पुण्याचे माहितगार मामा...

    21-Aug-2025
Total Views |

आजची ओळख ही एका भन्नाट माणसाची. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्र जशी आपल्याला हसवितात, रडवितात, तसेच हे नवनाथ मामा. म्हणायला छत्री दुरुस्त करतात, पण पुण्याचे जाणकार. त्यांच्याविषयी...

एखाद्या माणसाची आकलनशक्ती इतकी तल्लख असते की, त्यांच्या या अफाट ज्ञानाचे इतरांनादेखील आपसूकच लाभ होतात. ही माणसं सर्वसाधारण, अगदी सामान्य असली, तरी त्यांच्या निरीक्षणातून इतरांच्या नजरेतून सुटलेल्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.

पुणे हे असेच एक विस्तीर्ण महानगर. झपाट्याने होणारे बदल या महानगरात बाहेरून येथे येणार्‍याला जितके कुतूहलाचे वाटतात, तितकेच येथे स्थायिक माणूसदेखील या बदलाने थक्क झालेला बघायला मिळतो. आज आपण ज्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेत आहोत, त्या नवनाथ मामांचाही प्रवास असाच रंजक. ते पुण्यात वडिलांसोबतच रमले. मात्र, शिक्षणात काही गती नव्हती. पण, आजही पुण्याचे झपाट्याने पालटणारे रुपडे बघत ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. आयुष्यात अत्यंत समाधानी असलेले नवनाथ मामा पश्चिम-दक्षिण पुण्याची इत्यंभूत माहिती येणार्‍या-जाणार्‍याला देतात. एकदा का ते आपल्याकडे छत्री दुरुस्तीला आलेल्या ग्राहकासोबत गप्पांमध्ये रमले की, पुण्याविषयीच्या रंजक गोष्टी सांगत सुटतात. त्यामुळे अनेकजण खरे तर त्यांचे ‘फॅन’ झालेले आहेत.

सकाळ नगरच्या पदपथावर आपली पथारी पसरून बसलेल्या नवनाथ मामांचे पूर्ण नाव नवनाथ धस. मामा नुसतेच छत्रीचे डॉटर नाहीत, तर अनेक दुरुस्ती सेवा ते पुरवतात. ते अगदी कोणतीही छत्री कमी वेळेत दुरुस्त करतात. अगदी जेन्ट्स छत्री लेडीज करणं वा लेडीज छत्र्यांना जेन्ट्स छत्र्यांसारखी मूठ बसवून देणं, हेसुद्धा ते खुबीने जमवतात. चामड्याच्या बॅगा वा पर्सेसना चेन लावून देणे, कपड्यांना, जॅकेट्स वगैरेंना चेन लावून देतात, टूरिस्ट बॅग दुरुस्त करणे, चप्पल, बूट, सॅन्डलस्ची दुरुस्ती व पॉलिशची कामेही करतात. पण, त्यांचे कामाचे स्वरुप वरकरणी सामान्य वाटत असले, तरी नवनाथ मामा हे मात्र एक असामान्य व्यक्तिमत्त्वच!

पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा कायापालट त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आणि अनुभवलेला. पूर्वीच्या घनदाट जंगलांची जागा उत्तुंग इमारतींनी घेतली. या बदलांचे नवनाथ मामादेखील एक जिवंत साक्षीदार असून, त्यांच्याजवळ या पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यांतील आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. पुण्याच्या नेमक्या कोणत्या भागात जंगल होते, कोणत्या भागात किती बागा होत्या आणि लष्कराच्या आगमनानंतर पुण्याचे स्वरुप कसे बदलत गेले, याच्या कथाप्रसंग नवनाथ मामा अतिशय रंगवून सांगतात. फारशा माहिती नसलेल्या, अज्ञात, अपरिचित अशा पुण्याच्या कित्येक गोष्टी ते अगदी तपशीलवार सांगतात. असे हे ‘पुण्याचे माहितगार’ असलेले नवनाथ मामा दुरुस्तीच्या कामासाठी कोणीही त्यांच्याकडे आले, तरी ते समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानात भरच घालतात. संस्कृती, परंपरा आणि रूढी यांबद्दल खडान्खडा माहिती असणारे नवनाथ मामांचे हे प्रबोधन खरोखरीच वाखाणण्यासारखेच!

विशेष म्हणजे, हिंदू धर्माबद्दलची त्यांची आस्थाही सर्वस्वी उल्लेखनीय. हिंदू समाजाबद्दलही त्यांच्याकडे माहितीचे प्रचंड मोठे भांडार. पुण्याच्या स्थित्यंतरांबरोबरच अनेक मोठमोठ्या मान्यवरांची माहितीही मामांच्या संग्रही आहे. त्यामुळे छत्री दुरुस्त करताना नवनाथ मामांसमोर येऊन बसले की, पावसापेक्षा आपल्या गप्पांनीच ते समोरच्याला चिंब करतात. बॅगा, छत्र्यांची दुरुस्ती करताना जेव्हा नवनाथ मामांना कुणी सहजच ‘तुम्ही कोणत्या गावचे’ असा प्रश्न विचारते, तेव्हा गावाच्या संस्कृतीपासून ते पुण्यापर्यंतचा रंजक प्रवास ते अवघ्या काही मिनिटांत उलगडतात. एखाद्याची बॅग कितीही महागडी असो किंवा स्वस्त, काम अवघड किंवा सोपे, असा कोणताही विचार न करता, दुरुस्तीचे आपले काम ते कौशल्यपूर्वक करतात. व्यवसायाला जरुरीची अशी बोलण्यातील अदबही त्यांच्या देहबोलीत आहेच. काम झाल्यावर पैसे किती? असं मामांना विचारलं की, मामांनी म्हणावं, "तुम्हाला योग्य वाटतील तेवढे द्या!”

एकूणच पुण्याविषयी, येथील संस्कृतीबद्दल काहीही विचारा, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नवनाथ मामांकडे सापडलीच म्हणून समजा! इतकेच नव्हे, तर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यासाठी नेमका कोणाला संपर्क करावा, याचीही काटेकोर माहिती ते सांगतात. अडचण सांगितली की, ते फोन नंबर देऊन मोकळेच होतात. सातत्याने माणसांत वावर असल्याने आणि गोड वाणीमुळे मामांचा लोकसंग्रहही तितकाच दांडगा. "देवाने आपल्याला भरपूर दिले आहे आणि ग्राहक हाच आपला देव आहे,” असे मानणार्‍या हा अवलियाला उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु लाभो, हीच सदिच्छा!

शशांक तांबे
८६०५६८४३००