खोट्याच्या कपाळी गोटा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2020
Total Views |


agralekh _1  H



हिंदूद्रोही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग करणार्‍या शिवसेनेच्या खोटारड्या नि बाटग्या सावरकरप्रेमाच्या कपाळी मतदानरूपी गोटा हाणण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनीच करायला हवी. जेणेकरून शिवसेनेसारख्या अप्रामाणिक, संधीसाधू पक्षाला पश्चात्तापासाठी पुष्कळ वेळ मिळेल नि हिंदू दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍यांशी संबंध जोडण्याच्या पापातून तो मुक्त होईल, शुद्ध होईल!

 



हिंदुत्वाची शाल पांघरून ज्यांचा घरगुती उद्योग महाराष्ट्रभर फोफावला
, ती शिवसेना आज भाजपवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ढालीसारखे वापरल्याचा आरोप करताना दिसते. परंतु, विधानसभेत सावरकरांच्या गौरव प्रस्तावाला विरोध करत तो धुडकावणारा सभापती कोणाचा होता? सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला जात असताना बघ्याची भूमिका घेत मृत्युंजयावर अपमानाचा वार करणारा निर्लज्ज सत्ताधारी कोण होता? आणि सावरकर गौरव प्रस्ताव मांडला जाणार, हे माहीत असल्याने काँग्रेसश्रेष्ठींची खप्पामर्जी होऊ नये म्हणून विधानसभेत गैरहजर राहणारा मुख्यमंत्री कोण होता? तर वरील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचाच संबंध असल्याचे दिसते. कारण, नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असले तरी ते शिवसेनेने काँग्रेसशी पाट लावल्यानेच तिथपर्यंत पोहोचले. म्हणजेच विधानसभा सभापतींच्या सावरकरविरोधी कृतीच्या चिखलाने काँग्रेसपेक्षाही अधिक शिवसेनेचेच हात बरबटल्याचे स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर सावरकर गौरव प्रस्ताव नाकारला जात असताना मूग गिळून गप्प बसणार्‍या शिवसेनेने आणि अनुपस्थित राहणार्‍या उद्धव ठाकरे यांनी आपणही स्वातंत्र्यवीरांचा अवमान करण्यात अजिबात कसर बाकी ठेवणार नसल्याचे दाखवून दिले.




काँग्रेसनेते राहुल गांधींपासून त्यांच्या
‘शिदोरी’ या मूर्खपत्राने सावरकरांविषयी बदनामीकारक माहिती प्रसारित केली. उल्लेखनीय म्हणजे, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या घरादाराचा होम करणार्‍या सावरकरांबद्दल अशी विधाने करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणारी शिवसेनाच होती व आहे. स्वतःला ‘सावरकरानुयायी’ म्हणवून घेणार्‍या शिवसेनेने त्यावरून कधीही आपल्या नव्या मित्रांना जाब विचारला नाही की निषेध केला नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव आणणे साहजिकच, त्यावर ‘आताच का,’ हा आक्षेप अनावश्यक ठरतो. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला जात असताना विरोधादाखल एक शब्दही उच्चारला नाही. यातूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर माती खाण्याच्या स्पर्धेत आपणही मागे नसल्याचे शिवसेनेने सिद्ध केले. अर्थात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या संस्कारानुसारच कृती करत असतो आणि शिवसेनेने आपल्याही रक्तात क्रांतिकारकांचा अवमान करणारे बेईमान रक्तच सळसळत असल्याचे दाखवून दिले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ज्यांची कोंडी केली, त्यांची अवस्था अशीच लाचारवाणी होणार म्हणा! विशेष म्हणजे हेच बेशरम लोक सावरकरांना भारतरत्न का दिला नाही म्हणून आरडाओरडा करताना दिसतात. तथापि, सावरकरांना भारतरत्न मिळेलच, त्यात कसलीही शंका नाहीच! फक्त त्याचे श्रेय शिवसेनेसारख्या निलाजर्‍यांनी घेऊ नये!



