अमेरिका आणि रशिया किंवा ‘नाटो’ आणि ‘डब्ल्यू.टी.ओ.’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


NATO vs WTO_1  



आपली हेर व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, हे सोव्हिएत रशियाच्या लक्षात आल्यामुळे तो कोसळला. म्हणजे ‘नाटो’वर मात करण्याची त्याची स्थिती राहिली नाही, एवढंच. इतरांसाठी तो अजूनही महाशक्ती होताच.


गेल्या आठवड्यात ‘विश्वसंचार’ स्तंभातला ‘ब्रेनड्रेन....’ हा मजकूर वाचून अनेक परिचित-अपरिचित वाचकांनी अशी विचारणा केली की, १९८३ साली सोव्हिएत रशिया कोसळला असं तुम्ही म्हणता; पण रशिया तर चांगला बलवान आहे. एवढंच नव्हे, तर खुद्द भारतानेही अलीकडेच ‘एस-४००’ ही अत्याधुनिक विमानविरोधी हत्यारं रशियाकडून खरेदी केली आहेत. मग रशिया विज्ञान-तंत्रज्ञान मागास आहे, असं तुम्ही का म्हणता?


या विचारणा झाल्यावर पहिली गोष्ट म्हणजे मला आनंद झाला. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा वाचक सजग आहे, सावध आहे. बड्या इंग्रजी वृत्तपत्रांत किंवा त्यांच्याच मराठी भावंडांत जे छापून येईल, ते ब्रह्मवाक्य असं साधारणपणे वाचक मानत असतात. हल्ली हा ‘मान’ व्हॉट्सअप उर्फ ‘काय अप्पा’ या बाजारगप्पांच्या जागतिक अड्ड्याने पटकावला आहे. पण, दै. ‘मुंबई तरुण भारत’चा वाचक सावधपणे प्रतिप्रश्न विचारतो आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. आता या प्रश्नाकडे पाहूया. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी २३ मार्च, १९८३ या दिवशी ‘स्टार वॉर’ची घोषणा केली आणि सोव्हिएत रशिया कोसळला. म्हणजे नेमकं काय झालं? आज या गोष्टीला तब्बल तीन तपं म्हणजे ३७ वर्षं उलटून गेली आहेत. म्हणजेच, जे वाचक आज ५० किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, त्यांनी तो काळ प्रत्यक्ष अनुभवला आहे. आधुनिक जगाच्या इतिहासाच्या प्रवाहाने एक फार मोठं वळण घेतलं. पण, समाजाची स्मरणशक्ती ही नेहमीच फार अल्प असते. त्यामुळे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, आपली समजूत वाढवायची असेल, तर पुन:पुन्हा मागे वळून पाहावंच लागतं. तसं एक झटपट सिंहावलोकन करूया. रशिया हा एक अवाढव्य देश आहे. १ कोटी ७१ लाख २५ हजार चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळाचा देश आहे. आता खरं म्हणजे, रशिया हा आशिया खंडातला देश आहे. पण, त्याचे बहुसंख्य नागरिक आणि त्यांच्यावर राज्य करणारं रोमानोव्ह हे राजघराणं श्वेतवर्णीय आहे. त्यामुळे युरोपातील प्रगत देश, म्हणजेच आपण गोर्‍या रंगाचे आहोत याचा प्रचंड अहंकार बाळगणारे लोक, रशियाची एक मागास आशियाई देश म्हणून टिंगल करायचे.


