म्हाडा कोकण मंडळाची उद्या सोडत

२४ हजार ९११ पात्र अर्जदार होणार सहभागी

    04-Feb-2025
Total Views |

mhada



मुंबई, दि.४: प्रतिनिधी 
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण विभागाची सोडत बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. कोकण विभागांतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत २२६४ घरांचा समावेश आहे. म्हाडाने यापूर्वी ३१ जानेवारी ही तारीख सोडतीसाठी निश्चित केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी होणार असले तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्थात २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. २० टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील ७१३ घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया ११ ऑक्टोबरपासून सुरू झाली. सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत १० डिसेंबरला संपुष्टात येणार होती. तर २७ डिसेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र १० डिसेंबरपूर्वीच मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आणि २७ डिसेंबरची सोडत थेट ३१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता ही सोडत उद्या दि.५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे ही सोडत दुपारी एक वाजता पार पडेल.