समर्पित कार्यकर्ता : विष्णुजी सवरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Dipak Patil_1  
स्वयंसेवक म्हणून माझ्या जडणघडणीबरोबर सामाजिक व राजकीय जडणघडणीत कै. तात्या लेले (भूतपूर्व संघचालक) व कै. आंबो भोईर (भाजप नेते) यांच्याबरोबर आदरणीय विष्णुजी सवरा साहेबांचा मोलाचा वाटा आहे. विष्णुजींबरोबर माझा पहिला परिचय १९८९ मध्ये झाला. (इ. पाचवी) विष्णुजी मुंबईहून वाड्याकडे निघाले की, रात्री (वाहनाअभावी) मुक्कामी तात्यांकडे बर्‍याचदा यायचे. सुरुवातीस त्यांचा पेहराव लेहंगा, झब्बा व खांद्याला लावलेली शबनम असा असायचा. माझ्या लहानपणी मी निवडणुका आल्या की सवरा व वनगा ही दोन नावे हमखास ऐकायला मिळायची. त्यांचे अनगांववर विशेष प्रेम असायचे. अनगांवच्या विकासात आणि कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून लक्ष द्यायचे.
विधानसभेचे कामकाज कसे चालते, हे मला समजावे म्हणून १९९२ साली मला ते विधानसभेत घेऊन गेले. दोन दिवस त्यांच्या आमदार निवासी मुक्काम झाला. मी पहिल्यांदाच विधानसभा व मुंबई त्यांच्यामुळे पाहिली. त्यानंतर विष्णुजींचा आणि माझा परिचय खूप घट्ट होत गेला. त्यांच्या कार्यक्रमात किंवा घरी कुणीही गेला तरी आतिथ्य असायचे. कार्यकर्ता ते आमदार ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास पाहिला, तर त्यांना अहंकार, गर्व, सत्तेची हाव दिसली नाही. प्रचंड विनम्रता, आदरच पाहायला मिळाला. मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान, पण ते ‘दीपकजी’ म्हणून हाक मारत असत.
 
खूपदा बैठकांमध्ये, वर्गामध्ये, उत्सवात भेट व्हायची. विष्णुजींची २००हून अधिक संघगीते पाठ होती आणि त्यांच्या मधुर आवाजात ती ऐकण्यासही मिळायची. सुंदर मोत्याच्या दाण्यासारखे त्यांचे सुरेख असे अक्षर सर्वांचीच दृष्टी वेधून घ्यायचे. दोन वर्षांपूर्वी प्रकृतीच्या चौकशीसाठी दादा वेदक आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो. गप्पा मारताना त्यांनी सांगितले, “कोणत्याही निवडणुकीसाठी मी तिकीट मागण्यासाठी धडपड किंवा प्रयत्न केले नाही. पक्ष जेव्हा तिकीट देईल, त्यानंतरच मी प्रचारासाठी बाहेर पडत असे.” प्रचंड निष्ठा व कष्ट घेऊन वनवासी क्षेत्रात, मतदारसंघात त्यांना कार्य करताना पाहिले आहे. विष्णुजी अजातशत्रू होते. त्यांनी कधीही कुणाबरोबर शत्रुत्व, वैमनस्य केले नाही. ते मंत्री झाल्यावर माझे एक मित्र त्यांचे साहाय्यक सचिव होण्यासाठी प्रयत्नशील होते. मीही शिफारस केली. परंतु, त्या मित्राचे काही काम झाले नाही. त्यानंतर काही दिवसांनी विष्णुजींनी मला दूरभाष केला की, “दीपकजी, मी मुंबईहून निघालो वाड्याकडे, तर तुम्हाला भेटायचे आहे.” मग मी त्यांना सांगितले, “रस्त्यात कुठेतरी भेटू.”
 
मग ते म्हणाले, “मला आपल्या घरी यायचं आहे” आणि मग त्यांचा सर्व ताफा घेऊन आले. दोन तास गप्पा मारल्या. मी त्यांना उठता उठता विचारले, “साहेब, काही काम होतं का?” ते म्हणाले, “नाही. मी सहज आलो. तुमच्या मित्राचं काही काम करता आलं नाही. मला वाटलं, तुम्ही रागावला असाल.” माझ्या मनाची काळजी घेण्यासाठी त्यांनी मंत्री असताना दोन तास दिले हाही एक विलक्षण अनुभव होता. असे सद्गुणी, निष्ठावान मार्गदर्शक विष्णुजी आज आपल्यात नाहीत. मी त्यांना सर्व स्वयंसेवकांच्यावतीने आदरांजली अर्पित करतो. ‘असू, आम्ही सुखाने पत्थर पायातील’ ही ओळ सार्थ करीत आपण सारे याच दिशेने मार्गस्थ होणे, हीच विष्णुजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
- दिपक पाटील
(लेखक ग्रामविकास प्रमुख- अनगांव,
रा. स्व. संघ, कोकण प्रांत आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@