पीटर अलॅक्सोविच रोमानोव्ह याचा जन्म १६७२ साली झाला. म्हणजे, आपले छत्रपती राजाराम महाराज जन्म-१६७० आणि हा पीटर हे समकालीन. सन १६८२ साली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तो राजा झाला. त्याने पाहिलं की, युरोप खंडातले आपले शेजारी देश प्रशिया, ऑस्ट्रिया, फ्रान्स, हॉलंड, इटली, पोर्तुगाल, स्पेन आणि इंग्लंड हे मोठमोठी आरमारं सैन्य बाळगून आहेत आणि त्यांच्या जोरावर ते जगभर जाऊन आपापली साम्राज्य स्थापन करतायत. ते आपल्याला ‘मागास’ म्हणून हिणवतायत. पण, आपण खरेच मागास आहोत. मग पीटरने ‘वन फाईन मॉर्निंग’ जाहीर केलं की, रशिया हा आशियाई देश नसून, युरोपीय देश आहे आणि त्यानंतर युरोपातील प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान रशियामध्ये यावं म्हणून त्याने अथक प्रयत्न केले. आधुनिक नौकानयन शास्त्र आपल्याला अवगत होऊन रशियन आरमार बलाढ्य व्हावं म्हणून तो एखाद्या सामान्य खलाशाप्रमाणे पेट्रोग्राडच्या गोदीमध्ये राबला. याचा परिणाम म्हणजे, पुढच्या वीस-एक वर्षात रशिया खूपच आधुनिक बनला. म्हणून, या पीटरला ‘पीटर-द-ग्रेट’ असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, सन १७२४ मध्ये पेट्रोग्राड उर्फ सेंट पीटर्सबर्ग या रशियाच्या तत्कालीन राजधानीत ‘रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ची स्थापना झालेली आहे. या कालखंडात इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल हे युरोपीय देश विज्ञान-तंत्रज्ञानात चांगलेच पुढारलेले होते. आणखी पुढे जाण्याची त्यांची सतत धडपड सुरू होती. अमेरिका ही त्यावेळी इंग्लंडची वसाहत असल्यामुळे इंग्लंडमधले आधुनिक शोध आपोआपच तिथे पोहोचत होते, यावेळी भारतात काय चालू होतं? मुघल साम्राज्य भारताच्या बहुतांश भागावर चालू होतं आणि ते उलथून पाडण्यासाठी छत्रपती शाहू आणि पेशवा बाजीराव अथक प्रयत्न करीत होते. मराठ्यांच्या या सशस्त्र स्वातंत्र्य आंदोलनामुळे जाट, राजपूत, बुंदेले आणि शीख या अन्य प्रादेशिक हिंदू गटांना आपणही मुघलांविरुद्ध उठावं, अशी जरा-जरा जाणीव होत होती. थोडक्यात, स्वातंत्र्यासाठी चाललेल्या प्रचंड प्रयत्नातच सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असल्याने, विज्ञानाकडे लक्ष द्यायला जाणत्या लोकांना फुरसतच नव्हती.


सन १७७६ मध्ये अमेरिका इंग्लंडविरुद्ध क्रांती करून स्वतंत्र देश बनली. पुढच्या १०० वर्षांत अमेरिकेनेही विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड भरारी घेतली. किंबहुना, ती युरोपीय देशांच्याही थोडी पुढेच निघून गेली. त्या तुलनेत रशिया किंचित मागे राहिला. याबद्दलची एक गोष्ट स्वामी विवेकानंदांशी संबंधित आहे. स्वामीजी १८९३ साली अमेरिकत, शिकागो शहरात सर्वधर्म परिषेदेला गेले आणि हिंदू धर्म-तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठत्वाने जग जिंकून परत आले, हे आपल्याला माहीतच आहे. मुळात ही सर्वधर्म परिषद हा ‘वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोझिशन’ या अतिभव्य प्रदर्शनाचा किंवा जत्रेचा एक भाग होती. पाश्चिमात्य जगाने आणि त्यातही विशेषत: अमेरिकेने विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, कला अशा सर्व क्षेत्रांत किती अफाट प्रगती केली आहे, हे जगाला दाखवून देणं, हा या प्रदर्शनाच्या उद्देश होता. त्यासाठी शिकागो शहरात ६९० एकर भूमीवर २०० तात्पुरत्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. मे १८९३ ते ऑक्टोबर १८९३ असे सहा महिने हे प्रदर्शन चालू होतं. स्वामीजींनी लागोपाठ दहा दिवस प्रदर्शनातला प्रत्येक विभाग आवर्जून पाहिला आणि पश्विमी जगाची ही अफाट भौतिक प्रगती पाहून ते भारावून गेले.


