समाजहितासाठी सावित्रीचं वाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2020   
Total Views |

savitribai sathe_1 &



सावित्रीबाई साठे या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई... त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे ‘मातृशक्ती रमाई पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. त्यांची जीवनकहाणी...



“गरत्या बाईनं इज्जत सांभाळून जगावं, पण इज्जतीचा सौदा करू नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये चारित्र्याला डाग लावून घेऊ नये. घरदार, समाज संस्कृती, प्रथा यांची जपणूक करत आयुष्याला अर्थ द्यावा,” असा संदेश देणार्‍या अण्णाभाऊ साठेंच्या कथा-कादंबर्‍यांतल्या नायिका. पण, ती आपली नीतिमत्ता जपणारी आणि पाप-पुण्याचा हिशोब मांडणारी कर्तृत्वान स्त्रीशक्ती आहे. या स्त्रीशक्तीचे रूप तळागाळातल्या समाजात आजही ताठ मानेने जगत आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला संघर्ष इज्जतीचा वारसा सांगणारी त्यांचीच स्नुषा सावित्रीबाई साठे. त्यांना सगळे ‘सावित्रीमाई’ म्हणतात. कर्‍हाडच्या काळगाव येथील रामा भिंगारदिवे आणि चंद्राबाई यांना सहा मुली आणि एक मुलगा. ते हमाली करत. आई धुणीभांडी करे. हातावरचे पोट. आईबरोबर छोट्या छोट्या मुलीही धुणीभांडी करायला जात. त्यामुळे एकाही बहिणीने शाळेचे तोंड पाहिले नाही. कष्ट करावे, खावे. ज्यांच्या घरी काम करायचे, त्यांनी जुनेपाने कपडे दिले की तो दिवस दिवाळीचा. आईवडील मरणाचे कष्ट उपसायचे. पण, त्यांच्याकडून चुकूनमाकूनही कामात थोडी कसर राहिली तर मालक त्यांचा अपमान करे. हे दृश्य छोट्या सावित्रीने अनेकदा पाहिले. पण, सगळ्या समाजातल्या गोरगरिबांची हीच स्थिती. परिस्थितीला कंटाळून काहींनी धर्मांतर केलेले. पण, त्यांची गत तर अजूनच वाईट. जसे ख्रिश्चन झाले म्हणून समाज स्वीकारायचा नाही आणि ख्रिश्चन यांना अजूनही हिंदूतले मागासवर्गीयच समजायचे.




सावित्रीच्या आत्याचा विवाह अण्णाभाऊ साठेंशी झालेला. वयाच्या सोळाव्या वर्षी सावित्रीचा विवाह आत्याच्या मुलाशी, मधुकरशी ठरला. त्यावेळी अण्णाभाऊ हयात नव्हते, तर सावित्रीच्या विवाहाला चार-पाच महिने बाकी होते. लग्नाची तयारी सुरू होती. पण, त्याचकाळात आत्याच्या अंगावर वीज पडली. आत्या त्यातच वारली. पण, नियमाने विवाह झाला. सासरी आल्यावरही परिस्थिती माहेरसारखीच. पतीच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करायचे. पण, आपला सासरा कुणीतरी खूप मोठी व्यक्ती आहे, याची जाणीव इथे आल्यावर सावित्रींना झाली. पण, त्याने आयुष्यातले कष्ट-गरिबी सरत नव्हती. तशीही कष्टाला सावित्रीची ना नव्हतीच! पण, नशीब परीक्षा घेतच असते. सावित्रीबाईंचा संसार आला दिवस साजरा असा सुरू होता. एक मुलगी झाली आणि मधुकर आजारी पडले. त्यांच्या मणक्यात पाणी झाले. उपचार करण्याची आर्थिक ताकद नव्हती. तरीही ते मिळेल ते काम करत. पण, जास्त कष्ट करू शकत नसत. सावित्रीमाईंना संसार चालवण्यासाठी अपार कष्ट करावेच लागणार होते. त्या पहाटे उठत. मुलींचे आवरत, भाकर तुकडा असेल तर सोबत नेत. नाहीतर तशाच रानात जात. दिवसभर रान खुरपत तेव्हा अडीच रूपये मिळत. येताना पीठ आणत. आल्यावर घरचे काम आवरत. आता सावित्रीमाईंना चार मुली झाल्या. या सगळ्यांनी शिकायला हवं, असा निश्चय त्यांनी केला. प्रचंड कष्ट, प्रसंगी उपाशी राहून त्यांनी मुलींना शिकवले. पतीची सेवा केली. त्यातच पतीचे निधन झाले. पण, सावित्रीमाईंनी हार मानली नाही. इज्जत, अब्रू, स्वाभिमान हा दागिना शाबूत ठेवला. अंग मोडेपर्यंत यंत्रासारखे काम केले. मुलींची शिक्षण, लग्न उरकले. मात्र, हे सगळं करताना आतापर्यंत त्या स्वत:साठी जगल्याच नव्हत्या.




मग एक दिवस उजाडला. औरंगाबादहून कुणी समाजसेवक आले. वाटेगावला अण्णाभाऊंचे घरचे कोण आहेत? त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची होती. सावित्रीमाई पहिल्यांदा अशा जयंतीच्या कार्यक्रमाला गेल्या. तिथे अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या स्त्रियांची जीवनकहाणी त्यांनी ऐकली. या सगळ्यांचे जीवन तर आपल्यासारखेच आहे. आपल्या पाहणीतल्या समाजातील स्त्रिया आजही असेच जगत आहेत. तीच गरिबी, तेच दु:ख, तोच संघर्ष आणि पदरात केवळ आणि केवळ अश्रू. सावित्रीमाईंनी ठरवले, आपण समाजातील आपल्या बहिणींसाठी काहीतरी केले पाहिजे. आपण तर निभावून नेले, पण हे थांबले पाहिजे. समाजातल्या स्त्रिया शिकायला हव्यात, त्यांना चांगले माणसासारखे जगता यायला पाहिजे. या विचाराने त्या समाजासाठी काम करू लागल्या. महाराष्ट्रभर आपली मत मांडू लागल्या. त्यातले मुख्य म्हणणे असे की “आयुष्य बदलायचं असेल तर शिका, कष्ट करा. आला समाज आपला धर्म संस्कृती जपा. सत्याच्या मार्गातूनच न्याय मिळेल.” सावित्री सांगतात “गेल्या काही वर्षांत मातंग समाजावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या असल्या घटनांचा गैरवापर करून समाजात भांडणं लावली जातात. जिथे जिथे असे काही घडते मी तिथे जाते. त्यांना इतकंच सांगते, भांडू नका, तंडू नका. भडकू नका. न्याय न्यायाच्या हिशोबाने मिळवूया. आपण सगळे एक होऊन समाजासाठी काम केले तर असले प्रसंग घडणार नाही. एकत्र येऊन समाजाच्या भल्यासाठी काम करूया.” सावित्रीबाई आपल्या परीने समाजभान जपत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात पानोपानी जीवंत असलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा वारसा कृतीतून जागवत आहेत...

@@AUTHORINFO_V1@@