आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे...

    20-Aug-2025
Total Views |

लहानपणी पाहिलेल्या स्वप्नपूर्ततेसाठी आपल्यातील कौशल्यांच्या जोरावर यशाची गगनभरारी घेणार्‍या लीना जुवेकर-दत्तगुप्ता यांच्याविषयी...

स्वप्न माणसाच्या मनात जन्म घेतात, काहींची स्वप्ने फक्त कल्पनेतच राहतात, तर काही झेप घेऊन उंच भरारी घेतात. त्या झेपेसाठी चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतही तितकीच आवश्यक असते. वाटेत अडथळे येतात, प्रसंगी अपयशाचाही सामना करावा लागतो; पण प्रयत्न थांबवायचे नसतात. प्रत्येक छोटे पाऊल, अपयशातून मिळालेली प्रत्येक शिकवण हळूहळू स्वप्नाला आकार देते. जेव्हा त्या प्रयत्नांचे फळ मिळते, तेव्हा यशाची गोड चवही जाणवते. स्वप्न आणि त्यांच्या पूर्ततेसाठी घेतलेली झेप यातूनच मानवाच्या धाडसाचे, उत्साहाचे आणि कठोर मेहनतीचे दर्शन घडते. अशाच जीवनगाथा पुढे अनेकांना प्रेरणादायी ठरतात. मात्र, अशा प्रत्येक प्रेरणादायी कथांची सुरुवात ही स्वप्न पाहण्यापासूनच होते, हे सत्यच! अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही जीवनगाथा. ही कथा आहे लीना जुवेकर-दत्तगुप्ता यांच्या प्रवासाची, त्यांच्या स्वप्नपूर्तीची...

लीना यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दादरमधल्या हिंदू कॉलनीमध्ये बालपण गेलेल्या लीना यांचे शालेय शिक्षण ‘आयईएस शिक्षण संस्थे’च्या मुलींसाठीच्या शाळेत गेले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात बारावी झाल्यानंतर त्यांनी कला शाखेची पदवीही मिळवली. लीना यांचे वडील गिरणी कामगार असल्याने साहजिकच लहानपणी दोन-चार वेळा दादर सोडून डोंबिवली, कळवा इथे झालेले स्थलांतरही लीना यांनी अनुभवले. त्यातच लीना यांच्या कुटुंबाला बालपणीच गिरणी कामगार संपाच्या काळातच थोड्या बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मात्र, ‘माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मी काही केले पाहिजे,’ ही भावना लीना यांच्या मनात घर करून होती. लीना यांच्या आई लहान मुलांना शाळेत सोडणे आणि डबे तयार करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. लीनाही आपल्या आईला या कामांमध्ये मदत करतच होत्या. तरीही स्वतःहून काही करावे, या उद्देशाने लीना यांनीही शिकवणी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अर्धवेळ एका इलेक्ट्रिक कंपनीमध्ये नोकरीही पत्करली. तिकडच्या वरिष्ठांनी नोकरीबरोबरच लीना यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष दिले. अनेक कौशल्ये त्यांना स्वखर्चाने शिकवली. या काळात सकाळी महाविद्यालय, दुपारी नोकरी आणि संध्याकाळी चार अधिकचे पैसे मिळावे म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेणे, ही लीना यांची दिनचर्या ठरलेली!

आयुष्य असेच सुरू असले, तरीही लीना यांच्या मनामध्ये कुठेतरी हवाई क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्याचे विचार लहानपणापासूनच रुंजी घालत होते. अर्थात, त्यांचे आजोळ विलेपार्ले येथे असल्याने, लहानपणापासूनच त्यांनी आकाशात झेपवणारी विमाने बघितली होती. त्यामुळे त्या वेगाचे आणि विमानाच्या अवाढव्यतेचे अप्रुप त्यांच्या मनात घर करून होते. त्याचेच रूपांतर पुढे स्वप्नात आणि नंतर सत्यात झाले. बारावी ते पदवी या काळामध्ये लीना यांनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी करून पाहिली. पण, त्या कायमच आनंदाच्या शोधात राहिल्या. अखेर त्यांनी वडिलांचे मित्र असलेल्या ‘कर्णिक काकां’ना आपल्या आकांक्षेबद्दल सांगितले. कर्णिक यांचे काम याच क्षेत्राशी संबधित असल्याने, त्यांनी लीना यांना ‘पडेल ते काम’ या अटीवर रुजू जुहू विमानतळावर रुजू होण्यास सांगितले. कर्णिक काकांनी दिलेली ही ‘ऑफर’ लीना यांच्यासाठी सुवर्णसंधीच ठरली.

