रत्नागिरी : (Ratnagiri Accident News) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सोमवार दि. १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला असून येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन चारचाकी गाडी थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
समोर आलेल्या माहितीनुसार, देवरुख येथील नातेवाईकांचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मोरे, पराडकर कुटुंबिय रात्री मुंबई येथून निघाले. त्यांनी या प्रवासासाठी खाजगी टॅक्सी आरक्षित केली होती. पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास गाडी जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती १०० ते १५० फूट खाली कोसळली. जोरात खाली आदळल्याने गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचावपथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गाडीमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत गाडीचालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून यासंदर्भातील अधिक तपास सुरु आहे.
या अपघातात दोन्ही कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत यांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी मुंबईहून देवरुख येथे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\