आदर्श लोकप्रतिनिधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Prof Ashok Modak_1 &
मुळात माधवराव काणे यांच्या तलासरीच्या आश्रमात विष्णुजींवर जे संस्कार झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांना जे बाळकडू मिळाले, त्यामुळे जगात कसे वागावे, न्यायाची तसेच माणुसकीची कशी कदर करावी, गृहस्थाश्रमात इतर आश्रमांची काळजी कशी करावी, या व अशा कैक प्रश्नांची समर्पक उत्तरे सवराकुलोत्पन्न विष्णुजींना उपलब्ध झाली. सवरांनी ही जाण आयुष्यभर ठेवली. म्हणजे कृतज्ञता हा लोभसवाणा गुण विष्णु सवरांच्या प्रत्येक व्यवहारात प्रकटत असे. महाभारतात गृहस्थाश्रमाची प्रशंसा करणारा एक श्लोक वाचण्यास मिळतो. विष्णु सवरांनी हा श्लोक खरा करून दाखविला. हा श्लोक असा-
आश्रमात् तुलया सर्वात् धृतान् आहुः मनीषिणः।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रमः एकतः॥
अर्थात, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यांची तुलना केली, तराजूच्या एका पारड्यात गृहस्थाश्रमाला ठेवले व दुसऱ्या पारड्यात इतर तिन्ही आश्रम ठेवले, तर गृहस्थाश्रमाचे पारडे जड आहे असे कळते. कारण, गृहस्थाश्रमात माणूस धन कमावतो आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणाबरोबर इतर आश्रमांचीही काळजी करतो.
विष्णुजी सवरांनी ज्या प्रकारे सगळ्यांची काळजी केली, ती लक्षात घेतली तर महाभारतात ते गृहस्थाश्रमाचे कौतुक सवराजींनी आधुनिक भारतातही सार्थ ठरविले, असे म्हणता येईल. त्यांचा मुलगा हेमंत हा डॉक्टर आहे. त्याने स्वतःच्या तीर्थरुपांचाच वारसा समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे. विष्णुजींच्या निधनानंतर जी अलोट गर्दी त्यांच्या घरी जमली, तिने सिद्ध केले की, सवरा भले भाजपचे असतील, पण त्यांनी आपपरभाव दर्शविला नाही. पक्ष, जात, बँक बॅलन्स अशा कुठल्याही कसोटीचा विचार न करता, सगळ्यांची कामे मार्गी लावण्यात या हेमंतपित्याने नेहमीच प्रशंसनीय पुढाकार घेतला.
स्वतःच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत अत्यंत जागरूक राहून विष्णुजींनी अनेक उलाढाली केल्या. कैक प्रश्न सोडविले. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विविध प्रकारची धावपळ केली. सवरांचा मतदारसंघ आरक्षित होता. केवळ वनवासी नागरिकच उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास पात्र होते. पण, आनंदाची गोष्ट म्हणजे, सवरांनी वनवासी नसलेल्या नागरिकांचीही कामे केली. सन १९३२ मध्ये ‘पुणे करार’ गांधीजींच्या उपस्थितीत शब्दबद्ध झाला. तेव्हा गांधीजी म्हणाले होते, “उमेदवार विशिष्ट जातीचा असला तरी मतदार कुणीही असू शकतो व यामुळे समाजातली घुसळण वाढेल. काय सांगावे, भविष्यात आरक्षित वा राखीव जागाही रद्द होतील. पण, या दिशेने जाण्यासाठी उमेदवारानेच सर्वांशी मिळून मिसळून वागले पाहिजे.” विष्णु सवरांनी गांधीजींचे हे मनोगत जाणले व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कैक विक्रम केले. हेच सवरा मंत्री झाले आणि त्यांनी मंत्रिपदालाही पूर्ण न्याय दिला. पिंड संघाने व माधवराव काणे यांनी घडविला होता. त्यामुळे कुठलाही ताठा नाही, गर्व नाही आणि जनसामान्यांबरोबर लिलया उठबस करण्याची मानसिकता असा माणूस निर्भेळ लोकप्रियतेचा धनी झाला यात आश्चर्य कसले?
