‘व्होटकटवा’ ओवेसी!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2020
Total Views |

AIMIM_1  H x W:
 
 
रालोआच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पाहता काँग्रेसने ओवेसींवर केलेला ‘व्होटकटवा’ हा आरोप निरर्थक ठरतो व भाजप आपल्या जोरावर तिथे मजबूत असल्याचे समजते. तसेच एमआयएमने महागठबंधनशी हातमिळवणी केली असती तरी तिथे रालोआचेच उमेदवार जिंकले असते, हेही दिसून येते.
 
 
बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाने रालोआत उत्साहाचे-आनंदाचे वातावरण आहे, तर राजद-काँग्रेससह विरोधकांत सुतकी! भाजप व रालोआच्या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली व स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आपल्या पराभवाचे खापर आता एमआयएम व असदुद्दीन ओवेसी यांच्यावर फोडताना दिसत आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यापासून काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा ओवेसींना ‘भाजपचा एजंट’ ठरवत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मात्र, काँग्रेस, राजदसारखे कथित सेक्युलर पक्ष आणि त्यांचे पाठीराखे पुरोगामी बुद्धिजीवी-बुद्धिमंत लक्ष्य करत असतानाच असदुद्दीन ओवेसींनी त्यांना आणखी एक झटका दिला.
 
 
बिहार विधानसभा निवडणुका लढवून व तिथे पाच जागा जिंकून आत्मविश्वास दुणावलेल्या ओवेसींनी आता पश्चिम बंगालचीही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. परिणामी, भाजपविरोधकांना एमआयएमच आपल्यापुढील सर्वात मोठा अडथळा वा धोका वाटल्यास नवल नाही. त्याचे प्रत्यंतर विरोधकांच्या ओवेसींवरील जोरदार टीका-टिप्पणीवरुनच येते. बिहारमधील निवडणूक निकालानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “बिहारनंतर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशमधल्या निवडणुकाही आम्ही लढवणार.
 
 
देशातील लोकशाही शासनप्रणालीने आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला असून आमचा पक्ष स्वयंसेवी संस्था नाही. केवळ सेमिनार घेण्याचे आणि कागद दाखवण्याचे काम आम्ही करणार नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि निवडणुकाही लढवणार आहोत.” ओवेसींनी यावेळी बंगाल काँग्रेससह कित्येक नेत्यांवर निशाणा साधला व आपला इरादा स्पष्ट केला. ते म्हणाले की, “ओवेसी एक तारा आहे, मला जे काही करायचे ते मी करतो. आम्ही बंगालमध्ये येत आहोत आणि कोणत्याही किंमतीवर तिथे जाऊ. आम्ही मुर्शिदाबाद, मालदा, दिनाजपूर भागात जाऊ. अधीर रंजन चौधरींनी काय तिथे मुस्लिमांचा ठेका घेतला आहे?”
 
 
दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी बिहारच्या संदर्भाने असदुद्दीन ओवेसी यांच्यावर ‘वोटकटवा’ अशी टीका केली होती. त्यालाच ओवेसींनी उत्तर दिले, त्याचप्रमाणे आकडेवारीसह तथ्यही समोर मांडले. त्यावरुन तरी एमआयएम असला काय आणि नसला काय भाजपला काही फरक पडत नाही व भाजपचा विजय निश्चितच असतो, हेही स्पष्ट होते. कसे ते समजून घेऊ. एमआयएमने बिहारमध्ये २० मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले होते व त्यापैकी केवळ पाच ठिकाणी विजय मिळवला. उर्वरित नऊ जागा महागठबंधनला, तर रालोआला सहा जागा मिळाल्या. मात्र, राओलाच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पाहता, काँग्रेसने ओवेसींवर केलेला ‘व्होेटकटवा’ हा आरोप निरर्थक ठरतो व भाजप आपल्या जोरावर तिथे मजबूत असल्याचे समजते. तसेच एमआयएमने महागठबंधनशी हातमिळवणी केली असती तरी तिथे रालोआचेच उमेदवार जिंकले असते, हेही दिसून येते.
 
