शहाणे करावे जन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020
Total Views |


ramdas swami_1  


आज व्यक्तिमत्व विकासही आधुनिक काळातील उपपत्ती आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी ग्रंथलेखन करताना सहज जाता जाता स्वामी त्यातील तत्त्वांवर भाष्य करतात, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. तसेच ते अभ्यासण्याजोगे आहे.



समर्थांनी दासबोध ग्रंथात ईश्वरप्राप्तीसाठी भक्तिमार्ग सांगितला असला तरी त्यांचा भक्तिमार्ग हा साधा
, भोळा, भाबडा असा नसून तो बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीला उतरणारा आहे. स्वामींच्या तत्त्वज्ञानात आत्मप्रचिती व विवेक यावर भर आहे. त्यांच्या ग्रंथात प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध यांना महत्त्वाचे स्थान दिले आढळते. तत्कालीन समाजातील देवाबद्दलच्या व साधुत्वाबद्दलच्या काही भोंगळ कल्पना समर्थांनी आपल्या बुद्धिशास्त्राने साफ कापून काढल्या,” असे प्रा. के. वि. बेलसरे यांनी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. स्वामींच्या विचारांचा सारा भर बुद्धिनिष्ठ विवेक व सारासार विचार यांवर असल्याने आपल्या विवेचनात ते आधुनिक काळातील अनेक संकल्पनांवर सहजपणे भाष्य करून जातात. याचा अर्थ त्या संकल्पना त्यांना माहीत होत्या असा नाही. पण, त्यांच्या बुद्धीची झेप काळापलीकडे होती, असे अनुमान काढता येते. आज व्यक्तिमत्व विकासही आधुनिक काळातील उपपत्ती आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी ग्रंथलेखन करताना सहज जाता जाता स्वामी त्यातील तत्त्वांवर भाष्य करतात, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. तसेच ते अभ्यासण्याजोगे आहे.




भारतीय तत्त्वज्ञानात
ब्रह्महे सत्य असून जगत् मिथ्याअसे मानले आहे. जगन्मिथ्या यासाठी तत्त्वज्ञानात दोन दृष्टान्त दिलेले असतात. एक म्हणजे वस्त्रहे खोटे आहे, काल्पनिक आहे असा. वस्त्रात उभे आणि आडवे धागे असतात. ते घट्ट विणल्याने वस्त्रही काल्पनिक वस्तू तयार होते. जर ते धागे काढून घेतले तर काय शिल्लक राहते, काहीही नाही. म्हणजे वरून ही नुसती कल्पना आहे. दुसरा दृष्टान्त सोने व दागिना यासंबंधी सांगतात. सोन्याला नक्षीदार आकार देऊन त्याला दागिनाम्हणतात. जर त्या दागिन्यातील सोने काढून घेतले, तर काय शिल्लक राहील? काहीच नाही. म्हणजे दागिनाही कल्पना भ्रामक आहे. तसे या जगातील ब्रह्मदूर केले, तर हे जगत म्हणजे केवळ आभास. पण, हे जग आपल्याला डोळ्यांनी दिसते. आपल्या अनुभवास येते. मग ते खोटे कसे म्हणायचे. तत्त्वज्ञान भले जगाला भ्रामक म्हणो, या जगात, लोकात आपले जीवन घालवायचे आहे. तेव्हा आपल्या पुरते तरी जग खरे मानावे लागते. या लोकात वावरताना आपण प्रयत्नपूर्वक आपल्या ठिकाणी असलेल्या गुणांचा उत्कर्ष करावा लागतो. गुणांच्या विकासानेच आपले व्यक्तिमत्त्व सुधारता येते. शहाणपण शिकून आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व विकसित करता येते. आपले शरीर, त्याचे रंग, रूप, उंची, एकंदर ठेवण ही अनुवंशिकतेतून मिळालेली असते. ते आपल्या हातात नसते, म्हणून रूप-लावण्य काही अभ्यासाने मिळवता येत नाही. ते सारे उपजत असते. रूप लावण्याप्रमाणे शारीरिक कुरुपता झाकून ठेवता येत नाही.



कुरुपतेची लक्षणे । किती म्हणोनि सांगणे ।

रूप लावण्य या कारणे । पालटेना ॥ (दा. १४..)



सुदैवाने आपली शारीरिक बाह्यांगे चांगली लाभली असली तर ठीकच
, पण त्यावर काही व्यक्तिमत्त्व ठरवता येत नाही. आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक असावे असे वाटत असेल, तर त्यासाठी अवगुण टाकून देऊन उत्तम गुण घ्यावे लागतात. तसेच मूर्खपणा टाकून शहाणपण शिकावे लागते. उत्तमगुण व शहाणपण हे अभ्यासाने मिळवावे लागतात. त्यासाठी कष्ट करावे लागतात.



अवगुण सोडिता नाही । उत्तमगुण अभ्यासिता येती ।

मूर्खपण सांडिता जाते । शहाणपण शिकता येते ॥



आपले व्यक्तिमत्त्व चांगले राहून आपल्याला मान मिळावा
, असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते. त्यासाठी मिळेल तेथून, मिळेल त्याच्याकडून शहाणपण शिकण्याची हयगय करू नये. हे नेहमी लक्षात ठेवावे की, शहाणपणाशिवाय समाजात मोठेपणा, मान मिळत नाही. एखाद्या माणसाच्या ठिकाणी रूप, लावण्य आहे. पण, शहाणपणा अभावी त्याचे वर्तन मूर्खपणाचे असेल तर त्याच्या रूप लावण्याचा काय उपयोग? बाह्यात्कारे कितीही चांगले दिसण्याचा प्रयत्न केला तरी व्यक्तिमत्व सुधारत नाही. पण, शहाणपण शिकल्याने व सद्गुणांच्या संपादनाने अंतरंग सुधारते. ते व्यक्तिमत्त्वातून प्रगट होऊ लागते. मग या दोहींपैकी कोणता पर्याय निवडायचा याचा विचार केला पाहिजे.



