कर्मवीर दादासाहेब गायकवाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
Karmavir Bhaurao Gaikwad
 

जनमानसातील, दलित चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, मुत्सद्दी भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आज ४९वा स्मृतिदन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारा हा लेख...
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक क्रांतिकारक चळवळीच्या समुद्रमंथनातून अनेक रत्ने बाहेर आली. त्यातील सर्वात अग्रक्रमाने ज्या रत्नाचे नाव घेता येईल, ते रत्न म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड उर्फ भाऊराव कृष्णराव गायकवाड.
 
दि. १५ ऑक्टोबर, १९०२ रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे नावाच्या छोट्याशा गावातील अस्पृश्य कुटुंबात जन्मलेले भाऊराव कृष्णराव गायकवाड. पुढे एक मुत्सद्दी भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी अशा रूपात जनसामन्यास परिचित झाले. पण, बारकाईने अभ्यास केल्यास त्याहीपेक्षा कर्मवीर दादासाहेबांचे कार्य अजून कितीतरी मोठे आहे, असे मला वाटते.
 
 
दादासाहेब स्वत: प्रसिद्धीपासून कायम दूर राहणे पसंत करत असल्यामुळे त्यांच्या कार्याची म्हणावी तशी माहिती अजूनही जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. कर्मवीर दादासाहेबांच्या जीवनकार्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतील. एक म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात दिलेले योगदान जे जपमाळेतल्या मेरुमण्याइतके महत्त्वाचे होते आणि दुसरे म्हणजे, त्यांनी स्वतंत्रपणे केलेले अथांग समुद्राएवढे कार्य.
 
सामाजिक समतेसाठी केलेला संघर्ष. शैक्षणिक क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी आणि राजकीय क्षेत्रात उमटविलेला आपला वेगळा असा ठसा. या सगळ्यांची स्वतंत्रपणे दखल घेणे क्रमपात्रही आहे आणि आवश्यकही. कारण त्याशिवाय त्यांची ओळख अपूर्ण आहे असे मी मानतो. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांविषयी बोलताना एकदा बाबासाहेब म्हणाले होते की, “जर मी माझे आत्मचरित्र यदाकदाचित लिहिले, तर त्यात अर्धा अधिक भाग भाऊरावांचा असेल, त्याशिवाय ते परिपूर्ण होणार नाही,” या स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या उद्गारातून दादासाहेबांच्या कार्याची पोचपावती आपल्याला मिळते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जातीसंस्थेच्या विरोधात दादासाहेबांच्या बरोबर दलित चळवळीने जे काही अद्भुतपूर्व सत्याग्रह केले, त्यात एक म्हणजे, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, दुसरा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आणि तिसरा मुखेडचा सत्याग्रह. हे तिन्ही सत्याग्रह दलित चळवळींसाठी महत्त्वाचे आणि निर्णायक मानले गेले. हे तिन्ही सत्याग्रह जरी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाले असले, तरी शोधदृष्टीने बघितल्यास या सत्याग्रहाचे नियोजन आणि महत्त्वाचे म्हणजे ‘जनसंघटन’ याची संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांनी सांभाळलेली होती.
 
सत्याग्रह सुरू असताना जमलेल्या प्रचंड जनसागराला कोठे प्रोत्साहन द्यायचे आणि कोठे नियंत्रणात ठेवायचे, ही सगळी दृष्टी दादासाहेबांची असायची, यावरून त्यांच्यातल्या स्वतंत्र नेतृत्वाची ताकद कळून येते. दादासाहेबांनी बाबासाहेबांचे शिष्यत्व पत्करले होते. पण, ते गुरूवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे अंधश्रद्धाळू शिष्यही नव्हते. ते बाबासाहेबांचे शिष्य होते, बाबासाहेबांनी जसे बुद्धाला गुरू मानले, पण त्याचा प्रत्येक शब्द, वचन, तत्त्व चिकित्सक नजरेने तपासून घेतले.
 
हीच परंपरा बाबासाहेबांच्याच प्रेरणेने दादासाहेबांनीही जोपासली. ते स्वत: विचार, चिंतन, मनन करत मग स्वत:चे मत बनवत. त्यांची स्वत:ची अशी एक भूमिका कायम असे. बाबासाहेब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार करून चळवळीचे डावपेच आखत, तर दादासाहेब स्थानिक समस्येचे व्यवहारिक प्रतिबिंब चळवळीत कसे उमटेल, यासाठी प्रयत्न करीत. बाबासाहेबांना गुरू मानून त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळेच दादासाहेबांना मतभेद नोंदविण्याची ताकद मिळाली होती.
 
