घोडबंदर रोडचे पाणी श्रेयवादात अडकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
manohar dumbare_1 &n

नागरिकांमध्ये तीव्र संताप



ठाणे:घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली, तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या इशाऱ्यानंतरही घोडबंदर रोड परिसराला वाढीव पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडचे पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. व या प्रकारावरून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर या संदर्भात भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबर रोजी आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यात घोडबंदरवासियांसाठी वाढीव १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते. मात्र कार्यवाही झालीच नाही. या संदर्भात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठक घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याचे निर्देश दिल्याने, शिवसेनेमुळेच पाणी समस्या सुटल्याचा दावा केला गेला.


एकाच बैठकीत निर्णय धसास लावल्याचा दावा करून वाढीव पाणीपुरवठ्याचे श्रेय लाटण्याचा महापौरांचा प्रयत्न होता.त्यावर भाजपाच्या डुंबरे यांनी शरसंधान करून दोन वर्ष पाण्यासाठी ठणाणा सुरू असताना शिवसेना झोपली होती का? असा सवाल केला होता. हे दावे,बैठकी आणि इशाऱ्यांना साधारण तीन आठवडे उलटल्यानंतरही, घोडबंदर रोडवरील पाणीबाणी कायम आहे. शिवसेना विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौरांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर समाज माध्यमावर ब्रह्रांडमधील पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपाला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही उतरल्याचे वृत्त समोर येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@