स्त्रीशिक्षणाच्या शिल्पकार ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021
Total Views |

Savitribai Phule_1 &
महाराष्ट्रातील महान कर्ते समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या संघर्षमय कार्यात सावलीसारखी साथ देणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग अतुलनीय असा आहे. ज्या काळात स्त्रीला मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला दुर्लक्षित केले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते, ते सामान्य म्हणून जगतात. पण, बोचऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि स्वतःच्या सुखाची पर्वा न करता दुर्बलांच्या सुख, समृद्धी, स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन जे सर्वस्व पणाला लावतात, ते असामान्य होतात. आपल्या देशाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणाऱ्या महान कर्तृत्वाच्या धनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशाच असामान्य ज्ञानगंगोत्री होत्या. खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीशिक्षणाच्या शिल्पकार म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली आहे.
 
क्रांतिज्योती सावित्री जगी अवतरली
नारीसाठी जन्मभरी संसारी झुंजली
अज्ञानाच्या तिमिरी होती दुर्बल ती नारी
हाती पाटी देऊन नेली नाव पैलतीरी
तो काळ इंग्रजी सत्ता स्थिरावण्याचा होता. पेशवाई नुकतीच लयास जाऊन लाचारीचे पारतंत्र्य नशिबी आले होते. बहुतांशी समाजाला अंग्लाई अंगवळणी पडली होती. सनातन्यांचे स्तोम माजले होते. देव आणि धर्माच्या नावाने वर्चस्व गाजविण्यासाठी धर्ममार्तंड उन्मत्त झाले होते. दुबळ्या स्त्री, शूद्रांवर लाचारीचे जगणे लादले जात होते. स्त्री, शूद्रांना कवडीमोल समजून धर्ममार्तंड मनमानी करत होते. या काळात स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू होती. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. तिने शिक्षण घेणे पाप समजले जाई. ती काहीही मागू शकत नव्हती, तसेच ‘नाही’ म्हणण्याचा तिला अधिकारही नव्हता. पुरुषप्रधान व्यवस्थेने घालून दिलेल्या चाकोरीमध्ये सांदिकोपऱ्यात आयुष्य काढायचे एवढेच तिच्या हाती होते. यंत्राप्रमाणे धावत आणि झिजत जगायचे स्त्रिच्या नशिबी होते. भारतीय परंपरेने स्त्रियांना कायमच जोखडात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. एकूणच स्त्रीस्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या काळात सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडूजी नेवसेपाटील यांच्या पोटी ३ जानेवारी, १८३१ रोजी झाला. वयाच्या नवव्या वर्षी इ. स. १८४० मध्ये जोतिबांबरोबर त्यांचा विवाह झाला. ज्ञानासाठी आतूर असलेले दोन तेजस्वी जीवनप्रवाह एक होऊन त्यांनी आदर्श वैवाहिक जीवनाचा पाया रचला. संसारापेक्षा समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न उभयतांनी आयुष्य खर्ची घालून केला. जोतिबांच्या प्रेरणेने सावित्रीबाई शिकल्या. आपल्या अडाणी माय-भगिनी, बांधवांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक अनन्यसाधारण घटना घडली. १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथे भिडे वाड्यात फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा काढली. सनातन्यांचा विरोध पत्करून सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. सनातनी हलकल्लोळ माजवित, ‘कलियुग आले, धर्म बुडाला’ अशी ओरड करू लागले. त्याला न जुमानता बेडरपणे फुले दाम्पत्याने आपले कार्य सुरूच ठेवले. अपमान, अवहेलना, कर्मठांच्या छळाला शांतपणे तोंड देत सावित्रीबाई संघर्ष करीत होत्या. एक दिवस आपण सुरू केलेल्या कार्याचा स्वीकार होईल, असा त्यांना विश्वास होता. बायकांनी शिकणे हे पाप आणि त्यांना शिकविणे अतिभयंकर महापाप, असे त्यावेळी समजले जाई. प्रवाहाविरोधात सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्याचे काम अव्याहतपणे, व्रतस्थ भावनेने सुरूच ठेवले. सातासमुद्रपार राणीच्या दरबारात सावित्रीबाईंची कीर्ती पोहोचली. इंग्रज सरकारने १८५२ मध्ये मेजर कॅण्डी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा जाहीर सत्कार केला. स्त्रीशिक्षणासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई यांनी आपल्या पतीच्या महान कार्यात संपूर्ण साथ दिली. सेवाव्रताबरोबरच आपल्या कवी मनाला रुचणाऱ्या कविता, अभंगही शब्दबद्ध केले. आपल्या कवितांमधून स्त्री, शूद्र, उपेक्षितांना शिक्षणाचे मोल, महत्त्व तत्त्ववेत्त्वाला शोभेल, अशा शब्दातून साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले. ‘शूद्रांचे दुखणे’ या कवितेत शिक्षणाचे महत्त्व विशद करताना-
शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा।
शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हाटते पाहा॥
अशा मार्मिक शब्दात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
शिक्षणाबरोबरच सावित्रीबाईंनी स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तिच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. विधवा विवाह, केशवपन, आत्महत्या व भ्रूणहत्या पीडित महिलांसाठी कार्य केले. बालहत्या प्रतिबंधकगृह समर्थपणे चालविले. या बालगृहात जन्मलेल्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला आणि त्यास डॉक्टर बनविले. समाजाने अनन्वित छळ केल्यानंतरही कुणाबद्दलही रोष ठेवला नाही. समाजकंटकांकडून होणारा शेण, चिखलाचा मारा हा आपल्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी फुलांचा वर्षाव असल्याचे फुले दाम्पत्य मानत होते. ते फक्त बोलके सुधारक नव्हते, तर कृतिशील समाजसुधारक होते. आपल्या अजोड कार्यकृतीतून फुले दाम्पत्याने कर्तृत्वाचा ठसा उमटविला, म्हणून सार्थ अभिमानाने म्हणावेसे वाटते, ‘धन्य ती सावित्री, धन्य ते जोतिबा.’
आज ऑटोचालक ते अंतराळवीरापर्यंत आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या स्त्रीशक्तीच्या सुखावह झालेल्या जगण्यामागे सावित्रीबाईच्या त्यागाचा, बलिदानाचा, अजरामर इतिहास आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक वाईट ते टाकून देऊन मनुष्याला जगण्याचा अधिकार मिळावा ही सज्जनांची धडपड असते. त्यासाठी स्वतःच्या घराची, आयुष्याची राखरांगोळी झाली तरी त्यांना त्याची तमा नसते. ‘जोतिबा-सावित्री’ हे त्याच न्यायाने समाजाच्या कल्याणासाठी अखंडपणे धडपडत राहिले. जोतिबांच्या सेवाकार्याबरोबर ‘सत्यशोधक’ मार्गातही तेवढीच तोलामोलाची साथ सावित्रीबाईंनी दिली. पती निधनानंतरही ‘सत्यशोधक’ समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. लोकशिक्षणासाठी ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’सारखे काव्यसंग्रह लिहिले. दुष्काळात माणुसकी हरवून बसलेल्या समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. १८९६-९७ दरम्यान पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले, माणसं पटापट मरू लागली. अशा संकटसमयी सावित्रीबाई दीनदुबळ्यांसाठी आधार बनल्या. पुणे येथे ससाणे यांच्या मळ्यात त्यांनी मुलगा डॉक्टर यशवंतला घेऊन दवाखाना सुरू केला. पीडित रुग्णांवर उपचार केले. त्यांना मायेचा आधार दिला. तो आधार देतादेता स्वतःच्या आयुष्याची जराही फिकीर केली नाही. इतरांच्या जीवनज्योतींना हाताचा आडोसा धरताना सावित्रीबाईंच्या हातांना लागलेली धग कोणालाच जाणवली नाही. त्या मायमाउलीवर प्लेगने झडप घातली. असामान्य जीवन जगणारी ही माउली अखेर सामान्यांच्या प्रवाहात त्यांच्यासारखीच होऊन त्यांच्यासाठीच १० मार्च, १८९७ रोजी अनंतात विलीन झाली. त्यांच्या थोर सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता म्हणून राज्य शासनाने दि. ३ जानेवारी, १९९५ पासून सावित्रीबाईंचा जन्मदिन हा ‘स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून जाहीर केला आहे. अलीकडेच विद्यमान राज्य सरकारने यापुढे ३ जानेवारी हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. स्त्रीशिक्षणाची शिल्पकार ज्ञानगंगोत्री सावित्रीबाईंचे चिरंतन स्मरण याद्वारे होत राहील. अनंतकाल भारतीय समाजावर सावित्रीबाईंचे ऋण राहणारच आहेत, यात शंका नाही. अशा त्यागमूर्ती ज्ञानाईच्या लेकी शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य, त्यांची क्रांतिज्योत सतत तेवत ठेवोत एवढीच अपेक्षा.
साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जहाल
ज्योत लावलीस तू, साऊ वणवा मी पेटवीन
तू कोरलेल्या अक्षरांचं
हे दान मनामनात मी गिरवीन।
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन
 
- राखी रासकर
@@AUTHORINFO_V1@@