यत्न तो देव जाणावा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
Dasbodh_1  H x



माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास महंताचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्ध अनुकूल होते.

समर्थांनी दासबोधाच्या दशक ११, समास ३ मध्ये तत्कालीन लोकांना सुखी-समाधानी जीवनासाठी दिनक्रम सांगितला आहे. तो आपण यापूर्वीच्या लेखात पाहिला. आज काळ बदलला आहे. कितीही सामाजिक, कौटुंबिक स्थित्यंतरे झाली असली तरी समास ११.३ मध्ये सांगितलेली दिनचर्या ज्या तत्त्वांवर आधारित आहे, ती तत्त्वे आचरणातआणून आजही सुखी-समाधानी जीवन जगता येते. समर्थ सांगतात, “कुठलेही काम मग ते छोटे असो वा मोठे, ते केल्याशिवाय होणार नाही. त्यासाठी प्रयत्न हवेत. म्हणून आळस बाजूला सारून आपल्या उद्योग व्यवसायात संबंधितांशी गोड बोलून राहिले, तर सकारात्मकतेने कार्य यशस्वी होते, हे प्रत्ययास येते. नकारात्मक विचार दूर सारले तर चांगले जीवन जगता येते. हा झाला प्रपंचाचा भाग, तसेच आपण परमार्थाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध ग्रंथांचे वाचन करून त्यावर चर्चा करावी, तसे केल्याने आपल्या विचारांमध्ये वाढ होते. ते परमार्थ व प्रपंच दोन्हीकडे उपयोगाचे आहे, असे समर्थ सांगतात. सर्वसामान्यपणे उद्योग-व्यवसायातील व प्रपंचातील यश आपल्या वाट्याला येऊ लागले की, माणसाला त्याचा गर्व होतो. त्याला वाटते की, मी उद्योग-व्यवसायात माझ्या कौशल्याने व मेहनतीने यश मिळवले आहे. तसे दुसर्‍यांना जमत नाही. अशा घमेंडीत माणूस गर्विष्ठपणे वागू लागतो. ‘मी’पणाचा गर्व झाल्याने तो बेपर्वा वृत्तीने वागू लागतो व त्याची वाट अध:पतनाच्या दिशेने होते. असे होऊ नये म्हणून स्वामींनी एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे.



आहे तितुकें देवाचें ।
ऐसें वर्तणें निश्चयाचे ।
मूळ तुटे उद्वेगाचें । येणेरीति ॥


जे सर्व आहे ते भगवंताच्या मालकीचे आहे, असा ठाम निश्चय करून जो वागतो, त्याने त्याच्या दु:खाचे मूळच छाटले असे समजावे. सर्व बाबतीत मालकी भगवंताची असून आपण त्याचे विश्वस्त म्हणून काम करायचे आहे. ‘भगवंत कर्ता’ हे एकदा पक्के मानले की मग गर्वाचा प्रश्नच उरत नाही.


रघुनाथ स्मरोनि कार्य करावे ।
ते तत्काळचि सिद्धी पावें।
कर्ता राम हे असावें।
अभ्यांतरी ॥ (३.८.३३)


गर्वापासून वाचण्यासाठी आपण भगवंताचा विश्वस्त म्हणून काम करीत राहावे,ही समर्थांनी मांडलेली विचारसरणी उपयोगी पडते. दासबोधाच्या ११.३ या समासातील निरुपण एवढ्यावर थांबते. यासंबंधी आणखी काहीतरी सांगायचे राहून गेले असे स्वामींना वाटले असावे म्हणून या समासानंतर पुढे आणखी १५ समास सांगून झाल्यानंतर मागील विषय लक्षात ठेवून समास १२.९ मध्ये पुन्हा हा विषय स्वामींनी चर्चेला घेतला. अभ्यासक, टीकाकार याला दासबोधाच्या रचनेतील विस्कळीतपणा म्हणोत. परंतु, समर्थांची स्मरणशक्ती सदैव जागृत असते हे यावरून सिद्ध होते.


मागील विषय पुढे चालवताना समर्थ १२.९ या समासात ‘प्रयत्नवादा’वर भर देताना दिसतात. काही माणसे प्रारब्धावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे सोडून देतात. पण, समर्थांना हे मान्य नाही. तळहाताच्या रेषांवरून भविष्य, प्रारब्ध सांगण्याची पद्धत पूर्वीही असावी. समर्थ सांगतात, ‘रेषा तितुकी पुसोन जाते’ म्हणजे या रेषा नाहीशा होतात, बदलतात. तेव्हा प्रारब्धावरभर देण्यापेक्षा माणसाने प्रयत्नवादी असावे.आळसाला थारा न देता माणसाने सतत नेटाने प्रयत्न करीत राहिले, तर दैवही त्याला अनुकूल होऊ लागते, असे समर्थ म्हणतात. या समासात समर्थांनी एका विपन्न अवस्थेत असलेल्या माणसाला उपदेश करण्याच्या निमित्ताने ‘प्रयत्नवादा’चे महत्त्व सांगितले आहे. सर्व संत ‘प्रयत्नवाद’ सांगतात. हे जरी खरे असले तरी समर्थांनी सांगितलेला ‘प्रयत्नवाद’ आगळावेगळा आहे. समर्थांनी प्रयत्नाचे गुणगान गाताना‘यत्न तो देव जाणावा’ असे म्हटले आहे. परंतु, अनेकदा प्रयत्न करुनही यश मिळत नाही, असे काही लोक म्हणतात. समर्थांच्या मते, प्रयत्न नीट करता येत नाही, असेच लोक प्रारब्धाला दोष देत बसतात. समर्थ म्हणतात, “प्रयत्न करीत असताना माणसाने सावधगिरी बाळगली पाहिजे. तेथे सावधानता नसेल तर प्रयत्न नीट होत नाही. यासाठी माणसाने प्रथम आळस सोडावा आणि चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असताना काही वेळा मन साशंक होईल, काही वेळा निराश होईल, तरीही मनाला जबरदस्तीने प्रयत्न करायला लावावे. मनातील साशंकता नैराश्य बाजूला ठेवून सावधानतेने प्रयत्न करावा.”


म्हणोन आळस सोडावा ।
येत्न साक्षेपे जोडावा।
दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळे।


माणसाने, मग तो विपन्न दशेत का असेना, प्रयत्नशील होण्यासाठी आपली जीवनशैली कशी बदलली पाहिजे, हे या समासात सांगितले आहे. मागील ११.३ समासाप्रमाणे येथेही थोडक्यात दिनचर्या सांगितली आहे, त्यात सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे. पूर्वी पाठ केले त्याची उजळणी करून काही नवीन पाठ करावे वगैरे सांगितले आहे. ते पूर्वीच्या समासाप्रमाणे आहे. व्यवसाय करताना कोण आपला आहे आणि कोण आपला नाही, हे नीट ओळखून काम करावे. सर्व ठिकाणी सावधानता ठेवून नीतिमर्यादा पाळावी. लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने काम करावे. आपल्या अंगी अनेक कला असाव्यात. आपले अक्षर सुंदर असावे. लोकांना आवडतील अशी वचने सांगावी. लोकांना आवडतील अशा भगवंताविषयीच्या कथा सांगव्यात. अध्यात्मावर चर्चा करावी. पण, हे सारे करताना लोकांना कंटाळवाणे होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लोकांमध्ये वावरताना आपले बोलणे आणि वागणे यात फरक नसावा नाहीतर लोक आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील. भगवंताच्या कथा ऐकायला लोकांना आवडतात म्हणून आपण त्यावर निरुपण करावे. आपली कथा अशी असावी की,


भक्ती ज्ञान वैराग्य योग ।
नाना साधनाचे प्रयोग।
जेणे तुटे भवरोग । मनन मात्रे।


हे सारे रामकथेत अनुभवायला मिळते म्हणून आपण रामकथा विश्वात सगळीकडे नेली पाहिजे. (रामकथा ब्रह्मांड भेटून पैलाड न्यावी ॥)


माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास महंताचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्ध अनुकूल होते. सावध राहून योग्य प्रकारे प्रयत्न केल्यास तो वाया जात नाही अन्यथा-


अंतरी नाही सावधानता ।
येत्न ठाकेना पुरता।
सुखसंतोषाची वार्ता । तेथे कैंची ॥


माणसाने प्रयत्न करताना तसेच प्रत्येक ठिकाणी आपली बुद्धी वापरली पाहिजे. एका अकलेवाचून या जगात दुसर्‍या कशाला महत्त्व नाही. म्हणून अक्कलहुशारीने प्रयत्न केला पाहिजे.


आकलबंद नाही जेथे ।
अवघेचि विश्वळीत तेथे।
येके अकलेवीण तें। काये आहे ॥


अशा रीतीने वागल्यास करंटेपणा शिल्लक राहणार नाही व प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही, हे बुद्धीला पटेल.

- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@