पॅरीस : भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचे आकडे कमी होण्याच्या मार्गावर असताना आता एक चिंतेची बाब पुढे येत आहे. युरोपात कोरोना परिस्थिती पुन्हा बिघडण्याच्या स्थितीत आहे. या खंडातील एक महत्वाचा देश मानला जाणाऱ्या फ्रान्सने येथे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जास्त धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टेलीग्राफ’नुसार, कोरोना विषाणूंच्या संक्रमणात अचानक झालेल्या वाढीमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हा आदेश जाहीर केला आहे. देशातील सर्व दुकाने, बार, हॉटेल्स आणि रेस्टोरंट्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर निघण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
त्याशिवाय ब्रिटनहून फ्रान्समध्ये येणाऱ्यांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी कागदपत्र बाळगणाऱ्यांनाच यात प्रवेश मिळणार आहे. मॅक्रॉन म्हणाले, कोरोना विषाणू गतीने पसरत आहे. याचा अंदाज लावण्यात आला नव्हता. आपणही इतर शेजारी देशांप्रमाणे विषाणूच्या विळख्यात अडकलो आहोत.
जर्मनीने पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सुरू केला आहे. फ्रान्स आणि जर्मनीच्या तुलनेत ब्रिटनमध्ये अधिक प्रमाणात कोरोना विषाणू पसरत आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा ताण पडत आहे. लॉकडाऊनच्या वृत्तामुळे स्थानिक शेअर बाजार निर्देशांकही कोसलळे आहेत.