नित्य असो तीन देवींचा वास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020
Total Views |
1_1  H x W: 0 x




आम्ही पौराणिक पद्धतीनुसार देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती करून उभ्या करतो. पण, त्यातून बोध घेण्यास मात्र विसरतो. या मंत्रात इडा, सरस्वती व मही या तीन देवींचे माहात्म्य ओळखून त्यांना जीवनात धारण करण्याचा, म्हणजेच आपल्या अंत:करणात त्यांची स्थापना करण्याचा संदेश मिळतो.



इडा सरस्वती मही तिस्रो देवीर्मयोभुव:।
बर्हि सिदन्त्वस्रिध:॥(ऋग्वेद- १/१३/९).


अन्वयार्थ
(इडा) स्तुतीयोग्य, प्रशंसनीय अशी मातृसंस्कृती ,(सरस्वती) मातृभाषा किंवा ज्ञानयुक्त वाणी व (मही) मातृभूमि या (अस्त्रिध:) हिंसारहित, कोणालाही त्रस्त न करणार्‍या आणि (मयोभुव:) सर्वांचे कल्याण साधणार्‍या, सुख प्रदान करणार्‍या (तिस्र: देवी:) तीन देवी, माता (बर्हि:) आमच्या घराघरांत, अंत:करणात (सिदन्तु) निवास करोत, आम्हाला प्रकाशित करोत.

विवेचन
आपला आर्यावर्त देश आणि येथील संस्कृती, सभ्यता व परंपरा या मुळातच मातृस्वरूपा आहेत. म्हणूनच समग्र जगात या मातारुपी मूल्यांचा नेहमीच आदर व सन्मान होतो आहे. ‘मातृ देवो भव!’ हा उद्घोष सर्वात अगोदर याच पुण्यभूमीत रुजला आणि तो जगाच्या कानाकोपर्‍यात पसरला. सदरील मंत्रात तीन देवींचा गौरव करण्याचा उपदेश दिला आहे. ‘दिव्’ या धातूपासून ‘सद्गुणांनी चमकणे’ किंवा ‘ज्ञानाने प्रकाशित होणे’ या अर्थाने बनलेल्या देवी या स्त्रीलिंगी शब्दातून आम्हाला बराच ज्ञानबोध होतो. तीन प्रकारच्या देवींचे आमच्या अंतःकरणात किंवा प्रत्येक घराघरांमध्ये वास्तव्य असो! ज्यामुळे आम्हा सर्वांचे जीवन सुखी व आनंदी होईल आणि ही जीवनयात्रा अगदी यशस्वीरित्या संपन्न होईल. असा दिव्य संदेश वरील मंत्रातून अभिव्यक्त होतो. आम्ही पौराणिक पद्धतीनुसार देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती करून उभ्या करतो. पण, त्यातून बोध घेण्यास मात्र विसरतो. या मंत्रात इडा, सरस्वती व मही या तीन देवींचे माहात्म्य ओळखून त्यांना जीवनात धारण करण्याचा, म्हणजेच आपल्या अंत:करणात त्यांची स्थापना करण्याचा संदेश मिळतो. या महान देवींचा आदर व सन्मान केल्यास, जगात सर्वत्र शांतता नांदेल व प्रत्येक मानव सुखी व आनंदी बनेल.


यातील पहिली आहे - ‘इडा !’ जी स्तुती किंवा प्रशंसा करण्यास योग्य असते, ती ‘इडा’ होय. हिलाच सभ्यता किंवा संस्कृती असेही म्हटले जाते. अशा या संस्कृतीचा उदय झाला, तो आर्यावर्त भूमीतून! वेदज्ञानाने नटलेली ही संस्कृती अतिशय उदात्त आहे. अगदी प्राचीन काळापासून या संस्कृतीने समग्र विश्वाला ज्ञानयुक्त जगण्याचे बळ दिले. मानवतेचा सुगंध याच संस्कृतीतून दरवळला. विश्वासाठी वंदनीय ठरणारी ही संस्कृती जगात सर्वोच्च क्रमांकाची पहिली संस्कृती मानली जाते. यजुर्वेदात म्हटले आहे - ‘सा प्रथमा संस्कृति: विश्ववारा...।’ जगातील प्रत्येक मानवाकडून स्वीकारण्यायोग्य पहिली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. याच संस्कृतीमातेने एक ईश्वर, एक धर्म, एक मानव जात, एक उपासनापद्धती, एक आध्यात्मिक विद्या, एकसारखी जीवनमूल्ये मानवता सच्चारित्र्य, परोपकार, सेवा आदी तत्त्वेे जगाला बहाल केली. ‘वसुधैव कुटुम्बकम्।’ या उदात्त विचाराची संकल्पना याच संस्कृतीची देणगी! मानवसमूहासोबतच मानवेतर प्राण्यांशीदेखील मैत्रीचेे नाते जोडण्याचा संदेश देणारी ही महान संस्कृती! सर्वांशी आपुलकीचे नाते जोडत बंधुभावनेने व्यवहार करण्याचा बोध मिळतो, तो याच संस्कृतीतून! एक विचाराने व एकमनाने जीवन जगत ‘जिओ और जीने दो!’ हा आदर्शवाद या वैदिक संस्कृतीचा गाभारा आहे. खरेतर हिला ‘भारतीय संस्कृती’ न म्हणता ‘वैदिक संस्कृती’ असेच म्हटले पाहिजे. कारण, भारतीय संस्कृती ही सध्या ‘खिचडी संस्कृती’ बनली आहे, जिच्यामध्ये एकवाक्यता मुळीच नाही. सर्व मत-पंथांची (धर्मांची) भेसळ हिच्यामध्ये झाल्याने हिचे मूळ स्वरूप विकृत गेले व आजही होत आहे. महाभारतानंतर अविद्या व अंधश्रद्धांचे वारे वाहिले व नानाविध संप्रदायांची निर्मिती झाली. त्यातच अनेक विदेशी आक्रमणे झाल्याने या वैदिक संस्कृतीच्या मूल्यांवरच मोठा आघात झाला. त्यांनी या संस्कृतीला संपविण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे संपली नाही. तिचे अस्तित्व काही प्रमाणात का होईना टिकून आहे. असे असले तरी या संस्कृतीच्या भग्न अवशेषांचे जतन करीत त्यांना संवर्धित केले पाहिजे. आज इतर देश मोठ्या प्रमाणात प्रगती करून आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यसंपन्न बनण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी संस्कृती अधिष्ठान नसल्या कारणाने त्यांची ही प्रगती अर्धवट मानली जाते. खरेतर इतर देशांना संस्कृतीच नाही. आज जी काही सांस्कृतिक व आध्यात्मिक बीजे तिथे आढळतात, त्यांचे मूळ याच वैदिक संस्कृतीतून तिथे गेल्याचे ऐतिहासिक पुराव्यानिशी दृष्टीस पडते. म्हणूनच या वैदिक मातृसंस्कृतीचे रक्षण व संवर्धन प्रयत्नपूर्वक करावयास हवे.