लक्षात घ्या, ही १८९३ची अमेरिका आहे. म्हणजे, यानंतर अमेरिकेने मोटर कार आणि विमान हे अत्यंत क्रांतिकारक शोध लावून सगळं जगच पालटून टाकलंय. आता त्यानंतर १९१४ ते १९१८ आणि १९३९ ते १९४५ या काळात दोन महायुद्धं झाली. या युद्धांनी विज्ञान-तंत्रज्ञानातल्या असंख्य नव्या शोधांना जन्म दिला. त्यातही अमेरिकाच आघाडीवर होती. तिच्या पाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली होते. त्यांच्या नंतर रशिया होता. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हिएत रशिया म्हणजे कम्युनिस्ट रशियाचं साम्राज्यवादी स्वरूप उघड झालं, त्याला पायबंद घालण्यासाठी बेल्जियम, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्ग या देशांनी फ्रान्स आणि ब्रिटनला सोबत घेतलं. पण, अमेरिकेशिवाय भागेना. तेव्हा अमेरिका आणि युरोपातल्या अनेक लोकशाहीवादी देशांनी १९४९ साली ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ उर्फे ‘नाटो’ असा एक जबरदस्त गट उभा केला. १९५५ साली त्यात तत्कालीन पश्चिम-जर्मनीही सामील झाला. हे देश एकमेकांना लष्करी, औद्योगिक, व्यापारी, शेतकी असं सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पुरवणार होते. लक्षात घ्या, अमेरिकेसह हे सगळेच देश मुळातच विज्ञान-तंत्रज्ञानात पुढारलेले होते. त्यातून ते लोकशाही देश होते, आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती करावी, असं तिथल्या शासनकर्त्यांना मनापासून वाटत होतं. अमेरिकेनेही त्यांना मांडलिक देश बनवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.


सोव्हिएत रशियाची नेमकी या उलट स्थिती होती. ‘नाटो’ला उत्तर म्हणून सोव्हिएत रशियानेही १९४५ साली ‘वॉर्सा ट्रीटी ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यू.टी.ओ.) किंवा ‘वॉर्सा पॅक्ट’ (डब्ल्यू.पी.) या नावाचा गट बनवला. या गटातले बल्गेरिया, रुमेनिया, पोलंड, पूर्व जर्मनी हे देश मुळातच विज्ञान-तंत्रज्ञानात खुद्द रशियाच्याही मागेच होते. त्यात हुकूमशाही सोव्हिएत राजवटीचे त्यांना अक्षरश: गुलामांप्रमाणे वागवलं, वापरलं. जिथे सोव्हिएत नागारिकालाच स्वातंत्र्य नव्हतं तिथे या मांडलिक देशांना कुठून असणार? तरीही सोव्हिएत नागरिकाला प्रगतीची किमान दोन-अडीचशे वर्षांची परंपरा होती. म्हणून, पश्चिमी देशांकडून हेरगिरीद्वारे मिळालेलं तंत्रज्ञान, त्यात थोडफार कमी-अधिक करून स्वत:च्या देशाच्या गरजांप्रमाणे बनवणं, एवढं तरी तो करू शकला; अन्यथा, पश्चिमेतून कीट आणायचा आणि असेंबल करून वस्तू वापरायची, असं करायला तो काही पाकिस्तान नक्कीच नव्हता. आता अशा स्थितीत रोनाल्ड रीगन यांनी ‘स्टार वॉर’ म्हणजे अंतराळातल्या उपग्रहांवरून क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची प्रणाली अमेरिकेने विकसित केल्याची घोषणा केली. हे तंत्रज्ञान आता चोरून आपल्याला मिळू शकणार नाही. कारण, आपली हेर व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, हे सोव्हिएत रशियाच्या लक्षात आल्यामुळे तो कोसळला. म्हणजे ‘नाटो’वर मात करण्याची त्याची स्थिती राहिली नाही, एवढंच. इतरांसाठी तो अजूनही महाशक्ती होताच.


पण हे दृश्यही वरवरचं होतं. साम्यवादी अर्थव्यवस्थेतील अंतर्विरोध आणि सत्ताधारी वर्गाचा भयंकर भ्रष्टाचार यामुळे सोव्हिएत अर्थव्यवस्था पार डबघाईलाच आलेली होती. १९८५ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ही वस्तुस्थिती मान्य करीत सोव्हिएत साम्राज्य क्रमश: विसर्जित करून टाकलं. १९९१ साली ‘रशियन फेडरेशन’ हा नवा लोकशाही देश अस्तित्वात आला. सुरुवातीच्या सात-आठ वर्षांच्या घालमेलींनंतर १९९९ साली व्लादिमीर पुतीन हे सत्ताधारी झाले, ते आजपर्यंत. जागतिक महासत्ता हे गमावलेलं स्थान रशियाला पुन्हा प्राप्त करून देण्याचा चंग बांधून ते वावरत आहेत, त्यात त्यांना हळूहळू यशही मिळत आहे. त्यामुळे रशिया हलका पडला, तो अमेरिकेच्या तुलनेत. इतरांसाठी तो भारीच आहे.

@@AUTHORINFO_V1@@