मलालाला ‘मलाल’ वाटतो का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020   
Total Views |


malala_1  H x W


ज्या देशांत मुलींचा शिक्षणासाठी उंबरठा ओलांडणे तालिबान्यांमुळे जीवावर बेतू शकते, त्या देशाने काश्मीरमधील मुलींच्या शिक्षणाची चिंता वाहण्याची कदापि गरज नाहीच. मलाला युसुफझाईला जर मुलींच्या शिक्षणाची एवढी चिंता सतावत असेल, तर तिने आता पुन्हा मायदेशी परतावे आणि गावाखेड्यात स्त्रीशिक्षणाचा सक्रिय प्रचार-प्रसार करावा.


आपल्या शेजारी ‘पापस्थान’चा एक दिवसही शांततेत जात नाही बघा. रोज काही ना काही अनुचित, विपरीत आणि अनाकलनीय बातम्या या देशातून समोर येत असतात. मग ती कधी ‘वझिर-ए-आजम’ इमरान खान यांची बेताल वक्तव्ये असो वा पाकिस्तानातील उच्चांक गाठणार्‍या महागाईच्या मरणकथा... हे सगळे बघता, या देशात खरंच काही चांगलेही घडत असेल का, असाच प्रश्न पडावा. पण, जिथे वरपासून अगदी खालपर्यंत फक्त काळाकुट्ट अंधारच आहे, तिथे प्रकाशाची, सकारात्मकतेची अपेक्षा तरी कशी करावी म्हणा. हो, पण २०१२ साली पाकिस्तानच्या याच अंधारलेल्या क्षितिजावर मलालारूपी नवआशेच्या ‘मसिहा’चा जणू पाकिस्तानींसाठी पुनर्जन्म झाला.



होय
, स्वात खोर्‍यात मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या मलालाच्या डोक्यात तालिबानींकडून गोळ्या झाडण्यात आल्या. पण, केवळ दैव बलवत्तर म्हणून ती हल्ल्यातून बचावली होती. खरं तर या हल्ल्यामुळेच लाखो पाकिस्तानींनाही मलाला माहीत झाली असावी. परंतु, घडल्या प्रकारानंतर मलाला आंतरराष्ट्रीय सहानुभूतीच्या जोरावर पुढील वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी लंडनमध्ये दाखल झाली. म्हणजे, पाकिस्तानी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून पाकिस्तानात कंठशोष करणार्‍या या मलालाला परदेश मानवला आणि आज ती अगदी बाणेदार इंग्रजीही झाडते. ‘इंटरनॅशनल आयकॉन’ ठरलेल्या मलालाला २०१४ साली ‘नोबेल’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. सर्वात कमी वयात ‘नोबेल’ पटकावणारी मलाला त्यामुळे सर्व महाखंडांच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. एवढ्या कमी वयात तिचे ‘आय एम मलाला’ हे आत्मचरित्रही झळकले. एवढेच नव्हे, तर कॅनडासारख्या देशाने तर तिला मानद नागरिकत्व देऊन सन्मानितही केले. मलाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.



पाकिस्तानातील मुलींचा ती बुलंद आवाजही ठरली
. पण, स्वदेशातील रुढीपरंपरांवर बोट ठेवण्यापेक्षा आणि आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष देण्यापेक्षा टिवटिवाट करून भारतालाच चार शब्द सुनावण्यात तिने वेळोवेळी धन्यता मानली. पण, काल-परवाच समोर आलेल्या एका घटनेनंतर आता मलालावरच ‘मलाल’ करायची वेळ ओढवली आहे. २०१२ साली मलालाच्या डोक्यात गोळ्या झाडणारा आणि २०१४ च्या पेशावर सैनिकी शाळेवरील हल्ल्याचा प्रमुख आरोपी एहसानुल्ला एहसान याने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. त्या क्लिपनुसार हा खतरनाक तालिबानी ११ जानेवारी, २०२० रोजी पाकिस्तानी सुरक्षारक्षकांच्या ताब्यातून पळून गेला. त्याच्या म्हणण्यानुसार, २०१७ साली त्याने आत्मसमर्पण करताना सरकारसमोर ठेवलेल्या अटींचे सरकारने पालन न केल्याने त्याने तुरुंगातून पळ काढला.



आता जर का ही ऑडिओ क्लिप खरी असेल तर पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांचा नाकर्तेपणाच जगासमोर उघडा पडेल
. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, २०१२ आणि २०१४ साली घडलेल्या एवढ्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठीही पाकिस्तान २०१७ पर्यंत एहसानच्या आत्मसर्मपणाची वाट पाहात बसला होता का? दहशतवाद्यांना थारा न देण्याची भाषा करणार्‍या खतरनाक एहसानला पाकिस्तानी सैन्याने शिक्षा देऊन मृत्यूदंड का ठोठावला नाही? का मलालाने यासंबंधी टिवटिवाट करून पाक सरकारला फैलावर घेतले नाही? आणि आता जेव्हा हा कुख्यात आरोपी सैन्याच्या तावडीतून निसटलाय, त्यावर मलाला गप्प का? या तालिबान्याने पुन्हा निष्पाप विद्यार्थिनींना लक्ष्य केले तर मलालाही त्यासाठी तिकतीच जबाबदार नसेल का? यांसारखे प्रश्न उपस्थित होेतात.


गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार केल्यानंतरही मलालाने ट्विटरवरून अकलेचे तारे तोडले होतेच
. म्हणे, काश्मीरमधील बिकट परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडतेय. त्यांना अटक करण्यात आली आहे. पण, पाकिस्तानात शिक्षण आणि खासकरून मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती किती भीषण आहे, हे मलालाहून चांगले कोण सांगू शकेल? त्यामुळे ज्या देशांत मुलींचा शिक्षणासाठी उंबरठा ओलांडणे तालिबान्यांमुळे जीवावर बेतू शकते, त्या देशाने काश्मीरमधील मुलींच्या शिक्षणाची चिंता वाहण्याची कदापि गरज नाहीच. मलाला युसुफझाईला जर मुलींच्या शिक्षणाची एवढी चिंता सतावत असेल, तर तिने आता पुन्हा मायदेशी परतावे आणि गावाखेड्यात स्त्रीशिक्षणाचा सक्रिय प्रचार-प्रसार करावा. मलाला, तुझा आरोपी आठ वर्षांनंतरही मोकाट आहे, तुला याबद्दल थोडा तरी ‘मलाल’ वाटत असेल तर वेळीच जागी हो!

@@AUTHORINFO_V1@@