लीना यांना हवाई क्षेत्राची काहीही माहिती नव्हती. तसेच, नव्या कंपनीमध्ये कोणताही एकच विभाग त्यांच्याकडे नसल्याने व्यवस्थापन ते अभियांत्रिकीपासून सगळ्याच विभागात काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होता गेला. तिथे लीना यांनी सात वर्षे सलग काम केले. त्यानंतर ‘सहारा’सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये पुढे सात वर्षे काम केले. त्यानंतर दिल्लीच्या एका कंपनीने मुंबईच्या हेलिकॉप्टर विभागाची संपूर्ण जबाबदारी लीना यांच्याकडे सुपूर्द केली होती. या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणाने सेवा देण्यालाच लीना यांनी महत्त्व दिले.

दरम्यानच्या काळात लीना यांच्या बंधुराजांनी विमान क्षेत्रात स्वतःचे काही सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात, लीना यांच्यासमोर भांडवल हा मुद्दा होताच. त्यामुळे त्यांनी विमान सेवा क्षेत्रातच उतरण्याचे निश्चित केले. लीना यांच्या भावाकडेही विमान क्षेत्रातील कामाचा अनुभव होताच. अखेर त्यांनी ‘चार्टेड’ विमानांची सेवा पुरवण्याच्या उद्देशाने लीना आणि त्यांचे भाऊ राहुल यांनी ‘अ‍ॅडोनिस एव्हिएशन एंटरप्रायझेस’ या कंपनीची २०११ साली स्थापना केली. त्यानंतर आजतागायत लीना यांच्या कंपनीने विविध मान्यवरांना चार्टर विमाने, हेलिकॉप्टर सेवा पुरवली आहे. लीना यांनी सेवा पुरवलेल्या विशेष व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. लीना यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती भवनाकडून त्यांचे कौतुकही करण्यात आले होते. गेली १२ वर्षे त्या महाराष्ट्र शासनाच्या विश्वासू सेवा पुरवठादार आहेत. लीना यांच्यावरची जबाबदारी मोठी असल्याने, त्या आजही हेलिपॅडपासून, विमानांची सुरक्षा स्वतः तपासतात. याकामी पूर्वी विविध विभागांत केलेल्या कामातून मिळालेले ज्ञान त्यांच्या कामी येते. लीना यांनी विविध राजकीय पक्षांनाही सेवा पुरवली आहे. अनेक वर्षांच्या कष्टांनंतर विमानाच्या क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना लीना यांच्या मनात आहे. ‘महिला उद्यमी’ म्हणून त्यांचा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. तसेच, विविध पुरस्कारांनीही लीना यांच्या कार्याचा अनेकजणांनी गौरव केला आहे. आज लीना यांची विमान वाहतुकीशी संबंधित विविध नियामक संस्थांवरही तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच, लीना आता अनेकांना या क्षेत्रात येण्यासाठीचे मार्ग यावर मार्गदर्शनही करतात. अनेक वाहिन्या, व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईला मार्गदर्शनही केले आहे. लीना यांचे पतीही त्यांच्या या प्रवासामध्ये पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत.
लीना यांचा प्रवास पाहिला की, "महाराष्ट्र गीतामधील एकच ओळ मनामध्ये येते ती म्हणजे, ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे.’ आपल्यातील कौशल्याने यशाची गगनभरारी घेणार्‍या लीना जुवेकर-दत्तगुप्ता यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर