उत्स्फूर्त प्रतिक्रिया कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |

agralekh_1  H x



माजी नौैदल अधिकार्‍याला झालेल्या मारहाणीमुळे बादशहावरील टीकेनंतर डोक्यात राख घालून उधळलेल्यांची भूमिका त्याने पोसलेली शिव‘सेना’ वठवताना दिसते! किंवा २०१५ साली पॅरिसस्थित ‘शार्ली हेब्दो’ साप्ताहिकाने मोहम्मद पैगंबरावर व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने धर्मांध मुस्लिमांनी त्यावर हल्ला केला, तसाच प्रकार शिवसैनिकांनीही आपल्या मालकाच्या व्यंगचित्रावरून केला.


जीवावर उदार होऊन राष्ट्ररक्षणासाठी लढणार्‍या सैनिकांप्रति संपूर्ण विश्व आणि विश्वातील प्रत्येक देश कृतज्ञभाव बाळगतो. मात्र, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला ते मान्य नाही आणि हेच शुक्रवारी मुंबईतील एका निवृत्त नौदल अधिकार्‍याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीतून सिद्ध झाले. कोणीतरी चितारलेले व्यंगचित्र केवळ सोशल मीडियावर फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना आठ-दहा शिवसैनिकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवले. धक्कादायक म्हणजे, माजी नौैदल अधिकार्‍याला केलेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही. उलट मदन शर्मा यांना मारणार्‍या शिवसैनिकांना जामिनावर सोडून देण्याची तत्परता दाखवण्यात आली आणि त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन केले. निवृत्त नौदल अधिकार्‍याला केलेली अमानुष मारहाण शिवसैनिकांची संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे राऊत म्हणाले. मोगलाई यापेक्षा निराळी असते काय? हा प्रश्न इथे विचारावासा वाटतो आणि बादशहावरील टीकेनंतर डोक्यात राख घालून उधळलेल्यांची भूमिका त्याने पोसलेली शिव‘सेना’ वठवताना दिसते! किंवा २०१५ साली पॅरिसस्थित ‘शार्ली हेब्दो’ साप्ताहिकाने मोहम्मद पैगंबरावर व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने धर्मांध मुस्लिमांनी त्यावर हल्ला केला, तसाच प्रकार शिवसैनिकांनीही आपल्या मालकाच्या व्यंगचित्रावरून केला. ‘शार्ली हेब्दो’ आणि मदन शर्मा यांच्यावर हात उगारण्याचे कृत्य एकच दर्शवते, ‘हम करे सो कायदा!’ मात्र, हे किती दिवस चालणार? जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत आणि ती संपली की, संविधान व कायद्याच्या राज्याची राजरोस पायमल्ली करणार्‍या उद्धव ठाकरेंचे अन्यायी-अत्याचारी तख्त उलथवायला जनता अजिबात मागे-पुढे पाहणार नाही. जनतेची ती प्रतिक्रियादेखील संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त असेल, हे सत्ताधार्‍यांनी लक्षात ठेवावे.



