दिली. केतनला नोकरीतून चांगला पगार मिळत होता. पण गाता येणार म्हणून त्याने आपले पॅकेज कमी करूनही गायनाची संधी स्वीकारली. केतनने गायलेले अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र असंख्य घरात ऐकले जाते. जर्मन व्यक्तीने केतनला त्याच्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली होती. केतनने स्वत:च्या ‘पॅशन’साठी केलेले काम अभारतीय लोकांमध्येदेखील पोहोचले. आपण भक्ती म्हणून स्तोत्रांकडे पाहतो. पण ते लोक त्यांच्याकडे ‘मेडिटेशन’ म्हणून पाहतात. केतनने ४५० हून अधिक गाणी गायिली आहेत. त्यातील १५० गाणी केतनचे नाव सर्च केले, तरी लगेचच समोर येतात. लोक ‘लाईव्ह’ जास्त ऐकतात. म्हणून त्याने ‘लाईव्ह’ करण्याचा निर्णय घेतला.






पूर्वीच्या काळी ‘सीडी’ दहा लाख विकल्या म्हणजे गाणी गायली हे मोजमाप लावता येत होते. केतनच्या गाण्याला आता ४० कोटींचा व्ह्यू आहे. पण तरीही ते ‘चालले’ असे म्हणता येणार नाही. यशाचे मोजमाप आता बदलले आहे. तरूणपिढीने आता नवीन मार्ग शोधायला हवे आहेत. ‘लाईव्ह’ कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना आणणे हा एक मोठा ‘टास्क’ असल्याचे केतन सांगतो. अशा या हरहुन्नरी गायक आणि संगीतकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
 
@@AUTHORINFO_V1@@