चातुर्ये शृंगारे अंतर । वस्त्रे शृंगारे शरीर ।

दोहीमध्ये कोण थोर । बरे पहा ॥१८॥



आपला विवेक जागृत ठेवून या दोहोत कशाला जास्त महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. 
सर्वसाधारणपणे सामान्य माणसाची अशी अपेक्षा असते की, चांगले जेवण मिळावे, चांगली वस्त्रे परिधान करायला मिळावी आणि लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे. थोडक्यात अन्न, वस्त्र, मानसन्मान ही सर्वसाधारण अपेक्षा असते. यापैकी अन्न, वस्त्र ही मिळवता येतात. पण, मानसन्मान मिळण्यासाठी मनाने व शरीराने लोकांसाठी झिजावे लागते. तसेच लोकांना अडलेल्या कामात मदत केली पाहिजे. जो दुसर्‍याला सुखी करतो तो स्वतः सुखी होतो. जो दुसर्‍याला अकारण कष्ट देतो, त्याला पुढे कष्ट भोगावे लागतात, हा सृष्टीचा नियम आहे. या गोष्टी उघडपणे दिसत असल्या तरी त्या नीट समजून आचरणात आणून जे वागतात, ते खरे भाग्यवान पुरुष होत.


समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ॥


समर्थांनी ही अशी म्हणीवजा वाक्ये दासबोधात अनेक ठिकाणी वापरलेली आहेत. भाग्यवान पुरुषाचे व्यक्तिमत्त्व हे असे असते. अंतरंग सुधारून
, शहाणपणाने वागून लोकसंप्रदाय ठेवला तर तुम्हाला लोक भाग्यवान पुरुष म्हणून ओळखू लागतील. आपले व्यक्तिमत्त्व सुधारावे, यासाठी माणसाने सतत काम करीत राहून आपला व्याप वाढवला पाहिजे. तथापि समाजात सर्वसाधारणपणे व्याप तितका संताप अशी भावना असते. म्हणजे व्याप वाढला की, त्याहून अनेक कटकरी निर्माण होऊन मनस्ताप होतो. पण, समर्थांना हे मान्य नाही. समर्थांच्या मते, ‘जितका व्याप तितके वैभव.वैभव वाढवायचे असेल तर व्याप न वाढवता ते कसे मिळेल. समर्थांनी हिंदुस्थानभर ११०० मठांची स्थापना करून त्यावर महंत तयार करून पाठवले.


तो व्याप त्यांनी कसा सांभाळला असेल
, याची आपण कल्पना करू शकत नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी ना वाहतुकीची साधने, ना पोस्ट खाते, ना रेल्वे, टेलिफोन अथवा मोबाईल! सर्व व्याप यशस्वीपणे सांभाळून स्वामींनी संप्रदायाचे वैभव उभे केले. समर्थ पुढे सांगतात, एखादे अवघड काम कसे सिद्धीस न्यावे. समर्थांनी काम पार पाडण्यासाठी छान मार्गदर्शन केले आहे. त्यातून व्यक्तिमत्व उंचावण्यास मदत होते व व्यवस्थापन शास्त्राचेही काही नियम सहज समजतात. समर्थ सांगतात, सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की, आळसाने कार्यभाग होत नाही तेव्हा आळस टाकावा. आळस टाकून क्रमाक्रमाने हाती घेतलेले काम पुरे करावे. याचा अर्थ आपल्या कार्याचा पूर्ण नकाशा आपल्या नजरेसमोर पाहिजे. त्यात कामाचे टप्पे ठरवून ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करीत गेले तर कोणतेही कार्य आपण साध्य करू शकतो. हे उघडपणे दिसत असूनही ज्याला ते समजत नाही, त्याला शहाणा कसे म्हणता येईल.


आळसे कार्यभाग नसतो । साक्षेप होत होत होतो ।

दिसते गोष्टी कळेना तो । शहाणा कैसा ॥२७॥

आपले व्यक्तिमत्त्व उठावदार करून आपले कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांशी मैत्री जोडणे. भेटेल त्याला स्मितहास्य चेहर्‍यावर ठेवून नुसते नमस्कारम्हटले तरी, समोरची व्यक्ती सुखावते व मैत्रीचा हात पुढे करते. काही लोक इतरांना दुर्लक्षित करून आपल्याच तोर्‍यात असतात, ते परिचितांकडेही लक्ष देत नाहीत. अशा माणसाशी कोण मैत्री ठेवेल? ज्याला स्नेह जोडता येत नाही, तो उगीच इतरांशी वैर करीत बसतो व स्वतःचे नुकसान करून घेतो. अशा अज्ञानी माणसाला कधीही यश आणि समाधान मिळत नाही.



आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालला ।

बहुतांमध्ये येकल्याला । यश कैंचे ॥३१॥

व्यक्तिमत्त्व सुधारणेच्या अनेक उपयुक्त सूचना दासबोधात शोधता येतात. त्यापैकी एक म्हणजे लोकांशी मैत्री करून प्रेमरुपाने त्यांच्या अंतःकरणात शिरता आले पाहिजे. त्याने तुम्ही लोकांना हवेहवेसे वाटाल. शेवटी समर्थ सांगतात, नुसते आपले व्यक्तिमत्त्व सुधारल्याने जगाचे कल्याण होणार नाही, तर आपण लोकांनाही शहाणे केले पाहिजे.



शहाणे करावे जन । पतित करावे पावन ।

सृष्टिमध्ये भगवद्जन । वाढवावे ॥

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@