सितारसम्राज्ञी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2020   
Total Views |

anushka shankar_1 &n


आपल्या वडिलांनंतर भारतीय शास्त्रीय संगीताला सितारवादनाच्या माध्यमातून नवीन आयाम देणार्‍या अनुष्का शंकर यांच्याविषयी....



सरस्वतीच्या हाती असणार्‍या सितारचे पावित्र्य या मुलीने पाश्चात्य देशात राहूनही अबाधित ठेवले. प्रसिद्ध सितारवादकाच्या पोटी जन्माला येऊन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम घेऊनही तिने स्वत:चे विश्व निर्माण केले. कलेच्या बळावर जगाला आपल्या वडिलांच्या नावाने नाही, तर स्वत:च्या नावाने ओळखण्यास भाग पाडले. सितारवादक, संगीतकार, निर्माता म्हणून जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण केली. परदेशात जन्मूनही भारतीय संस्काराचे, शास्त्रीय संगीताचे मूळ घट्ट धरुन ठेवले. जगप्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार सोहळा आपल्या सितारच्या सुरांनी गाजविणारी ती पहिली भारतीय संगीतकार ठरली. रंगमंचावर सितारवादनाला बसल्यावर तिची छबी आजही प्रेक्षकांना दैवी भासते. अशी तरुण सितारवादक म्हणजे अनुष्का शंकर.


अनुष्का यांचा जन्न ९ जून, १९८१ रोजी लंडनमध्ये झाला. जन्मलेल्या घरातच भारतीय शास्त्रीय संगीताचे सूरमयी वातावरण होते. कारण, त्यांचा जन्म जगप्रसिद्ध सितारवादक भारतरत्न पं. रविशंकर यांच्या घरात झाला होता. त्यांचे बालपण लंडन आणि दिल्लीत गेले. अनुष्का यांच्या जन्मावेळी वडील पं. रविशंकर यांचे वय ६१ होते. वयाच्या सातव्या वर्षापासून अनुष्का यांनी आपल्या वडिलांकडे सितारवादनाच्या शिक्षणास सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्या पं. रविशंकर यांच्या सादरीकरणामध्ये तानपुर्‍यावर साथ देऊ लागल्या. वडिलांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त २७ फेब्रुवारी, १९९५ मध्ये नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका खास समारंभात वयाच्या १३व्या वर्षी अनुष्का यांनी आपले पहिले सार्वजनिकरित्या सितारवादन केले. या एकल सादरीकरणामध्ये त्यांना तबल्यावर साथ देण्यासाठी खुद्द झाकीर हुसेन यांसारखे दिग्गज होते. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये वाजविण्याचा त्यांना पहिला अनुभव त्याच वर्षी आला. एन्जेल रेकॉर्ड्सने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘इन सेलिब्रेशन’ नावाच्या प्रसिद्ध सीडी बॉक्स सेटसाठी त्यांनी सितारवादन केले.



वयाच्या चौदाव्या वर्षापासून अनुष्का जगभरातील मैफिलींमध्ये वडिलांना साथ देऊ लागल्या होत्या. पंधराव्या वर्षी त्यांनी जॉर्ज हॅरिसन निर्मित ‘चँट्स ऑफ इंडिया’ या महत्त्वाच्या अल्बमसाठी आपल्या वडिलांची साहाय्यक म्हणून काम पाहिले. या अनुभवानंतर, ‘एन्जेल रेकॉर्ड’ने ईएमआयबरोबर विशेष रेकॉर्डिंग करारावर अनुष्का यांची स्वाक्षरी घेतली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिल्या वैयक्तिक रेकॉर्डिंगसाठी स्वाक्षरी केली. हा अल्बम १९९८ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘अनौराग’ हा अल्बम २००० साली प्रसिद्ध झाला. त्यादरम्यान त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि संगीतामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये त्यांनी लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’मध्ये सादरीकरण केले. पदापर्णातील तिसर्‍याच ‘लाईव्ह अ‍ॅट कार्नेगी हॉल’ या अल्बमसाठी त्यांना आपली सावत्र बहिणी नोराह जोन्स हिच्यासोबत ग्रॅमी पुरस्कराचे नामांकन मिळाले. वर्ल्ड म्युझिक प्रकारात नामांकन मिळविणार्‍या अनुष्का या पहिल्या तरुण संगीतकार होत्या. वडिलांच्या आधारवडीमधून वेगळे होण्यासाठी तीन प्रसिद्ध अल्बमनंतर अनुष्का यांनी रेकॉर्डिंगपासून स्वत:ला काही वर्षांसाठी दूर ठेवले आणि एकल मैफिलींवर भर दिला.