चवदार तळ्याच्या प्रश्नावर १९२७ साली अस्पृश्यवर्गाच्या दोन परिषदा झाल्या, १ मार्च महिन्यात, तर दुसरी डिसेंबरच्या शेवटी. पहिली परिषद यशस्वी झाली. पण, सवर्णांनी चवदार तळ्याच्या केलेल्या शुद्धीकरणामुळे व्यथित होऊन बाबासाहेबांनी दुसरी परिषद घेण्याचा निर्णय घेतला. पण, ऐनवेळी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून ब्रिटिश सरकारने ही परिषद तहकूब करण्याची सूचना केली.
 
बाबासाहेबांनाही सद्यःस्थितीत तथाकथित सवर्णांशी सुरू असलेल्या संघर्षाबरोबर ब्रिटिशांशीही संघर्ष करणे योग्य वाटत नव्हते. कारण, गोलमेज परिषदेच्या रूपाने आता कुठे ब्रिटिशांशी संवादाची सुरुवात होऊ पाहत होती आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला त्याचे महत्त्व माहीत होते, म्हणून त्यांनी स्वत:च परिषद तहकूब करण्याचा ठराव मांडला आणि त्या ठिकाणी जमलेल्या अफाट जनसमुदायावर उदासीनतेचे सावट पसरले.
 
तेथे उपस्थित असलेल्या दादासाहेबांनी संपूर्ण जनसमुदायाला उद्देशून गर्जना केली, “सत्याग्रह झालाच पाहिजे. त्या निश्चयानेच आपण येथे आलेलो आहोत. घरी जाऊन काय सांगणार? आपण माघार घेतली म्हणून? नाही. आपला निर्धार कायम ठेवा. काय व्हायचे ते होईल. परंतु, आता माघार नाही.” दादासाहेबांच्या या आवाहनाला जमलेल्या जनसमुदायाकडून जो प्रतिसाद मिळाला, त्याने बाबासाहेबही विस्मयचकित झाले.
 
नंतर दादासाहेबांना बाजूला घेऊन बाबासाहेबांनी त्यांना परिषद तहकूब करण्यामागचा आपला हेतू समजावून सांगितला, तेव्हा दादासाहेब लगेच बाबासाहेबांना म्हणाले की, “साहेब, तुम्ही या जमलेल्या जनतेची काळजी करू नका, त्यांना मी समजावून सांगतो” आणि संपूर्ण जमावाला आपल्या वक्तृत्वाने शांत केले. त्याचवेळी बाबासाहेबांनी दादासाहेबांना हेरले होते. मग पुढे काय, दादासाहेब कायमच बाबासाहेबांचा उजवा हात होऊन राहिले.
 
दादासाहेबांच्या संघटन कौशल्यामुळेच पुढे काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह इतका दीर्घकाळ म्हणजे १९३० ते १९३५ पर्यंत धैर्याने चालू शकला. कारण, त्यावेळी बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या कामानिमित्त दीर्घकाळ भारतातून बाहेर होते. काळाराम मंदिरासह, मुखेड सत्याग्रहाची कमानही दादासाहेबांनीच समर्थपणे संभाळली होती. बाबासाहेबांना या गोष्टीचे फार कौतुक असायचे.
 
१४ एप्रिल, १९३७ ला येवला येथे झालेल्या सभेत दादासाहेबांविषयी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, “काळाराम सत्याग्रहाच्या वेळी माझा भाऊराव गायकवाड प्रत्येक कसोटीवर १०० नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. हे सोनं अतिशय शुद्ध आहे. सर्व प्रकारच्या आगीतून तावूनसुलाखून निघून ते जसेच्या तसे शुद्ध राहिले आहे, तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे. हाच माझा उजवा हात आहे. त्याने सार्वजनिक कार्य, तुमची उन्नती, तुमची प्रगती हेच स्वत:च्या जीवनाचे ध्येय मानले आहे. त्याला अन्य जीवन नाही.”
 
दादासाहेबांच्या याच स्वभावगुणामुळे त्यांचे अस्पृश्येतरांशीही सौहार्दपूर्ण संबंध होते, त्यामुळेच त्यावेळी चळवळीला अनेक स्पृश्य मित्रही लाभले. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव देशपांडेनी तर मुंबईच्या काँग्रेस हाऊसमध्ये मंदिरप्रवेशाला काँग्रेसने पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
 
६ डिसेंबर, १९५६ ला बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले आणि १९५७ साली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर वर्षभरातच रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. तरी १९५७च्या या निवडणुका ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’च्या नावानेच संयुक्त महाराष्ट्र समितीचा एक घटक पक्ष म्हणून दादासाहेबांना लढवाव्या लागल्या. या निवडणुकीत मुंबई विधानसभेत आणि लोकसभेतही जेवढे दलित आमदार-खासदार दादासाहेबांनी निवडून पाठविले, तेवढे त्यानंतर कोणालाही पाठवता आले नाहीत.
 