सत्तेच्या सोन्याच्या ताटासाठी राहुल-सोनियांचे पाय धरू आणि सावरकरांचा अपमान करूचा पवित्रा घेणार्‍या शिवसेनेने स्वातंत्र्यवीरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आणि गोमातेसंदर्भातील विचार भाजपला परवडतील का, असाही प्रश्न केला. हाच प्रश्न शिवसेनेला विचारून पाहूया, कारण शिवबंधनाचा तमाशा मांडत जो येईल त्याच्या हातात गंडे-दोरे बांधण्याची अंधश्रद्धा त्याच पक्षाने सुरू केली व जोपासली. शिवसेनेचे हे वर्तन प्रखर बुद्धीवादी, विज्ञानवादी सावरकरी तत्त्वाला धाब्यावर बसवणारेच होते. म्हणूनच विज्ञाननिष्ठेच्या बाता मारत एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या दावणीला जुंपण्यासाठी नसत्या उठाठेवी करणार्‍या शिवसेनेचीच या मुद्द्यावरून सावरकरांनी पिसे काढली असती, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे. तसेच सावरकरांचे गोमातेसंदर्भातील वाक्य तत्कालीन विशिष्ट परिस्थितीला अनुसरून होते आणि नंतर त्यांनी गोसंवर्धनाचाही पुरस्कार केला. पण शिवसेनेसारख्या बिनडोक पक्षाने ते समजून न घेता वेगळ्या अर्थाने ते वाक्य वापरले. मात्र, शिवसेनेने ज्या अनुषंगाने सावरकरांच्या गोमातेविषयक भूमिकेचा उल्लेख केला, तो उचलून आता तो पक्ष आपल्या शाखेशाखेवर गायींचे कत्तलखाने उघडणार का आणि उघडणार असेल तर कधी, हेही जाहीर करावे.



भाजपच्या
‘माझी जन्मठेप’ या ग्रंथाच्या जाहीर वाचन घोषणेनेही शिवसेनेच्या पोटात दुखू लागले नि सावरकरांचे आत्मचरित्र घराघरात पोहोचल्याचे त्या पक्षाने म्हटले. अर्थात ते खरेच आहे, सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ ही आत्मकथा घराघरात पोहोचलीच, पण ते पुस्तक ठाकर्‍यांच्या घरी आहे का? की सत्तेच्या मस्तीत ‘माझी जन्मठेप’ही घराबाहेर फेकून दिले? कारण सावरकरांना अंदमानात ज्या यातना, वेदना, दुःख भोगावे लागले आणि तरीही त्यांच्या मन-मेंदूने हार मानली नाही, ते कसे, याचा जिवंत दाखला म्हणजे ‘माझी जन्मठेप’. परंतु, हा ग्रंथ शिवसेना पक्षप्रमुखांच्या घरी असता तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दांत उल्लेख करणार्‍यांबरोबर त्यांनी सत्तेचा बकाणा भरण्याचे काम केले नसते. म्हणूनच गांधी-पवारांपुढे झुकत शिवसेनेने सावरकरांना जसे वार्‍यावर सोडले तसेच माझी जन्मठेपही उद्धव ठाकरेंनी माहिमच्या खाडीत बुडवले असावे, असे वाटते. तसेही जिथे फायदा तिथे शिवसेना, हाच कित्ता त्या पक्षाने कायम गिरवला. त्यामुळे मलिद्यासाठी त्या पक्षाच्या प्रमुखाने ‘माझी जन्मठेप’ला विरोध करण्याचे कृत्य केले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाहीच!



