नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात जवळपासची प्रधानमंत्री जनौषधी केंद्र (पीएमजेएके) शोधून त्यात परवडणाऱ्या जेनेरिक औषधांची उपलब्धता आणि त्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी 'जनौषधी सुगम' मोबाइल ॲप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. सद्यस्थितीत भारतातील ३,२५ ,००० पेक्षा जास्त लोक जनौषधी सुगम मोबाइल अॅप वापरत आहेत.
डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागांतर्गत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेसाठी हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले. जवळपासची जनौषधी केंद्रे शोधणे, ते शोधण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग करणे, जनौषधी शोधणे, जेनेरिक आणि इतर नामांकित औषधांच्या किमतीमधील तफावत तसेच त्या अनुषंगाने होणारी बचत याबाबत विश्लेषण करणे इत्यादी सुविधा या ॲपद्वारे प्रदान करण्यात आल्या आहेत. जनौषधी सुगम मोबाइल ॲप हे अँड्रॉइड आणि आय-फोन या दोन्हीवर उपलब्ध आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे.