‘कोरोना’पेक्षा मोठा आजार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020   
Total Views |
illness_1  H x


कोरोना महामारी एकवेळ जगातून हद्दपार होईलही, संपूर्ण जगही त्यानंतर पूर्वपदावर येईल. परंतु, या संकटाने केलेले आघात निस्तारत असताना जगाचे झालेले नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारेच असेल. जगभरातील लोकांमध्ये जाणवणारे मानसिक आजार हे त्याचेच एक उदाहरण आहे. त्यावर वेळीच पावले उचलली नाहीत, तर ही समस्या अधिक भीषण रुप धारण करु शकते.
न्यूयॉर्कमध्ये मूळ भारतीय असणार्‍या एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने याबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे. कोरोना विषाणू महामारी जर वेळीच आटोक्यात आली नाही, तर एक मानसिक आजार निगडित विविध समस्यांचा महापूर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यातच मानसिक आजार आणि त्यांच्या समस्यांकडे आपल्याकडे केले जाणारे दुर्लक्ष पाहता कोरोनापेक्षाही भयाण अवस्था रुग्णांवर उपचार करताना येईल, अशी भीती आहे.
 
 
 
अमेरिकेत ‘हावर्ड’ विद्यापीठात संशोधन पत्रिका लिहिणारे लेखक विक्रम पटेल यांनीही यावर भाष्य केले आहे. मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांवर बोलणारे लोक तर फारच कमी आहेत. मुळात हा प्रश्नच उपेक्षित आहे. कोरोना महामारीनंतर ही समस्या वाढली आहे, ही गोष्ट कुणीही निश्चित सांगू शकेल. व्यक्तीचे सामाजिक आरोग्य बिघडवण्यासाठी ही बाब इंधन म्हणून काम करते.
 
 
कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ज्याप्रकारे गेल्या काही महिन्यांत वाढले आणि त्यातच लस येण्यापूर्वी दुसरी लाट आली, तर परिस्थिती याहून वाईट होईल, अशी भीती अनेकांना आहे. मानसिक आजार या विषयावर बोलणारे आणि त्याला मंच उपस्थित करून देणारे भारतात काय, अमेरिकेतही तितकेच फार कुणी नाही. त्यामुळे हा आजार तसा दिसून येणे शक्यच नाही. मात्र, वाढत्या आत्महत्या, तणाव, चिंता, आर्थिक स्थैर्यप्राप्तीसाठी दररोज केली जाणारी धडपड यातून याचे प्रमाण दिसून येते.
 
 
‘लॉकडाऊन’मुळे शाळांमध्ये मुलांचे एकत्र न येणे, महाविद्यालयांबद्दलही तोच नियम, कार्यालयात आपल्या सहकार्‍यांशी कमी झालेले संवाद याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठे प्रत्येकावर झाला आहे. कुटुंबातील तणावात एकटेपणा जाणवण्याचे असलेले प्रकार याला वेळीच वाचा फोडून जागतिक स्तरावर उपाययोजना गरजेच्या आहेत. हेच काम अमेरिकेतील हे संशोधक सध्या करत आहेत.
 
 
पटेल पुढे म्हणतात, “दैनंदिन चिंता आहेतच, त्यात आपल्याला कोरोना विषाणूची लागण होईल का, ही भीती सर्वांमध्ये घर करुन आहे. त्याव्यतिरिक्त भविष्याची चिंता, स्पर्धा, थांबलेले व्यवहार, कुटुंबावर कोसळणारी आर्थिक संकटांची कुर्‍हाड या गोष्टींची चिंता आज प्रत्येक वर्गातील प्रत्येकालाच आहे. तसेच आर्थिक संकटात असलेल्या सर्वांसाठी ही गोष्ट लागू आहेच.”
 
 
ही चिंता केवळ श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांनाच आहे का, तर नाही; समाजातील तळागाळातील व्यक्तीही या संकटाशी झुंज देत आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये अनेक सिनेकलाकार किंवा प्रशस्त व्यक्तींच्या आत्महत्येच्या बातम्या कानावर येत आहेत. तसेच काही कुटुंबातील घरातील सदस्यांच्या बाबतीतही असेच प्रकार घडताना दिसतात. मानसिक आजार हे  संकट किती भयाण असू शकते, याचे दाहक वास्तव या घटना पाहिल्यावर डोळ्यासमोर उभे राहील.
 
 
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मलपास यांनी व्यक्त केलेले भाकीत महत्त्वाचे आहे. महामारीमुळे दहा कोटींहून अधिक लोक गरिबीच्या रेषेतून आणखी खाली जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक मंदी आणि मानसिक आरोग्य समस्या पसरवण्यापासून थांबवणे ही सध्या जगासमोरील चिंता आहे.
 
 
अमेरिकेत हे संकट २००८ मध्ये आले होते. पैशाचे सोंग कसे करणार, हाच एक दाहक प्रश्न सर्वांसमोर आहे. त्या काळातही अमेरिकेत आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार वाढत होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी आजही अनेक जण झुंज देत आहेत. मानसिक आरोग्य समस्या हे महामारीपेक्षाही मोठे संकट आहे, ही बाब यावेळी पटेल यांनी अधोरेखित केली आहे.
‘जागतिक आरोग्य संघटने’नेही कोरोनासोबत या संकटाशीही सामना करण्यासाठी पावले उचलण्याची गरज यातून व्यक्त होते. ‘लॉकडाऊन’नंतर आता जनजीवन सुरळीत सुरू आहे. मात्र, संक्रमणवाढीचा धोका कायम आहे. ‘लॉकडाऊन’चा मानसिक आरोग्यावर होणारा परिणामही यात लक्षात घ्यायला हवा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@