एक सात्त्विक, समर्पित कार्यकर्ता हरपला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Anil Pathak_1  
सामाजिक कार्य करताना, ज्या समाजाची, ज्या समाजघटकांची आपण सेवा करतो, तो परमेश्वर आहे, परमात्म्याचे रूप आहे, अशी धारणा असली पाहिजे.
सर्वतः पाणिपदं तत्सर्वंतोऽक्षिशिरोमुखम्।
सर्वतःश्रुतिमलोके सर्वमावृत्या तिष्ठति॥
(गीता १३-१३॥)
ज्यांची सेवा करायची, ज्यांना साहाय्य करायचे, ज्यांच्यासाठी कार्य करायचे, तो परमेश्वर परमात्मा आहे, अशी भूमिका असली पाहिजे. आपल्या कार्याने आपण ईशपूजन करीत आहोत, अशी धारणा असली पाहिजे. यासाठी आपल्याकडे ‘समाजपुरुष’ अशी संज्ञा आहे. आपण ज्याला साहाय्य करतो, तो परमेश्वररूप आहे आणि आपण साहाय्य करून त्या समाजघटकावर उपकार करीत नसून, तो परमेश्वर आपल्याला सेवेची संधी देऊन उपकृत करीत आहे, अशी भावना असली पाहिजे. सवरा साहेब ‘समाजपुरुष’ होते. सामान्य लोकांचे आणि लाभार्थ्यांचे आपल्याकडे बारीक लक्ष असते, याची सतत जाणीव सवरा साहेबांना होती. सवरा साहेबांचे विचार हे सर्वस्वी सात्त्विक व सर्वसमावेशक होते. सध्याचा काळ हा व्यक्तीच्या नावाने संस्था अथवा संघटना, अथवा पक्ष ओळखला जाण्याचा आहे. परंतु, अशाही काही मोजक्या कर्तृत्ववान, निःस्वार्थी व निःस्पृह व्यक्ती असतात, ज्या आपले संपूर्ण कर्तृत्व, व्यक्तित्व संघटनेमध्ये, संस्थेमध्ये, पक्षामध्ये विलीन करून टाकतात; नव्हे हीच त्यांची ओळख असते. अशा अगदी मोजक्या निवडक व्यक्तींमध्ये, आपल्या सर्वांचे दादा म्हणजे विष्णुरावजी सवरा साहेब, माजी आदिवासी विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची गणना केली जाते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच दादांचा संपर्क ऋषितुत्य अशा माधवराव काणे यांच्याशी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज दादांच्या आयुष्यात रुजविण्याचे कार्य माधवराव काणे व अप्पा जोशी यांनी केले. संघाच्या मुशीमध्ये कार्य करणारे दादा अंगीभूत गुणांमुळे अधिकच सामाजिक जीवनामध्ये एकरूप, एकरस झाले. दांडगी स्मरणशक्ती असल्यामुळे दादा मंत्री झाले, तरी सामान्य कार्यकर्त्यास नावानिशी ओळखत असत. ते शांत, संयमी, हसतमुख होते. विविध पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘अजातशत्रू’ म्हणून ते पालघर व ठाणे जिल्ह्यांत परिचित होते. सतत वाचन, मनन, चिंतन, लेखन व प्रबोधन करत राहणे हा दादांच्या जगण्याचा स्थायीभाव होता. तरुण कार्यकर्त्यांकडूनही त्यांची अध्ययन, अभ्यासू वृत्तीची अपेक्षा असे, राष्ट्रीय प्रादेशिक प्रश्नाचा अभ्यास करण्याचा त्यांचा आग्रह असे. हिंदुत्वाचे अधिष्ठान असणारा सेवाप्रेरीत असा पीळ असलेला कार्यकर्ता तयार व्हावा, हीच त्यामागची दादांची भावना होती.
कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहिले पाहिजे, आपल्या समाजबांधवांशी, कार्याविषयी विचार-विनिमय केला पाहिजे, त्यांच्या सुख-दुःखामध्ये आपण समरस झाले पाहिजे, असे त्यांना वाटे. कारण, कामाचे मानदंड तयार होत असतात, ते अशा निग्रही कार्यकर्त्यांच्या जगण्यातूनच! दादा हे ध्येयवाद स्वतःच्या आयुष्यात जगून दाखविणार्‍या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या आयुष्याच्या प्रकाशात कितीतरी जीवने उजळली. त्यांच्या जगण्याचे निष्ठापूर्वक अंशतः जरी अनुकरण करण्याचा, आपण प्रामाणिक प्रयत्न केला, तरी त्याचा वारसा सांगण्याला आपण खर्‍या अर्थाने पात्र होऊ असे वाटते. दादांचे पत्रलेखन एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य होते. अनेकांना ते वाढदिवसाचे आवर्जून पत्र पाठवित. मित्रमंडळींच्या आयुष्यात चांगली गोष्ट घडली की, दादांचे कौतुकाचे पत्र त्यांना जायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नकळत आपलेपणाचा, प्रेमाचा, ममत्वाचा भाव निर्माण होत असे. दुर्दैवी घटना कार्यकर्त्यांच्या घरी घडली की, त्यांचे सांत्वनाचे पत्र हमखास जायचे. त्यामुळे दादांचा अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होत असे. प्रचंड जनसंपर्क असणारे दादा एक प्रभावी नेते व वक्ते होते. तरुण कार्यकर्त्यांशी प्रेरक संवाद साधणे व त्यांना कार्याशी जोडून घेणे, हे दादांना सहज जमत असे. विष्णु सवरा यांनी वनवासींच्या उत्थानासाठी आपले सर्व आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्ती असलेले दादा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत. उत्तम संघटक असलेले दादा विधीमंडळाचे अनुभवी सदस्य होते. दादांच्या निधनामुळे, वनवासी बांधवांच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्‍या जीवनाचा अस्त झालेला आहे. आपल्या बुद्धीचा, कार्याचा, कल्पकतेचा वापर दादांनी वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केला. आदिवासी विकास खात्याचे मंत्री असताना, वनवासी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांना भावपूर्व श्रद्धांजली
- अनिल पाठक
@@AUTHORINFO_V1@@