मरावे परी कीर्तीरूपी उरावे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2020
Total Views |


Dean jones_1  H

अभ्यासू समालोचक आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू अशी ओळख असेलेले ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



क्रिकेट हा खेळ केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील एकूण १०४ देशांनी क्रिकेटला पसंती दिली असून फुटबॉलनंतर जगभरात प्रसिद्ध असणारा हा दुसरा जागतिक खेळ. फुटबॉलचे जगभरात जवळपास ३.५ अब्जांहून अधिक चाहते आहेत, तर क्रिकेटचे २.५ अब्जांहून अधिक चाहते असून या खालोखाल हॉकीचाही खेळ जगभरात प्रसिद्ध आहे. हॉकीचे जवळपास दोन अब्ज चाहते असून टेनिसचे एक अब्ज चाहते आहेत.


 
क्रिकेटच्या ‘विश्वचषक’ स्पर्धेत आघाडीच्या दहा ते बारा मुख्य संघांना जरी सहभागी होता येत असले, तरी क्रिकेटचा विस्तार हा संपूर्ण जगभरात पसरलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, भारतात सर्वाधिक क्रिकेटचेच चाहते असून हा भारतीयांच्या रक्तातील खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये भारताचा एक वेगळा दबदबा असून भारतीय खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. भारतीयांप्रमाणेच काही परदेशी क्रिकेटपटूंनीही आपल्या नावावर अनेक विक्रम कोरले आहेत. त्यामुळे जगभरात अशा खेळाडूंची नावे कायम स्मरणात ठेवली जातात. ते हयात असताना त्यांना सर्व स्तरांतून मानसन्मान तर दिलाच जातो. मात्र, मरणोपरान्तही अशा खेळाडूंची जगभरातून आठवण काढली जाते. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू डीन जोन्स हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. १९९०च्या दशकातील चपळ क्षेत्ररक्षक आणि आघाडीचे फलंदाज म्हणून नावलौकिक असणारे डीन जोन्स यांचे गेल्या आठवड्यात मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेच्या समालोचनासाठी मुंबईत आले असताना त्यांना सामन्यांच्या काही क्षणाआधी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर १९९०च्या दशकात क्रिकेट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार्‍या डीन जोन्स यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. असे खेळाडू क्रिकेटविश्वाला पुन्हा मिळणे कठीण असल्याचे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.


 
डीन जोन्स हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत ते जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांपैकी एक मानले जायचे. कसोटी क्रिकेटमध्ये आपले महत्त्व सिद्ध करूनही ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक डीन जोन्स एकदिवसीय प्रकारातील फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणासाठी विशेष ओळखले जात. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा ते आत्मविश्वासाने सामना करत. एकेरी-दुहेरी धावा काढताना जोखीम घेण्याची त्यांची वृत्ती लक्षवेधी होती. १९८४ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यादरम्यान ग्रॅहम यॅलप यांनी संपूर्ण दौर्‍यातून दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोन्स यांना ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले. गॅॅ्रहम यॅलप यांची उणीव डीन जोन्स यांनी भरून काढली. मात्र, यॅलप दुखापतीतून सावरल्यानंतर जोन्स यांना संघात पुनरागमन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ दुखापतग्रस्त झाल्याने डीन जोन्स यांना एका कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.


 
१९८६ मध्ये चेन्नईच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारताविरोधात जोन्स यांनी २१० धावांची संस्मरणीय खेळी साकारून कसोटी क्रिकेटमधील स्थान भक्कम केले. उष्म्याचा त्रास होत असलेले जोन्स मैदान सोडण्याच्या तयारीत होते. मात्र, कणखर कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी त्यांना खेळण्यास भाग पाडल्यानंतर जोन्स यांनी साकारलेली झुंजार खेळी ही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतात नोंदवलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्यानंतर १९८७ मध्येही भारतात झालेल्या ‘रिलायन्स विश्वचषक’ स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या अनपेक्षित जेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आघाडीची फळी. सलामीवीर डेव्हिड बून आणि जेफ मार्शनंतर तिसर्‍या क्रमांकावर जोन्स फलंदाजीला उतरत. या स्पर्धेत जोन्स यांनी ४४च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह ३१४ धावा केल्या. १९९२च्या ‘विश्वचषका’तही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली सरासरी राखूनही त्यांना संघातून वगळण्यात आले. १९९४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली, तेव्हा त्यांच्या खात्यावर १६४ सामन्यांत ४४.६१च्या सरासरीने सात शतके आणि ४६ अर्धशतकांच्या बळावर ६,०६८ धावा जमा होत्या. मग काही काळानंतर त्यांनी लीग स्पर्धांमधील प्रक्षिक्षकाची जबाबदारी सांभाळली. एक उत्तम समालोचक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. ‘विश्वचषक’ सामने, लीग स्पर्धा आदींमध्ये त्यांनी समालोचन आणि प्रशिक्षकपदाची आपली भूमिका चोखपणे पार पाडत, त्यांनी जगभरात आपली स्वतःची ओळख निर्माण केली. जगभरात ते क्रिकेट प्रशिक्षक आणि अभ्यासपूर्ण समालोचक म्हणून प्रसिद्ध होते. अशा या ज्येष्ठ क्रिकेटपटूने गेल्या आठवड्यात अचानकपणे जगाचा निरोप घेतला. मरावे परी कीर्तीरूपी उरावे!असे त्यांचे जीवन असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. डीन जोन्स यांना ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम...!
 

- रामचंद्र नाईक

 
 
@@AUTHORINFO_V1@@