फुटबॉलचा जादूगार हरपला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020   
Total Views |

Maradona_1  H x
 
 
 
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. फुटबॉल विश्वात उत्कृष्ट कामगिरीने अल्पावधीत नाव कमाविणाऱ्या या जादूगाराविषयी...
 
 
 
भारतामध्ये फुटबॉल हा तसा क्रिकेटनंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध खेळ. मात्र, तरीही क्रिकेटसाठी जेवढे प्रेम भारतीयांच्या मनात आहे, तेवढेच प्रेम हे फुटबॉलबद्दलही आहे. ८० ते ९०च्या दशकामध्ये भारतीयांना फुटबॉलसह अनेक ग्लोबल खेळांचे वेड होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘क्रिकेटचा देश’ मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात जेव्हा फुटबॉल, टेनिस, रेसिंग विश्वातील दिग्गज खेळाडू भारतात दाखल झाल्यानंतर ओसंडून वाहणारा जनसागर. अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतात क्रीडाक्षेत्राला मिळणारे प्राधान्य आणि प्रेम पाहून भारतासाठी काहीना काही योगदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे डिएगो मॅराडोना. फुटबॉलच्या धाग्यानेच मॅराडोना आणि भारताचे नाते जोडले गेले. त्यानंतर त्याने अनेक वेळा आपल्या देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतवारी केली. जगातील फुटबॉल विश्वात महान स्थानावर नाव प्रस्थापित केलेल्या या खेळाडूचे भारताबद्दल विशेष आकर्षण होते, तसेच क्रीडाप्रेमी असणाऱ्या आणि क्रीडाविश्वात स्वतःचे नाव उंचावू पाहणाऱ्या, प्रत्येक तरुणाच्या घराच्या भिंतींवर त्याचे पोस्टर असायचे. अद्यापही भारतामध्ये मॅराडोनाचा चाहतावर्ग काही कमी नाही. त्याच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...
 
डिएगो अरमान्डो मॅराडोना याचा जन्म अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्समध्ये झाला होता. त्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला फुटबॉल हा भेट म्हणून मिळाला आणि फुटबॉलमध्ये त्याची रुची वाढत गेली. त्याचे भाऊ ह्यूगो व रॉल हेदेखील व्यावसायिक फुटबॉलपटू होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने छोट्याछोट्या क्लबमधून खेळण्यास सुरुवात केली. पुढे लॉस सेबोलिटास ब्यूनस आयर्सचा कनिष्ठ संघाचा प्रमुख झाला. १९७६ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने फुटबॉलमध्ये व्यावसायिक पदार्पण केले. १२ वर्षांचा असताना एका फुटबॉल स्पर्धेमध्ये त्याने स्वतःचे कौशल्य दाखवत सर्वांना अचंबित केले. दि. २० ऑक्टोबर, १९७६ रोजी त्याने अर्जेंटिना ज्युनियर संघात पदार्पण करत व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. पुढे १९८१ मध्ये ‘बोका ज्युनियर्स’ संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. त्यानंतर बार्सिलोना संघात प्रवेश करत संघाला सर्वोत्तम स्थानापर्यंत पोहोचविले.
 
 
पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाकडून खेळताना सर्वोत्तम कामगिरी करत १९८६ मध्ये तो सर्वोच्च स्थानी पोहोचला. १९८६ वर्ष हे त्याच्यासाठी संस्मरणीय ठरले. यावर्षी ‘विश्वचषका’त मॅराडोनाने केलेले दोन गोल हे त्याच्या कारकिर्दीतील आणि फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल्समध्ये गणले जातात. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध हे दोन गोल केले होते. या गोल्सना ‘हॅण्ड ऑफ गॉड’ आणि ‘गोल ऑफ दि सेंच्युरी’ मानले जाते. या सामन्याला इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील युद्धाची पार्श्वभूमी होती. मॅराडोनाने केलेला गोल त्याच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये गेला. फुटबॉलमध्ये बॉल हाताला लागणे हे नियमबाह्य मानले जाते. परंतु, पंचांनी हा गोल अर्जेंटिनाला बहाल केला. अर्जेंटिनाकडून त्याने ९१ सामन्यात प्रतिनिधित्व केले. यामध्ये ३४ गोल्स केले असून, ९१ गोल्ससाठी सहकार्य केले होते. अनेक सामन्यांमध्ये त्याने ‘सामनावीरा’चा किताब पटकावला आहे, तसेच त्याने चार ‘विश्वचषक’ स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले आहे. मॅराडोना यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण २५९ गोल्स केले. क्लबस्तरावर मॅराडोना यांनी ५८८ सामन्यांमध्ये मिळून ३१२ गोल्स केले होते. १९९७ मध्ये त्याने फुटबॉलच्या मैदानातून निवृत्ती घेतली. मात्र, मैदानाशी नाते तोडले नाही. एक प्रशिक्षक म्हणून त्याने फुटबॉलच्या खेळामध्ये स्वत:ला झोकून दिले. ‘अर्जेंटिनास ज्युनियर्स’, ‘बोका ज्युनियर्स’, ‘बार्सिलोना’ या क्लबसह तो ‘नेपोली’, ‘सेविला’, ‘नेवेल्स ओल्ड बॉयस’ या क्लबकडूनही खेळला आहे, तसेच त्याने आठ संघांचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
 
 
 
भारतासोबत मॅराडोनाचे संबंध हे खूप जिव्हाळ्याचे राहिले. आपल्या देशातील तरुणांचे फुटबॉलवरील प्रेम पाहून मॅराडोनादेखील प्रभावित झाला होता. २००८ आणि २०१७ मध्ये त्याने भारतीय दौरा केला होता. यावेळी त्याने भारतीय फुटबॉलला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तेव्हा सांगितले होते. २००८ मध्ये तो एका चॅरिटी सामन्यासाठी कोलकातामध्ये आला होता. यावेळी फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या आणि खास त्याच्यासाठी तो सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना पाहून तो भारावून गेला होता. २०१७ मध्ये त्याने भारतात येऊन तरुणांना मार्गदर्शनही केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, “भारतामध्ये फुटबॉल खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमी नाही. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.” दुर्दैवाने हा त्याचा शेवटचा भारतदौरा ठरला. प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करत ‘मॅराडोना म्हणजे फुटबॉल’ अशी ओळख जगभर तयार करणाऱ्या या अलौकिक खेळाडूला ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
 
@@AUTHORINFO_V1@@