त्यानंतर झालेले भूमिहीनांचे आंदोलन हे तोपर्यंत झालेल्या सगळ्या आंदोलनांपेक्षा जास्त व्यापक आणि प्रचंड असे होते, ज्याचे सर्वार्थाने यशस्वी नेतृत्व दादासाहेबांनी केले. या आंदोलनाचे वेगळेपण हे होते की, यामध्ये दलितांच्या मोठ्या प्रमाणात सहभागाबरोबरच दलितेतर भूमिहीनही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दादासाहेबांचे संपूर्ण आयुष्य चळवळी उभारण्यात आणि त्या चळवळींचे नेतृत्व करण्यात खर्ची पडले.
 
स्वत:वरचा विश्वास आणि लोकजागराचा ध्यास ही दादासाहेबांच्या जीवनकार्याची दोन मजबूत चाकं होती. त्यावरच त्यांना अजोड कर्तृत्व साधता आले. विधानसभेत, संसदेत आणि राज्यसभेत दादासाहेबांनी ग्रामपंचायती, कामगार, बौद्धांसाठी राजकीय सवलती, लघु-उद्योगासाठी दलितांना सहकार्य, महार वतन बिल, अशा अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
 
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही कर्मवीर दादासाहेबांच्या कार्याचा सिंहाचा वाटा होता. तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र समितीत सर्वश्री एस. एम. जोशी, कॉ. डांगे, आचार्य अत्रे, कॉ. नानापाटील यांच्यासारख्या रथी-महारथींबरोबर आंबेडकरी चळवळीचा प्रतिनिधी म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सिंहाचा वाटा घेऊन उभे होते.
 
१९२७च्या चवदार तळ्याच्या मुक्तिसंग्रामापासून तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे जवळ-जवळ अर्धे शतक कर्मवीर दादासाहेबांनी समाजाची अविरत सेवा केली. ऊन, वारा, पाऊस, मान-अपमान कशाचीही पर्वा न करता, सारा महाराष्ट्र पायाखाली घालत दलितांसाठी आपले प्राण वेचले आणि आपल्या या अवाढव्य कार्याबद्दल कधीही कशाचीही अपेक्षा केली नाही. १७ वर्षे खासदार राहूनही अगदी साधे आणि काटकसरीचे जीवन जगत त्यांनी खासदारकीचा सगळा पैसा विविध सामाजिक कार्यांना दान केला.
कर्मवीर दादासाहेब हे अत्यंत नि:स्वार्थी व त्यागी व्यक्तिमत्त्व होते. सार्वजनिक जीवनात आपले चारित्र्य स्वच्छ असावे. समाजाकडून जमा होणार्‍या पैशांची उधळपट्टी करू नये, यावर त्यांचा कटाक्ष होता. अनेक वेळा रेल्वे स्टेशनच्या बाकावर पथारी टाकून त्यांनी रात्र काढली. परंतु, हॉटेलवर पैसे उधळले नाहीत. इतकी वर्षे राजकारणात राहूनही त्यांना आपल्या आयुष्यात स्वत:च्या मालकीचे घर घेता आले नाही.
आलेले सर्व वेतन त्यांनी नाशिकच्या रमाबाई विद्यार्थी वसतिगृहास न चुकता दर महिन्याला पाठविले. एवढेच नव्हे, तर आयुष्याच्या शेवटी बँकेतील जमा रु. ६००० रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहास दान देऊन शिल्लक शून्य ठेवली. पुढे जेव्हा त्यांना अर्धांगवायूचा आजार झाला, त्यावेळी ते राज्यसभेचे सदस्य होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यानंतर ते अंथरुणाला खिळूनच होते.
दादासाहेब हे जनमानसातील नेते होते. थोरामोठ्यांच्या सहवासात त्यांना खूप सन्मान असायचा. गोरगरिबांच्या समस्या लवकरात लवकर कशा मार्गी लागतील, यासाठी ते वाटेल ते करायला तयार असत. आयुष्यभर दलितांच्या उद्धारासाठी झटलेला हा समाजवेडा माणूस स्वत:चे दुःख स्वत:च्या वेदना मात्र कायम लपवत राहिला. आपली पीडा आपल्याकडेच ठेवून २९ डिसेंबर, १९७१ रोजी हा अवलिया आपल्या सर्वांना अनाथ करून गेला. एका संघर्षमय जीवनाचा इतका करुण अंत जनसामान्यांची अंतकरणं पिळवटून गेला. आज त्यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा हा जागर त्यांच्याच म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या चरणी विनम्र अर्पण.
- काशीनाथ पवार
@@AUTHORINFO_V1@@