 
साहेबगंज मतदारसंघात रालोआतील व्हीआयपी पक्षाचा उमेदवार १५ हजार मतांनी विजयी झाला व इथे एमआयएला चार हजार मते मिळाली. छतरपूरचा भाजप उमेदवार २० हजार मतांनी जिंकला व इथे एमआयएमला फक्त १ हजार, ९९० मते मिळाली. नरपतगंज येथे भाजप उमेदवार २८ हजार, ५०० मतांनी विजयी झाला व इथे एमआयएमला ५ हजार, 4९५ मते मिळाली. तसेच प्राणपूर, रानीगंज व बरारी मतदारसंघातही अशीच परिस्थिती होती व रालोआच्या उमेदवाराने एमआयएमच्या तुलनेत अधिक मतांनी विजय मिळवला. परिणामी, काँग्रेस, राजद किंवा या तथाकथित सेक्युलर पक्षांचे पाठीराखे एमआयएमला भाजपला जिंकून देणारा ‘व्होटकटवा’ म्हणतात, त्यात अर्थ नसल्याचे स्पष्ट होते. बेरजेच्या राजकारणाने महागठबंधनला एमआयएमची सर्व मते मिळाली असती तरी त्यांचे उमेदवार जिंकले नसते, म्हणूनच ओवेसींवरील ‘भाजपचा एजंट’चा आरोपही चुकीचा ठरतो.
 
 
अर्थात कितीही आकडेवारी समोर टाकली तरी काँग्रेस, राजद किंवा सेक्युलर पक्षांचे हितचिंतक ते मान्य करतीलच असे नाही. कारण, त्यांना आपण गमावत असलेला जनाधार दिसत नाही, आपले वैचारिक आणि राजकीय अधःपतन दिसत नाही व म्हणून ते ओवेसींना भाजपची ‘बी टीम’ही ठरवू पाहतात. त्यामुळे असदुद्दीन ओवेसींच्या पश्चिम बंगालमधील निवडणूक लढवण्याच्या घोषणेने सेक्युलर कळपात खळबळ माजणे साहजिकच म्हटले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सत्ता गाजवत आहेत. पण ‘माँ, माटी, मानुष’च्या नार्‍याला विसरत ममतांनी आपल्या कार्यकाळात केवळ मुस्लीम एके मुस्लीमचाच धोशा लावला. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांसाठी त्यांनी पायघड्या अंथरल्या आणि ही मुस्लीम प्रजा आता तिथे बर्‍यापैकी मतदारही आहे.
 
 
आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची मदार याच मुस्लीम मतांवर असणार, कारण हिंदूंच्या नवरात्रोत्सवापासून वसंत पंचमी, राम नवमी या सणांवर निर्बंध घालण्याचे काम ममतांनी या मतांसाठीच केले. पण, असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली व त्याचा फटका ममता बॅनर्जींनाच बसणार. कारण, बिहारपेक्षाही पश्चिम बंगालमध्ये डझनावारी मतदारसंघ असे आहेत, जिथल्या उमेदवारांचे भविष्य मुस्लीम मतदार ठरवतात. बिहारमध्ये ‘मुस्लीम + यादव’ असा प्रकार चालतो, तर बंगलच्या या मतदारसंघात मुस्लिमांवर भिस्त ठेवली तरी ममतांसारख्या नेत्याचे, त्यांच्या पक्षाचे काम भागते. इथेच ओवेसी ममता बॅनर्जींसमोरील मोठे संकट सिद्ध होऊ शकतात.
 
 
भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भरघोस यश मिळवले व विधानसभा निवडणुकीतही भाजपचा विजयाचा सिलसिला सुरुच राहील. त्यात एमआयएममुळे मतविभागणी होऊन भाजपला फायदा होणार नाही, पण तृणमूल किंवा अन्य मुस्लिमांतील लोकप्रिय पक्षांच्या मतांची टक्केवारी नक्कीच घटू शकते. भाजपने जागा जिंकण्यावर त्याचा परिणाम नाही झाला तरी जनाधार कमी होणे, हेदेखील या पक्षांसाठी नुकसानच ठरेल. म्हणूनच आता काँग्रेस, राजद, तृणमूल काँग्रेस वगैरेंना ओवेसी संकट वाटतात व ते त्यांच्यावरच टीका करताना दिसतात.



@@AUTHORINFO_V1@@