साधारणतः सर्व पदे व प्रतिष्ठा आपल्यालाच मिळावी, हा मनुष्य स्वभाव असतो. ‘तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः’ असे म्हणतात. वय वाढले, कालांतराने ते जीर्णशीर्ण झाले तरी तृष्णा किंवा हाव सदाहरीत असते. आणखी काही लाभ पदरात पडलेत, ही आसक्ती काही कमी होत नाही. विष्णु सवरांनी मात्र या मनुष्य स्वभावाशी विपरीत वर्तन केले. समाधान व शांती या गुणांची पूजा करणाऱ्या खरं म्हणजे हे गुण सहजपणे व्यक्त करणाऱ्या विष्णुजींनी सर्व लोकप्रतिनिधींसमोर आगळावेगळा आदर्श उभा केला.
भगवान गौतम बुद्धाने तृष्णा किंवा हाव हेच सगळ्या दुःखांचे, समस्यांचे मूळ असल्याचा मार्मिक सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांताची प्रचिती आपण घेतोच. हाव बाळगणारा माणूस स्वतः तर दुःखी राहतोच, पण स्वतःच्या अवतीभवतीही दुःख पेरत राहतो. विष्णुजींनी कसलीच हाव कधी बाळगली नाही. परिमाणतः त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत राहिले व त्यांच्या आप्तस्वकियांना आणि मित्रमंडळींनाही कधी कुठल्या तक्रारीचा सूर त्यांच्याकडून ऐकण्यास मिळाला नाही. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे...’ या ओळीचा अर्थ विष्णु नामधारकाला कळला नाही, तर अन्य कुणाला कुठून कळणार?
सवराजींनी स्वतःच्या प्रामाणिक कमाईतून वाड्याला घर बांधले. तिथेच आपला संसार थाटला. पण, तलासरीचा आश्रम हे त्यांचे दुसरे घरच होते. याच घराने त्यांच्या जीवनाची जडणघडण केली. जगण्याचे वस्तुपाठ शिकविले, मौखिक मूल्ये मनावर बिंबवली. त्यांना ठाऊक होते की, माधवराव काणे यांनी तलासरीत पदार्पण केले तेव्हा सर्वप्रथम गोदाराणी परुळेकरांना त्यांनी वाकून नमस्कार केला. वस्तुतः परुळेकर पती-पत्नी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि मार्क्सवाद्यांनी संघ, जनसंघाशी हाडवैर करण्याचे व्रत घेतले होते. तरीसुद्धा माधवराव गोदाराणींनी उभ्या केलेल्या तलासरीच्या वास्तूत गेले, सश्रद्ध अंतःकरणाने गेले. कारण, जो कुणी स्वार्थ सोडून परार्थाची पूजा करतो, तो वंदनीय, अभिनंदनीय मानावा, ही डॉक्टर हेडगेवारांची शिकवण माधवरावांच्या रोमारोमांत भिनली होती. ‘जो अन्य कुणाचा कंटाळा करीत नाही आणि अन्य कुणीही ज्याचा कंटाळा करीत नाही, तो माझा आवडता भक्त आहे...’ हे श्रीकृष्णवचन माधवनामक काणेकुलोत्पन्नाने खरे करून दर्शविले. विष्णु सवरा व चिंतामण वनगा हे माधवरावांचे सत्शिष्य अजातशत्रू ठरले. त्याचे रहस्य तलासरीच्या या घरातल्या निवासाकडे जाते. असे होते आपले विष्णु सवरा! त्यांना विनम्र श्रद्धांजली!!
 
- प्रा. अशोक मोडक
@@AUTHORINFO_V1@@