एका निवृत्त आणि वयोवृद्ध नौदल अधिकार्‍याला हाणामारी करताना शिवसेनेने आपला इतिहासही अरबी समुद्रात बुडवल्याचे स्पष्ट होते. ‘शिवसेना’ संस्थापक बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम आणि एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून उभे ठाकल्यानंतरही व्यंगचित्रकारच होते. व्यंगचित्रकला बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनाचे अभिन्न अंग होते. तसेच देशाचे सीमारक्षण करणार्‍या सैनिकांचा बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सन्मानच केला. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका अतिशय प्रखरतेने मांडली. पाकिस्तानच्या, दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील भारतीय सैनिकांच्या हौतात्म्यानंतर बाळासाहेबांइतके आक्रमक मत कोणीही मांडले नसेल. आज मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारांच्या चिंधड्या एका व्यंगचित्रावरून निवृत्त नौदल अधिकार्‍याला मारहाण करून शिवसैनिकांनी उडवल्या, याहून त्यांचा भयंकर अपमान तो काय असू शकतो? त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे आपल्या संबोधनात झाल्या प्रकाराबद्दल शब्दही काढत नाहीत, अन्यायग्रस्त सैनिकाची साधी विचारपूसही करत नाहीत आणि पक्षप्रवक्ते हल्ल्याची वकिली करतात, हे पाहून बाळासाहेबांनाही खेद वाटला असेल, याचसाठी का केली होती शिवसेनेची स्थापना? संजय राऊत यांच्या मते शिवसैनिकांची ही संतप्त आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पण, मग अशीच संतप्त आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देशविघातक लोकांविरोधात शिवसैनिकांतून निघाली पाहिजे. चालू घडामोडीतलाच एक विषय म्हणजे अनधिकृत बांधकामे. मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मालमत्ता आहे आणि तिच्या निष्कासनाचे न्यायालयीन आदेशही आहेत. अर्थात शिवसैनिक कायदा वगैरे मानत नाहीतच, त्यामुळे ते बांधकाम उद्ध्वस्त करण्यासाठी का शिवसेना पुढे सरसावत नाही? उलट ‘सामना’तच दाऊदशी संबंध असल्याची बातमी आलेली व्यक्ती आज उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आहे. कसाबच्या बचावासाठी बोलणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरणार्‍यांना ‘जालियनवाला बागे’तील हुतात्मे ठरवतात. यावर संतप्त आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया कधी येणार?


पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध फुटतो, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, राऊत यांनी स्वैराचारावरून ज्ञान देणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को,’ यासारखेच. कारण ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वैराचारा’ची सीमारेषा न ओलांडण्याचे भान संजय राऊत यांनी कधी बाळगलेय? आज स्वतःवर, स्वतःच्या पक्षावर, स्वतःच्या मालकावर जनभावना व्यक्त होते तर घटनात्मकतेचे नाव पुढे करून राऊत स्वैराचार करू नये, असे प्रवचन देतात. पण, पंतप्रधानाला ‘चोर’ म्हणणार्‍या पक्षाबरोबर ते कसे सत्तेत आहेत? हे झाले मित्रपक्षाचे. पण, देशाच्या पंतप्रधानाला अफझल खान आणि त्यांच्या नेते-कार्यकर्त्यांना अफझल खानाची फौज कोण म्हणाले होते? उद्धव ठाकरेच ना, तेव्हा तो स्वैराचार नव्हता? मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांवर ‘सामना’तून गरळ ओकताना संजय राऊतांनी कधी विचार केला का? आताही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना शिवसेनेला घटनात्मक पद आठवले का? तर नाही, कधीच नाही, उलट या सगळ्यांचेच ‘ठाकरे शैली’ किंवा ‘शिवसेना स्टाईल’ म्हणून कौतुक करण्यात आले. त्यामुळे संजय राऊत यांनी इतरांना स्वातंत्र्य आणि स्वैराचारावर भाषणे देण्यापेक्षा आपण काय काय करून ठेवले, ते पाहावे. तसेच एका माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण झाल्यानंतर एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा झोडणारे बुद्धिजीवी, विचारवंतही एक तर चिडिचूप आहेत वा बोललेच तर हातचे राखून बोलत असतील. असे का? तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बोंबाबोंब फक्त भाजप किंवा भाजप सरकारविरुद्ध करायची असते. जिथे भाजप सत्तेत नसेल, तिथे नव्हे, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी पडला तरी चालेल. पण, अवाक्षरही काढायचे नसते. महाराष्ट्रात तर शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तथाकथित रखवालदारांना ‘संविधान’ अजिबात आठवणार नाही. पण, सर्वसामान्य जनतेला सगळे दिसत-आठवत आहे आणि याचे उत्तर वेळ येताच ती देणारही आहे.

@@AUTHORINFO_V1@@