मुंबई : वडाळा बस आगारातील विद्युत विभागात काम करणाऱ्या कोरोनाबाधित कामगाराचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
वडाळा बस आगारात फोरमन पदावर काम करणाऱ्या या कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे ३ एप्रिलला आढळले होते. टिळक नगर येथे राहणारा हा कर्मचारी वडाळा बस आगारात फोरमन पदावर कार्यरत होता. त्याचा मंगळवारी रात्री उशीरा चेंबूर येथील एसआरवी रुग्णालयात मृत्यू झाला.
दरम्यान, बेस्ट उपक्रमात कोरोनाची लागण झालेले वडाळा बस आगारात फोरमन पदावर कार्यरत असणारे हे पहिले कामगार होते. त्यानंतर परळ बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कामगाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु काही दिवसांनंतर तिची दुसरी चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कामगाराला कोरोनाची लागण झाली आणि नंतर मृत्यू झाला यामुळे बेस्ट उपक्रमातील विशेष करून वाहक व चालकांसह अन्य कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गोरेगाव डेपोत काम करणाऱ्या वाहकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्याची कोरोना चाचणी केली असून अहवाल प्राप्त झालेला नाही.