
महिलेला मातृत्वाचे कोंदण देऊन, मुलींच्या अवघड दिवसांतील समस्या लीलया सोडवण्यासोबतच समाजसेवेचे व्रत तेवत ठेवणाऱ्या बहुआयामी डॉ. नितिका बढिये यांच्याविषयी...
आपण आपल्या पेशासोबत किती प्रामाणिक राहून समाजोद्धाराचे काम करतो, यावर समाजामध्ये आपली पत ठरत असते. यासोबतच आपल्या कौशल्याच्या जोरावर कितीजणांच्या आयुष्यात आनंद खुलवण्याचे काम केले, यावरही आपली कीर्ती आणि यश अवलंबून असते. सेवेचा वसा हाती घेतलेल्याने एखादवेळी स्वतःची नाही; पण रुग्णाची काळजी घेत, त्याला जीवनदान देण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्या डॉक्टरच्या नावापुढे देवदूताची उपाधी आपोआपच लागते. याच पठडीत असलेल्या आणि नाशिक शहरात एक कुशल आणि भावनाप्रधान प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलेल्या डॉ. नितिका बढिये यांनी आशा हरवून बसलेल्या अनेक महिलांना मातृत्वाचे सुख देण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घेतले आहे. नेहमीच रुग्णांप्रति समर्पणभाव ठेवल्यानेच डॉ. नितिका आपल्या पेशात नेहमीच इतरांपेक्षा उजव्या ठरत आल्या आहेत. निवडलेल्या क्षेत्रात मोठी उंची गाठायची, या उद्देशाने डॉ. नितिका यांनी आपले पदवीचे वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या ज्युपिटर आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. डॉ. नितिका यांना प्रसूती व स्त्रीरोग क्षेत्राची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य कसे सुधारेल, याकडे त्यांचा सातत्याने कटाक्ष राहिल्याचे त्या सांगतात. आतापर्यंत डॉ. नितिका यांनी आपल्या १२ वर्षांच्या वैद्यकीय सेवेचा अनुभव व कौशल्याचा वापर महिलांना मातृत्व मिळवून देण्यात केल्याचे दिसून आले. त्यामुळे बोर्ड-प्रमाणित स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून, डॉ. नितिका यांनी प्रसूती व स्त्रीरोग क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवत, आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्यामुळेच त्यांना रुग्ण कोणत्याही अवस्थेत असो, त्याच्या आजाराचे अचूक निदान करून उपचार करता येतात. मग तो आजार गंभीर असो वा दीर्घकालीन, त्या रुग्णाला बरे करणार म्हणजे करणारच!
प्रत्येक रुग्णाच्या गरजा, त्याच्या प्रकृतीनुसार उपचार करण्यात डॉ. नितिका यांचा हातखंडा. यवतमाळ येथे जन्मलेल्या डॉ. नितिका समाजसेवेतही मागे नाहीत. समाजसेवेचे बाळकडू त्यांना आपल्या घरापासून म्हणजेच आई-वडिलांकडून उपजतच मिळाले. त्यांचे वडील प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवृत्त झाले. समाजातील दुर्लक्षित घटकांना सहानुभूतीची वागणूक देत, लागेल ती मदत करून, राष्ट्रकार्याला कसा हातभार लावावा, हे डॉ. नितिका यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले आहे. डॉ. नितिका यांच्या समाजकार्याचा श्रीगणेशा यवतमाळच्या अनाथाश्रमातील श्रमदान व अन्नदानाने झाला. नागपूर येथे शिक्षणादरम्यान विविध शाळांवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना त्यांनी संपूर्ण जिल्हाभर शिबिरांचे आयोजन केले, तर छत्रपती संभाजीनगर येथे पदव्युत्तर शिक्षणादरम्यान अकरावी व बारावीच्या मुलींसाठी ‘कळी उमलताना’ हा प्रकल्प ‘अजित सीड’च्या सोबतीने राबवत, वयात येणार्या मुलींच्या समस्यांवर मोफत मार्गदर्शनाची शिबिरे आयोजित करण्याचे काम केले. यासोबतच हेडगेवार रुग्णालयाच्यावतीने समाजाप्रति राबविण्यात येणार्या प्रकल्पांमध्येही डॉ. नितिका सक्रिय सहभागी झाल्या. आपले समाजसेवेचे व्रत पुढे सुरू ठेवताना डॉ. नितिका यांनी बंगळुरु येथील विक्रम रुग्णालयामध्ये कार्यरत असताना स्त्रियांचे मोफत तपासणी व गर्भसंस्कार शिबिरांचे आयोजन करत, अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून दिला. आता डॉ. नितिका मागील पाच वर्षांपासून नाशिक येथे पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना, नाशिक परिसरातील विविध शाळांमध्ये ‘कळी उमलताना’ हा प्रकल्प त्यांनी राबविला. यासोबतच अनेक समाजोपयोगी शिबिरांद्वारे रुग्णसेवा करत अनेकांचे आयुष्य निरोगी केले. ‘लॅप्रो-हिस्ट्रोस्कोपी’ व ‘कोलपोस्कोपी’ यामध्ये विशेष प्रशिक्षण घेत, आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतींचा डॉ. नितिका यांनी अवलंब केला आहे. आपल्या डॉटरी पेशाच्या पलीकडे जात, डॉ. नितिका त्यांच्या संवादकौशल्य आणि भावनाप्रधान वागणुकीसाठी नाशिकच्या पंचक्रोशीत सुपरिचित आहेत. आपल्याप्रति रुग्णांचा विश्वास आणि दुसर्यांचा आदर, या संवादकौशल्यांच्या आधारे त्यांनी डॉटर आणि रुग्णांमधील नात्याची वीण घट्ट करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डॉ. नितिका वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यामुळेच वैद्यकीय विद्यार्थी, निवासी डॉटर आणि फेलोज् यांना त्या मार्गदर्शन करतात. यासोबतच संशोधन आणि वैज्ञानिक कार्यांमध्येही त्या सक्रिय असून, त्यामुळे वैद्यकीय ज्ञानात भर पडते व रुग्णसेवा अधिक प्रभावी होत असल्याचे डॉ. नितिका सांगतात. निःस्वार्थ निष्ठा आणि रुग्णांच्या कल्याणासाठी मनापासून घेतली जाणारी काळजी, यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि आदरणीय आरोग्यसेविका म्हणून डॉ. नितिका इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. रुग्णांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याचा त्यांचा संकल्प, हा त्यांच्यातील एक आदर्श वैद्यकीय व्यावसायिकाचे द्योतक म्हणता येईल. अशा या समाजसेवी आणि बहुआयामी डॉ. नितिका बढिये यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८