एकल मैफिलींच्या नादात त्यांनी वर्षभरात जगाच्या कानाकोपर्‍यात ५० ते ६० मैफिली सादर केल्या. २००५ मध्ये अनु्ष्का यांचा स्वयं-निर्मित, स्वत:च्या रचना असलेल्या मात्र, शास्त्रीय संगीतावर आधारित नसलेला चौथा अल्बम रिलीज झाला. या अल्बमने त्यांना सर्वोत्कृष्ट समकालीन जागतिक संगीत प्रकारात आणखी एक ग्रॅमी नामांकन मिळवून दिले. फेब्रुवारी, २००६ मध्ये ग्रॅमी पुरस्कारामध्ये सादरीकरण करणार्‍या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. त्यानंतर २००७ मध्ये त्यांचे ‘ब्रिदिंग अण्डर वॉटर’ २०१३ मध्ये ‘ट्रॅव्हलर’सारखे अल्बम प्रसिद्ध झाले. ‘ट्रॅव्हलर’साठी त्यांना पुन्हा एकदा ग्रॅमीचे नामांकन मिळाले. शिवाय जगभरात शंभरपेक्षा अधिक ‘ट्रॅव्हलर’मधील संगीत रचनेच्या मैफिली सादर केल्या. २०१३ साली अनुष्कांनी पं. रविशंकर यांच्या निधनानंतर काही महिन्यांमध्ये ‘ट्रेस ऑफ यू’ हा वैयक्तिक अल्बम प्रसिद्ध केला. पश्चिमी संगीत आणि भारतीय संगीताचा मेळ घालून अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये भारतीय रागांवर आधारित शुद्ध शास्त्रीय संगातीचा ‘होम’नामक अल्बम प्रसिद्ध केला. एप्रिल २०१६ मध्ये त्यांनी व्हायोलिन वादक पेट्रीसिया कोपॅचिंस्कजाबरोबर जर्मनीतील कोन्जेरथियस बर्लिन येथे एका मैफिलीत वडिलांनी रचलेल्या ‘पिलू’ रागाचे सादरीकरण केले. यामधील कालावधीत त्यांच्या बर्‍याच प्रसिद्ध अल्बमला रसिकांची दाद मिळाली.



अनुष्का यांनी भारताच्या पहिल्या सिटी मासिकासाठी तीन वर्षे मासिक स्तंभलेखक म्हणून काम केले. तसेच २००२ मध्ये आपले वडील पं. रविशंकर यांचे ‘दी लव्ह ऑफ माय लाईफ’ हे चरित्र लिहिले. या संगीतमय प्रवासात त्यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. अनुष्का या वन्यजीव आणि प्राणिप्रेमी असून त्यासंबंधीच्या मोहिमांमध्ये त्या सक्रिय असतात. संयुक्त राष्ट्रामध्ये त्या भारताच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या प्रवक्त्यादेखील आहेत. तसेच स्त्री सबलीकरण उपक्रमांमध्येही त्या अग्रस्थानी राहून भाग घेतात. वडिलांच्या छत्रछायेखाली राहूनही आपली स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

@@AUTHORINFO_V1@@