वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |

Jagdev Ramji Uravan _1&nb






मुंबई : वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांचे बुधवारी छत्तीसगडच्या जशपुरनगर येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. जगदेवरामजी यांच्या निधनाने कल्याण आश्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


छत्तीसगड प्रांतातील जशपुरनगर जवळील कोंबडो या गावी त्यांचा जन्म झाला. १९५२ साली वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना ज्या छात्रावासाच्या माध्यमातून झाली होती, त्या जशपुरनगर येथील पहिल्या छात्रावासात विद्यार्थी या नात्याने त्यांचा कल्याण आश्रमात प्रवेश झाला. काही काळ त्यांनी आश्रमातच शिक्षक या नात्याने देखील काम केले.



 
कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचा प्रेरक सहवास दीर्घकाळ त्यांना लाभला होता. बाळासाहेबांच्याच प्रेरणेने जगदेवरामजींनी एम. ए. पर्यत शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. हे व्रत त्यांनी अखेरपर्यंत पाळले.


प्रारंभी राष्ट्रीय उपाध्यक्ष नंतर काही काळ कार्याध्यक्ष व संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांच्या निधनानंतर 1995 पासून त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. तेव्हापासून आज पर्यंत त्यांनी अध्यक्ष या नात्याने संघटनेला दिशा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम केले. देशाच्या जवळपास सर्व क्षेत्रात त्यांचा प्रवास होत असे. त्यामुळे देशभरातील हजारो कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होता. कल्याण आश्रमाच्या कार्याला बहुआयामी करण्यासाठी जगदीरामजींचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. हितरक्षा, खेलकूद, श्रद्धा जागरण, जनजाती संघटना संपर्क अशा वेगवेगळ्या आयामाना त्यांच्याच कार्यकाळात गती मिळाली.


कामाचा प्रचंड अनुभव, स्वभावातील सहजता व निर्मळता, ओघवती वक्तृत्व शैली व समाजाबद्दलचे प्रखर चिंतन ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. अनेक व्याधी असून देखील त्यांनी आपल्या प्रवासात कधीही खंड पडू दिला नाही.सभा, संमेलने तसेच अनेक बैठकांमध्ये त्यांनी मांडलेले विचार हे सर्वच कार्यकर्त्यांसाठी उद्बोधक होते. दुपारी भोजन झाल्यानंतर चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना तातडीने जशपुरनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. उद्या गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर जशपुरनगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 




@@AUTHORINFO_V1@@