होय, काँग्रेस नेतृत्वासोबत माझे मतभेद - राहुल गांधींच्या वाढदिवशी शशी थरूर यांची घोषणा

    19-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी विद्यमान काँग्रेस नेतृत्वासोबत आपले मतभेद आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य थरूर यांनी त्यासाठी निवडले.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसशी मतभेद असल्याच्या चर्चेविषयी अखेर मौन सोडले आहे. थरूर म्हणाले की, पक्ष नेतृत्वातील काही लोकांशी माझे मतभेद आहेत, परंतु निलांबूर पोटनिवडणुकीमुळे मी त्याबद्दल बोललणार नाही. मात्र, निवडणुकीनंतर यावर चर्चा केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस, त्याची मूल्ये आणि त्याचे कार्यकर्ते मला खूप प्रिय आहेत. मी १६ वर्षे पक्ष कार्यकर्त्यांसोबत जवळून काम केले आहे आणि ते त्यांना जवळचे मित्र मानतात.

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ते या मतभेदांबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी नसण्याबाबत थरूर म्हणाले, जेथे आपणास आमंत्रित केले जात नाही, तेथे आपण जात नाही. परंतु त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारास यश मिळावे आणि निलांबूरमधील यूडीएफ उमेदवार विजयी व्हावा असेही मत व्यक्त केले.

राहुल गांधी यांना वाढदिवसाची भेट ?

एकेकाळी काँग्रेस नेतृत्वाचे खास असलेल्या शशी थरूर यांच्याविषयी काँग्रेस नेतृत्व अर्थात सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली आहे. त्याविषयी कबुली देण्यासाठी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. प्रामुख्याने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी थरूर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश, प्रवक्ते पवन खेडा आदी ज्येष्ठ नेत्यांनीही थरूर यांच्यावर टिका केला आहे. त्यामुळे थरूर आता ‘आर या पार’च्या मनस्थितीत असल्याचे दिसते.