माझा मराठीची बोलू कौतुकें।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |

marathi rajbhasha din _1&


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची आज जयंती. हा दिवस महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ही खर्‍या अर्थाने कुसुमाग्रजांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच आहे.



प्रख्यात साहित्यिक पु
. ल. देशपांडे म्हणतात, “पंढरीचा पांडुरंग हे जसे महाराष्ट्राचे आध्यात्मिक दैवत आहे, तसेच कुसुमाग्रज हे राज्याचा सांस्कृतिक ठेवा आहेत.” भाषेच्या श्रेष्ठत्वाविषयी कुसुमाग्रज सांगतात, “भाषा ही सर्वार्थाने प्रबळ आहे, ती एक महाशक्ती आहे, पण तिच्या सामर्थ्याबद्दल साशंक असलेली तिची अपत्ये मात्र दुबळी आहेत.” अत: अजूनही वेळ गेलेली नाही, जागे व्हा अन् आपल्या मराठी भाषेचा महिमा सार्‍या विश्वाला अवगत व्हावा, यासाठी एकदिलाने तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याकरिता कटिबद्ध व्हा. आमचं वैर कोणा भाषेशी नाही. मावशीच्या नात्याने इंग्रजीशी तर नाहीच नाही. मावशीबाईने आता आईच्या घराचा कब्जा पुन्हा आईकडे द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. चला तर, मायमराठीच्या संवर्धनासाठी आणि मराठीपण व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध होऊया.



भाषावार प्रांतरचनेनुसार १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली
. ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४नुसार मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अमलात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजेच २०१० साली मराठी भाषा विभागाची मंत्रालयात निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार हे या विभागाचे मुख्य धोरण आहे. या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अन् महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे विभाग कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन तत्सम कार्यक्रमांतून राज्य शासन मराठीचे श्रेष्ठत्व व संवर्धन करण्याच्या दृष्टीने जनजागृती करीत असते.



भाषा हे संवादाचे माध्यम असून
, आपले विचार व अनुभवांना प्रगट करणारा महामार्ग आहे. त्याद्वारे आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. या प्रांजळ उद्देशानेच कुसुमाग्रज आपल्या मायमराठीसमोर आदराने नतमस्तक होतात. शिरवाडकरांनी मायमराठीविषयक केलेलं विधान अतिशय हृदयद्रावक आहे. ते म्हणतात,“मराठी भाषेच्या मस्तकावर राजमुकुट आहे, पण तिच्या अंगावरची वस्त्रे मात्र फाटलेली आहेत. खरंतर, मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली विधिवत प्रतिष्ठापना होईल, या आशेने ‘ती’ मंत्रालयाच्या पायथ्याशी ताटकळत उभी आहे.” तात्पर्य, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्यातून तिची भाषक प्रतिष्ठा वाढीस लागेल, हे लक्षात घेऊन शासनस्तरावर ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे.



वास्तविक पाहता
, कुसुमाग्रज हे माणसात माणूसपण रुजविण्यासाठी व त्याला निर्भय बनविण्यासाठी आपल्या काव्यपंक्तीत सांगतात, “गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तिरावरी नदीच्या, गवतातूनी उरावे.” तसेच ‘आदेश’ या कवितेत म्हणतात, “अंधाराचा आसरा थोडावेळ विसरा, काळजात जपा, उजेडाचा वसा.” कविवर्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. त्यासंदर्भात ते म्हणतात, “हवा कशाला ईश्वर, तुम्ही तुमचेच धनी, असेच म्हण तू ईश्वर वदला, मी लपतो तव मनी.’ याशिवाय ‘किनारा’, ‘सविधा’, ‘मराठी माती’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘रसयात्रा’, ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘स्वगत’ आदी काव्यसंग्रह मराठी क्षितिजावर खूप गाजले आहेत. मराठी भाषेची थोरवी गाताना कविवर्य सुरेश भट म्हणतात, “आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी, लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म-पंथ-जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.” ज्ञानेश्वरांनी तर मराठीला अमृताची उपमा दिली आहे. अमृतासारखी वा त्याहूनही गोड असलेली माझी-तुमची मराठी.



मराठीजनांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करीत आहे
. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ठाकरे सरकारला आम्ही मराठी भूमिपुत्र लाख लाख धन्यवाद देतो. ज्येष्ठ-श्रेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज ज्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण काव्यलेखनाच्या माध्यमातून अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी जनमानसावर अधिराज्य केलं, अशा महान कविवर्याच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२० रोजी ‘हा’ निर्णय घेणे म्हणजे त्यांना खर्‍या अर्थाने आदरांजली देणे होय. भाषिक व सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी मराठी भाषा बोलण्याचा प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे अन् महाराष्ट्रात राहणार्‍या अन्य राज्यांतील भाषकांनीही मराठी बोलण्यासाठी आग्रही असले पाहिजे. त्याचप्रमाणे आपापल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी दाखल केले पाहिजे. असे केल्याने कुसुमाग्रजांसारख्या अन्य कवी व साहित्यकारांचे मायमराठीला समृद्ध करण्याचे प्रयत्न सार्थक ठरतील.



मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याविषयी ठाकरे सरकारने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे
. महाराष्ट्र राज्य निर्मितीला आता ६० वर्षे पूर्ण होतील, तथापि इतक्या वर्षात मागील राज्य सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून केंद्राकडून मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला नाही, याचे वाईट वाटते. गेल्या १५ वर्षांत केंद्राने संस्कृत, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात दर्जा दिला. त्यातल्या त्यात मल्याळमला कोणत्या तार्किक आधारावर अभिजात दर्जा दिला, यावर नेहमी वादळी चर्चा होते. मुंबईतील उत्तर भारतीयांना मराठी बोलण्यास आग्रह धरणार्‍या राज्यातील मराठी भाषक नेत्यांचा मात्र आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्याकडे कल असतो अन् आपल्या हॉटेल्सचे नावही ते इंग्रजी भाषेत टाकतात. म्हणजे लोका सांगे बह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी प्रेम निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे भाषेचा खरा विकास हा संवादातून होतो. ‘Charity Begins at home’ या पार्श्वभूमीवर शिक्षकांसह पालकांनीही मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न करावेत, तरच मुलांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण होईल, हे ध्यानी ठेवावे.



वास्तवात
, मातृभाषेची उपेक्षा म्हणजे सांस्कृतिक दारिद्य्राचं लक्षण होय, आजच्या आधुनिक युगात इंग्रजीसह मराठीचं वर्चस्व व महत्त्व वृद्धिंगत होणे, ही काळाची गरज आहे. आता राज्य शासनाने मंत्रालयातील सर्व फाईल्सवरील शेरे हे मराठीतच लिहिले पाहिजेत, असा दंडक घालून दिला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयांमध्येदेखील मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, इंटरनेट व अन्य सोशल मीडियावर मराठीचे स्थान बळकट होत जाणं, ही स्तुत्य बाब आहे. कारण, जगभरात बारा कोटींहून अधिक लोकांची मराठी ही मातृभाषा आहे. समाजमाध्यमांच्या मदतीने मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांना अवगत व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत. मराठी भाषा जागतिक पातळीवर नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हे त्यामागील उद्दिष्ट आहे. ‘मेक इन इंडिया’ प्रमाणेच ‘मेक इन मराठी’ अशा अर्थाची मराठी चळवळ उभारणे ही काळाची गरज आहे. थोर मराठी संशोधक व्यं. केतकर, वि. का. राजवाडे, वि. ल. भावे, रा. भि. जोशी, इरावती कर्वे आदींच्या मते मराठी ही किमान अडीच हजार वर्षे जुनी भाषा आहे. या गोष्टींच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात वास्तव पटवून देऊन केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा विनाविलंब मिळवून घ्यावा आणि मा. पंतप्रधानांनीदेखील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून महाराष्ट्राला न्याय द्यावा, म्हणजे मराठी राजभाषा दिन साजरा करणे सार्थक ठरेल. जय महाराष्ट्र! जय मायमराठी!

-

 - रणवीर राजपूत

@@AUTHORINFO_V1@@