जिवासवे जन्मे मृत्यू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2020
Total Views |
Aadya-Aaradhy_1 &nbs



मृत्यू केव्हा येईल, हे कुणालाच माहीत नसल्याने माणसाला सर्वकाळ मृत्यूसमयाची जाणीव ठेवून वागावे लागते. मृत्यूची जाणीव व त्याचे सामर्थ्य समजून घेतले तर आपले आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची साधकाला कल्पना येते व तो आपल्या साधनेपासून ढळत नाही. समर्थांनी दासबोधात ‘मृत्यू निरूपण’ नावाचा स्वतंत्र समास या उद्देशानेच लिहिला आहे.

मृत्यू हा माणसाला जबरदस्त तडाखा देतो. तो माणसाची घमेंड उतरवतो. ज्या मृत्यूबद्दल सर्वसामान्य माणसे बोलायला घाबरतात, त्या मृत्यूचे विलक्षण सामर्थ्य समर्थांनी दासबोधात वर्णन केले आहे. सर्वसाधारणपणे माणसाला आयुष्यात दुःख नको असते. तरीही ते त्याला भोगावे लागते. माणसाला दुःख किती प्रकारांनी भोगावे लागते, यासाठी शास्त्रात आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशी त्रिविध तापांची वर्णने केलेली आहेत. समर्थांनी या त्रिविध तापांचे सविस्तर विवरण दासबोधात केलेले आहे. आधिदैविक तापाचे वर्णन करताना स्वामींनी हे स्पष्ट केले आहे की, काही माणसे या जन्मात स्वार्थाने, अनीतीने व अन्यायाने वागून स्वतःसाठी अनेक सुखसोयी मिळवतात. सुखोपभोग घेताना आपल्या पापकृत्यांचे त्यांना काही वाटत नाही. पण, या सृष्टीत केलेल्या बर्‍यावाईट कृत्यांची फळे माणसाला भोगावी लागतात. काही पापांची फळे मृत्यूनंतर यमयातनेच्या रुपाने भोगावी लागतात, असे स्वामींनी म्हटले आहे. पण, लोकांचा त्यावर विश्वास नसतो. शास्त्रातील यमयातनेची वर्णने त्यांना काल्पनिक वाटतात. लोकांनी सन्मार्गाने चालावे, यासाठी त्यांना धाक दाखवण्यासाठी या यमयातनेची काल्पनिक वर्णने शास्त्रात टाकली आहेत, असे त्यांना वाटते. परंतु, समर्थांनी स्पष्ट शब्दांत निःसंदिग्धपणे सांगितले आहे की, शास्त्रात सांगितलेल्या मरणोत्तर यमयातना खर्‍या आहेत. आपण त्यावर अविश्वास दाखवू नये. या यमयातना चुकवायच्या असतील, तर माणसाने आयुष्यात नीतीन्यायाने, निःस्वार्थपणे वागले पाहिजे, हे उघड आहे. यासाठी माणसाला नेहमी मरणाचे स्मरण ठेवावे लागते. मृत्यू केव्हा येईल, याचा नेम नाही. तेव्हा साधकाने नेहमी जागृत राहिले पाहिजे, असे समर्थांचे सांगणे आहे. स्वामींनी दासबोधात मृत्यूचे सामर्थ्य सविस्तर वर्णने केले आहे.


जगात अमुक गोष्ट घडेल, असे ठामपणे सांगता येत नाही. पण, प्रत्येक जीवाला मृत्यू आहे, हे निश्चितपणे सांगता येते. असे असूनही माणसे मृत्यूला विसरतात आणि अनीतीने, अन्यायाने, दुष्टपणाने वागत राहतात. ते स्वतःला कायमस्वरुपी समजत असतात. महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले आहेत, त्यातील एक प्रश्न यासंबंधी आहे. यक्षाने विचारले की, “या जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?” त्यावर धर्मराजाने उत्तर दिले की, “असंख्य माणसे दर दिवशी मृत्यूमंदिरात प्रवेश करताना आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. तरीही मृत्यूमंदिराच्या बाहेर असलेली माणसे मात्र स्वतःला कायमस्वरुपी म्हणजेच चिरंजीव समजत असतात. या जगात याहून आश्चर्यकारक ते दुसरे काय असणार?” याचा अर्थ माणूस गाफिल राहिला किंवा उर्मटपणे राहिला, अक्कलहुशारीने राहिला तरी मृत्यू त्याला सोडत नाही. मृत्यू आला तर आपले भूमंडलावरील अस्तित्व संपेल, या कल्पनेने माणूस मृत्यूचे नाव काढले की घाबरून जातो. कोरोना विषाणूचे जगभरातील थैमान पाहिल्यावर साहजिकच प्रत्येकजण घाबरून गेलेला आहे. असे असले तरी तत्त्वज्ञानाला मृत्यूविषयी ऊहापोह करावा लागतो. भारतीय तत्त्वज्ञान मानते की, या विश्वात ब्रह्म हेच अविनाशी चिरंतन तत्त्व आहे. मग मृत्यू म्हणजे नेमके काय? तर जीवात्मा एक शरीर सोडून, त्याचा त्याग करून दुसर्‍या शरीराद्वारा आपले जीवन सुरू करतो. भगवद्गीतेत याचाच पाठपुरावा केला आहे.



वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाती नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जिर्णान्यन्यानि
संयाति नवानि देही ॥ (२.२२)



मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो, तसा जीवात्मा जुने शरीर टाकून नवे धारण करीत असतो. मृत्यूसमयी मनात जो विचार प्रबल असतो, तशी गती जीवात्म्याला मिळते. असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. मृत्यू केव्हा येईल, हे कुणालाच माहीत नसल्याने माणसाला सर्वकाळ मृत्यूसमयाची जाणीव ठेवून वागावे लागते. मृत्यूची जाणीव व त्याचे सामर्थ्य समजून घेतले तर आपले आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची साधकाला कल्पना येते व तो आपल्या साधनेपासून ढळत नाही. समर्थांनी दासबोधात ‘मृत्यू निरूपण’ नावाचा स्वतंत्र समास या उद्देशानेच लिहिला आहे. समर्थ या समासात सांगतात की, मानवीजीवनाचा प्रवाह काळाने नियंत्रित केला असून तो मृत्यूच्या दिशेने चालला आहे, हे आपण पाहतो. पूर्वसंचित संपले की, क्षणभरही न थांबता हा देह सोडून जावे लागते.



सरतां संचिताचें शेष । नाही क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणे लागे ॥ (३.९.३)



मृत्यूपासून माणसाला कोणीही वाचवू शकत नाही. कोणाची ओळख किंवा कोणाचा वशिला तेथे उपयोगी पडत नाही. मृत्यूपुढे कोणाचे काही चालत नाही. मृत्यूचा वेढा पडला की, कोणीही त्याला वाचवू शकत नाही. मोठमोठे धनाढ्य, बलाढ्य, विख्यात, श्रीमंत, घोडदळ बाळगणारे हयपती तसेच सैन्यात हत्तीदल सांभाळणारे गजपती असे चक्रवर्ती राजे-महाराजे या सार्‍यांचे मृत्यूपुढे काही चालत नाही. मृत्यूच्या विळख्यात सापडलेल्याबद्दल मृत्यू कधीही विचार करीत नाही की, हा माणूस विद्वान आहे, संपन्न आहे. तो हेही जाणत नाही की, हा माणूस मोठा पंडित आहे अथवा मंत्रतंत्र किंवा वेदविद्या जाणणारा आहे. कोणी मोठा शास्त्रज्ञ जरी असला तरी वेळ आली की, त्याचे प्रतिष्ठित स्थान विचारात न घेता मृत्यू त्याला उचलतोच. या जगातील सर्व लहानथोर प्राणीमात्र हे मृत्यूच्या अधीन असतात, यात संदेह नाही. जो प्राणी या भूतलावर जन्माला आला, त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यूला घाबरून कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यू त्याला सोडत नाही. मृत्यू हा असा सर्वभक्षक असल्याने तो कोणालाही सोडत नाही, हे आपल्या प्रत्यक्ष पाहण्यात येते. मोठमोठे बळाचे दीर्घायुषी कुळवंत राजे मृत्यूपंथाने गेले आहेत. कितीतरी पराक्रमी, परोपकारी धर्मरक्षक सारे गेले आहेत. मोठे बुद्धिमान, तर्कवादी सर्वच गेले आहेत. कुणीही राहिले नाही. सर्व सज्जन, दुर्जन, महापुण्यवान, महापापी आले तसे गेले. मृत्यूने कोणालाही कशाच्याही आधारावर सूट दिलेली नाही. माणूस कितीही थोर असला, एवढेच कशाला प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर जरी समोर आले अथवा भगवंताचे अवतार या जगात जन्म घेऊन आले तरी मृत्यू कोणालाही सोडत नाही.



मृत्यू न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ (३.९.४०)



समर्थांचे हे विधान फार कठोर आहे. त्यामुळे कदाचित लोकांच्या भावना दुखावतील, त्यांच्या श्रद्धेचा अनादर केल्यासारखे होईल, याची स्वामींना कल्पना आहे म्हणून ते श्रोत्यांना विनंती करतात की, माझ्या या बोलण्याने तुम्ही रागावू नका. मी सत्य तेच सांगतोय. या मृत्यूलोकात जो जन्माला आला त्याचा दर्जा, त्याची योग्यता काहीही असो, त्याला मृत्यूच्याच वाटेने जावे लागेल.



श्रोती कोप न करावा । हा मृत्यूलोक सकळास ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यूपंथे ॥ (४१)



आपले जीवित मरणाधीन आहे, याची सतत जाणीव ठेवून माणसाने आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. आपला देह जरी मृत्यूने नेला तरी आपण कीर्तिरुपाने लोकांत जीवंत राहावे. त्यासाठी आयुष्यभर सत्कर्मे करीत लोकांच्या उपयोगी पडावे. लोकांसाठी चंदनाप्रमाणे झिजावे. तेव्हा कीर्ती संपादन करता येते. सर्वचजण जरी मृत्यूपंथाने गेले असले तरी आत्मज्ञान प्राप्त करून स्वस्वरुपाशी एकरूप झालेले संत तेवढे शिल्लक राहिले.



असे ऐसे सकळही गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार झाले । आत्मज्ञानी ॥ (५९)



मृत्यूचा समास सांगताना समर्थांची वाणी अद्वितीय रुपात प्रगट झाली आहे. प्रा. बेलसरे म्हणतात, ‘मानवी जीवनातील मृत्यूची विलक्षण लिला इतक्या प्रभावी व जोरदार ओघवती वाणीने कोठेही वर्णिलेली आढळत नाही. काळाच्या छातीवर नाचणारा रामदासच ते करू शकतो.’

- सुरेश जाखडी




@@AUTHORINFO_V1@@