पालिका आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही गैरहजेरी
मुंबई : 'कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लढ्यात पालिकेसोबत काम करण्यास 'मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड' (वन् रुपी क्लिनिक) या संस्थेने नकार दिला आहे. आयुक्तांबरोबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीला निमंत्रित करूनही संस्थेचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेची यंत्रणा विविध स्तरावर दिवस-रात्र कार्यरत आहे. विलगीकरण, अलगीकरण विविध तपासण्या आदी मोहिमेत आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी राबत आहेत. वस्त्यांमधील काही खासगी डॉक्टरही पालिकेसोबत कामाला लागले आहेत. या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची इच्छा 'मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड' या संस्थेने स्वतः व्यक्त केली होती. त्यानुसार संस्थेच्या डॉक्टरांना महापालिकेच्या अखत्यारीतील काही विलगीकरण केंद्रांवर कार्यरत असलेल्या महापालिकेच्या डॉक्टरांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना 'क्वारंटाईन सेंटर' मध्ये कार्यरत महापालिकेच्या डॉक्टरांसोबत काम करता येऊ शकेल, असे सूचविण्यात आले. मात्र त्यालाही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्यानंतर सदर संस्थेने महापालिकेच्या 'फिव्हर क्लीनिक'मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. परंतु महापालिकेच्या 'फिव्हर क्लिनिक'चे काम हे प्रामुख्याने तंत्रज्ञांद्वारे केले जाते व त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. महापालिकेची सध्याची गरज डॉक्टरांची आहे, हे लक्षात घेऊनच त्यांच्या डॉक्टरांना प्रथम 'विलगीकरण केंद्रात' व त्यानंतर 'क्वारंटाईन सेंटर' येथे कार्यरत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांना मदत करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या दोन्ही बाबींना त्यांनी प्रतिसाद दिलेला नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. नुकतीच महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीला त्यांना अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीलाही सदर संस्थेचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिलेला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.