संस्कृत विकिपीडियाचा ‘सूर्य’उदय

    22-Aug-2025
Total Views |

‘विकिपीडिया’मध्ये संस्कृतचा समावेश व्हावा, यासाठी कार्यरत आणि ‘सम्भाषणसन्देशः’ या संस्कृत मासिकाचे सहसंपादक असणाऱ्या डॉ. सूर्य हेब्बार यांच्याविषयी...

डॉ. सूर्य हेब्बार यांचा जन्म कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबातला. शाळेत असताना ते अगदी साधारण विद्यार्थी होते. दहावीला कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना एखाद्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले. त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकातील अण्डिंजे हे गाव आकाराने अगदीच लहान असल्यामुळे, तेथे त्याकाळी वाहतुकीच्या सोयीही नव्हत्या. म्हणूनच अखेर त्यांनी निवासी पद्धतीने शिक्षण देणाऱ् श्रृंगेरीच्या ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’त प्रवेश घेतला. सूर्य यांनी तेथे ‘साहित्य’ विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. विशेष म्हणजे, केवळ ‘अनुगच्छतु प्रवाहं’ असे म्हणत संस्कृत शिकायला सुरुवात केलेल्या सूर्य यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्येही सुवर्णपदक मिळवले!

श्रृंगेरी विद्यापीठात शिक्षण घेता घेता डॉ. सूर्य यांनी ‘संस्कृतभारती’च्या संभाषण शिबिरांतही भाग घेतला; विविध संमेलनांत गेले. त्यामुळे संपूर्ण भारतभरातील संस्कृत कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क दांडगा झाला. त्यांचे संस्कृतचे ज्ञान पारखून, त्यांना ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’त सहशिक्षक म्हणून येण्यास पाचारण करण्यात आले. ते संस्कृत शिकले होते, शिकवत होते, संस्कृतमध्ये बोलत होते, विविध संमेलनांमधून जनसंपर्क करत होते, पण तरीही आपण संस्कृतातच काहीतरी कार्य करावे, असे त्यांच्या मनात नव्हते. ते केवळ ‘स्वान्तः सुखाय’ संस्कृतकार्य करत होते.

सूर्य यांना संस्कृतमध्ये बोलणे खूप आवडते. ते समाजात वावरताना, फोनवर बोलताना, सभेत भाषण करतानाही आवर्जून संस्कृतचा आग्रह धरतात.

सूर्य यांची भाषेवरची पकड पाहूनच, त्यांना ‘संस्कृतभारती’च्या ‘विकिपीडिया प्रकल्पा’साठीही आमंत्रित करण्यात आले. यामुळे सूर्य यांना संस्कृत विकिपीडिया निर्माणाचे एक ऐतिहासिक कार्य करण्याची संधी मिळाली. विकिपीडियावर जगातील सर्व भाषांत माहिती उपलब्ध आहे, तशीच ती संस्कृतमध्येही निर्माण व्हावी याच भावनेतून सूर्य यांची नियुक्ती केली गेली आणि त्यांच्या हस्ते विकिपीडियामध्ये संस्कृतचा उदय झाला. विविध विषयांची माहिती कन्नड किंवा इंग्रजी भाषेत वाचून ते संस्कृतमध्ये भाषांतरित करत असत. काही लेख स्वतःही लिहित. पुढे त्या लेखांचे संपादन, भाषासौंदर्य वाढवणे इत्यादी कामेही तेच करू लागले. त्याचबरोबर ‘विकिसोर्स’ नामक एका ऑनलाईन लायब्ररीसाठीदेखील त्यांनी संस्कृत ग्रंथ तयार करणे, त्यांतील शुद्धलेखन तपासणे, मूळ ग्रंथ पाहून संदर्भ पडताळणे इत्यादी योगदान दिले आहे.

याच काळात सूर्य श्रृंगेरी येथून ‘पीएचडी’देखील करत होते. विविध कवींनी वापरलेले, वर्णन केलेले समान संदर्भ आणि ‘मोर पावसातच नाचतो’, ‘कोकिळ वसंत ऋतूतच ओरडतो’ अशा काही रूढ झालेल्या उक्तींचे मूळ समजून घेत, साम्यस्थळे शोधून काढत ‘कविसमयस्य विमर्शः’ नामक विषय घेऊन त्यांनी प्रबंध सादर केला. याच विषयासंबंधात ते ‘एमआयटी’मध्ये अतिथी सहशिक्षक म्हणून शिकवतदेखील असत.

या संपूर्ण काळात डॉ. सूर्य यांना त्यांच्या आईवडिलांची मोलाची साथ लाभली. त्यांची पत्नी संस्कृतची विद्यार्थिनी नसली, तरी त्यांना संस्कृत संभाषणात रुची आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ते आज हे यश संपादन करू शकले, असे ते आवर्जून नमूद करतात.

त्यांचे विकिपीडिया निर्माणातील योगदान आणि जिद्द व चिकाटी पाहून, त्यांना संस्कृतमधील एक नामांकित वृत्तपत्र ‘सम्भाषणसन्देशः’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या ते तेथे सहसंपादकपदावर कार्यरत आहेत. लेखांचे शुद्धलेखन तपासणे, संपादन करणे, बातम्या एका ठराविक आराखड्यात बसवणे, मासिकातील कोड्यांची उत्तरे पडताळणे, अंक पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा नीट तपासून पाहणे इत्यादी कामे ते आज सक्षमपणे हाताळत आहेत. त्याचबरोबर मासिकाची अडीच तासांची ध्वनिपत्रिकादेखील असते. त्यात मासिकातील लेख ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध केले जातात. ते ऑडिओ बनवणार्या कार्यकर्त्यांना काम योजून देणे, त्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवून ऑडिओचा पाठपुरावा करणे, त्यानंतर ते एडिट करणे इत्यादी कामांमध्ये डॉ. सूर्य जातीने लक्ष घालतात. नवीन ग्राहकांना सबस्क्रिप्शन घ्यायला मदत करणे, देणगी मूल्याची नोंद ठेवणे, पत्रकारांशी संपर्क ठेवणे, अंकाच्या छापील प्रती मोजणे, त्यांची राज्यवार, पिनकोडवार वर्गीकरण करून अंकांची बांधणी करणे, व अंक पाठवणे इत्यादी सर्व कार्यालयीन कामेही डॉ. सूर्य यांच्याच निगराणीखाली होतात.

डॉ. सूर्य यांनी त्यांचा लेखनाचा छंददेखील उत्तम प्रकारे जोपासला आहे. आजही लोकांना संस्कृत हवं आहे, पण ते सोपं असेल तरच लोक वाचू शकतील आणि जुन्या विषयांपेक्षा अद्यतन विषय उपलब्ध करून दिले, तर तरुणाईलादेखील ते वाचण्यात रस वाटेल, असे डॉ. सूर्य म्हणतात. त्यांनी अभ्यासलेल्या प्राचीन साहित्याचादेखील त्यांच्या लेखनात समावेश असतो, परंतु ते बहुतकरून आधुनिक, सामाजिक विषयांवरील लिखाणालाच प्राधान्य देतात. त्यांनी बालकथा, कादंबरी, ग्रंथ, काही पुस्तकांचे अनुवाद अशा विविध प्रकारचे लिखाण केले आहे. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यातदेखील आले आहे. डॉ. सूर्य हेब्बार यांच्या संस्कृतकार्याचे किरण दाही दिशांनी उत्तरोत्तर वृद्धिंगत होवोत, ही दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून सदिच्छा!

ओवी लेले