स्वातंत्र्यलढ्यात रा
. स्व. संघ कुठे होता? असा सवालही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळत शिवसेनेच्या दिवट्यांनी केला. अर्थात वरचा मजला रिकामा असला की अक्कलशून्य माणूस अशी बडबड करणारच. कारण इतिहास अभ्यासावा लागतो, शोधावा लागतो, पण जे आकंठ सत्तासुखात रममाण झालेत ते हे कसे करू शकतील? महात्मा गांधींनी दांडी यात्रेची घोषणा करत मिठाचा सत्याग्रह केला, तेव्हा विदर्भात समुद्रकिनारा नसल्याने संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहाची हाक दिली. तसेच डॉ. अ. वि. परांजपे यांच्याकडे सरसंघचालकपदाची जबाबदारी देऊन त्यांनी अनेक स्वयंसेवकांसह ब्रिटिशांविरोधात आवाज बुलंद केला व परिणामस्वरूप त्यांना नऊ महिने सश्रम कारावासाची शिक्षाही झाली. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनातही संघ कार्यकर्त्यांनी भाग घेतला आणि चिमूट-आष्टी भागात समांतर सरकार स्थापन केले. ब्रिटिश पोलिसांनी या आंदोलकांवर अमानवी अत्याचार केले नि त्यात १२ स्वयंसेवकांनी बलिदान दिले. दरम्यान, सॅण्डर्सला गोळ्या घालणारे हुतात्मा राजगुरू हे तर भोसले वेदशाळेत शिकत असल्यापासून संघ स्वयंसेवक होते. पण हे अजूनही अंड्यात असणार्‍या शिवसेनेच्या रांगत्यांना कसे कळणार?



संघावरील बंदी आणि राष्ट्रध्वजाच्या मान
-सन्मानाचा कालबाह्य मुद्दाही शिवसेनारूपी फावड्याने उकरून काढला. संघबंदीचा विषय कोणता होता तर महात्मा गांधींची हत्या! पण त्यातून संघ निर्दोष सुटला आणि सरदार पटेल यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात गांधीहत्येशी संघाचा काहीही संबंध नाही, हे स्पष्ट केले. मात्र, संघबंदीचा मुद्दा काढून शिवसेनेने सावरकरांनाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. कारण, ज्या मुद्द्यावर संघावर बंदी लादली गेली, त्यात सावरकरांचा हात असल्याचा दावा काँग्रेसने केलेला होता आणि आजही त्या पक्षाचे नेतृत्व असेच बरळत असते. म्हणूनच आज संघाचे नाव घेणारे उद्या दिल्लीवरून ‘मॅडम’चा आदेश आला तर सावरकरांनाही न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायला कमी करणार नाही, असे वाटते. तिरंगा-राष्ट्रध्वजाबद्दलही संघाने नेहमीच आदर बाळगला आणि सन्मानही केला. तसेच १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५०पर्यंत आपल्या कार्यालयातही फडकावला. परंतु, नंतरच्या काळातील राष्ट्रध्वजविषयक कठोर नियमांमुळे त्यात खंड पडला आणि २००२ साली या नियमांत सूट मिळाली तेव्हापासून तिरंगा फडकावण्याची परंपरा पुन्हा सुरू झाली. म्हणूनच शिवसेनेने डोके ठिकाणावर असेल तर संपूर्ण माहिती घ्यावी आणि संघाबद्दलचा अपप्रचार बंद करावा.



दरम्यान
, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाप्रभुत्वाचा दाखलाही शिवसेनेने दिला व शुद्धीचे महत्त्व सांगितले. शिवसेनेचे म्हणणे खरेच आहे, पण सावरकर हिंदुत्वनिष्ठ हिंदू संघटकही होते. म्हणूनच सावरकरांचा शुद्धीचा वारसा पुढे नेत हिंदूद्रोही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग करणार्‍या शिवसेनेच्या खोटारड्या नि बाटग्या सावरकरप्रेमाच्या कपाळी मतदानरूपी गोटा हाणण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनीच करायला हवी. जेणेकरून शिवसेनेसारख्या अप्रामाणिक, संधीसाधू पक्षाला पश्चात्तापासाठी पुष्कळ वेळ मिळेल नि हिंदू दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍यांशी संबंध जोडण्याच्या पापातून तो मुक्त होईल, शुद्ध होईल!

@@AUTHORINFO_V1@@