दुसरी देवी म्हणजे मातृभाषा होय. हिलाच ‘ज्ञानसंपन्न अशी वाणी’ असेही म्हणतात. आपल्या व्यवहाराचे सर्वात निकटचे माध्यम हे भाषा असते. शुद्ध, स्पष्ट व मधुर वाणीने युक्त अशी व्यवहारभाषा ही त्या राष्ट्राच्या प्रगतीचे गमक असते. ज्या भाषेतून सर्वप्रथम ज्ञानाची उत्पत्ती झाली ती म्हणजे वैदिक संस्कृत होय. प्राचीन काळी सर्वत्र हीच वैदिक भाषा प्रचलित होती, नंतर ती लौकिक संस्कृत बनली. पुढे चालून याच संस्कृत भाषेपासून इतर भारतीय भाषा उदयास आल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार केला खरा! पण, दाक्षिणात्य राज्ये हिला स्वीकारावयास तयार नाहीत. संस्कृत भाषेला मात्र उत्तर असो की दक्षिण, पूर्व असो की पश्चिम सर्वच राज्ये स्वीकारायला तयार आहेत. कारण, व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुद्ध व वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण भाषा म्हणून संस्कृतची एक वेगळी ओळख आहे, हे आता जागतिक पातळीवरील भाषातज्ज्ञांनी, वैज्ञानिकांनी व चिंतनशील अभ्यासकांनीदेखील मान्य केले आहे. इतकेच काय, तर ‘नासा’सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेनेदेखील या भाषेला सर्वाधिक उपयुक्त भाषा म्हणून जाहीर केले आहे. अशाप्रकारे ज्ञान-विज्ञानाचे मूलभूत केंद्र व सर्व भाषांची जननी म्हणून जो संस्कृतचा गौरव झालेला आहे, तोच हिला दिव्य (देव)भाषेच्या रूपाने सर्वोच्च स्थानी पोहोचवतो. राष्ट्रीय पातळीवरून व्यापक स्वरूपात संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार झाल्यास या राष्ट्राला ‘मातृभाषा’ किंवा ‘राष्ट्रभाषा’ म्हणून संस्कृत ही समर्थ पर्याय ठरू शकते. सदरील वेदमंत्रात हिला ‘सरस्वती’ संबोधले आहे. सरस म्हणजे ज्ञानप्रवाह किंवा ज्ञानरसाने युक्त असणे...! या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण असते ती संस्कृत होय...! संस्कृृत असो हिंदी, या मातृभाषेचा गौरव झालाच पाहिजे. ही देवी सरस्वती आम्हा सर्वांसाठी आदरयुक्त आहे.


तिसरी देवी म्हणजे ‘मही’ होय. हिलाच ‘भूमिमाता’ किंवा ‘राष्ट्रमाता’ म्हणून संबोधले जाते. मागील मंत्रात राष्ट्रभूमीचे वर्णन विस्ताराने झाले आहे. याप्रसंगी एवढेच सांगणे की, ज्या देशात आम्ही राहतो, वावरतो बागडतो आणि सर्वांगीण प्रगती साधतो, ती भूमिमाता आम्हा सर्वांकरिता सदा सर्वदा वंदनीय ठरते. प्रभू श्रीरामांनीदेखील मोठ्या उदार अंतकरणाने माता व मातृभूमीचे स्थान हे नेहमीच सर्वोच्च मानले आहे. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी।’ म्हणजेच जन्मदात्री आई व जन्मभूमी या दोन्ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतात. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी देशवासीयांनी तत्पर राहिलेच पाहिजे, ही राष्ट्रदेवता आम्हा सर्वांसाठी खर्‍या अर्थाने पालिका व पोषिका आहे. तिच्यामुळे आमचा भूतकाळ उज्ज्वल झाला, वर्तमान घडतोय आणि भविष्य उजळेल म्हणून या राष्ट्रदेवीची आराधना प्रत्येक भूमिपुत्राने करणे हे प्राधान्याने आद्य कर्तव्य आहे.


मंत्रात वर्णिलेल्या तिन्ही देवी आम्हा देशवासीयांचे सर्वदृष्ट्या कल्याण साधणार्‍या आहेत. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या हृदयमंदिरात भक्तिभावनेने यांची पूजा मांडावी व घरोघरी यांचा सन्मान व्हावा, हीच सदिच्छा!!


- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य


@@AUTHORINFO_V1@@