निरर्थक संशोधन : रिकामटेकडे उद्योग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


Leonardo Da Vinci_1 

 


पाश्चिमात्त्य देशांत वेगवेगळे संशोधक सतत काहीतरी नवीन शोधून काढण्याच्या मागे लागलेले असतात. यात पूर्णपणे नवीन असं काहीतरी शोधून काढण्याबरोबरच, जुन्या घटना किंवा व्यक्ती नव्या प्रकाशात पाहण्याचाही प्रयत्न असतो आणि या मामल्यात त्यांच्या आवडत्या व्यक्ती म्हणजे मोनालिसा, शेक्सपिअर आणि नेपोलियन.


लिओनार्दो द विंची हा जगद्विख्यात कलावंत युरोपातल्या इटली या देशात १५व्या शतकात होऊन गेला. ‘लास्ट सपर’ आणि ‘मोनालिसा’ ही त्याची अत्यंत गाजलेली चित्रं, पैकी ‘लास्ट सपर’ हे मिलान शहरातल्या एका ख्रिश्चन मठाच्या भिंतीवर काढलेलं आहे, तर ‘मोनालिसा’ हे कॅनव्हासवर काढलेलं तैलचित्र आहे. ‘मोनालिसा’सह त्याची इतरही अनेक चित्रं पॅरिसच्या ‘लुव्र’ या संग्रहालयात गेली पावणेपाचशे वर्षे जपून ठेवण्यात आलेली आहेत. लिओनार्दोने त्या चित्राला ‘मोनालिसा’ हे नाव दिलं आहे. पण, मुळात ही मॉडेल स्त्री कोण होती? तर ती फ्लॉरेन्स शहरातल्या एका उमरावाची पत्नी होती. या पलीकडे कोणतीही माहिती अगोदर उपलब्ध नव्हती. पण, हे संशोधक पिसाटल्यासारखे तिच्या मागे लागलेले आहेत. ती करीत असलेलं किंचित स्मित हे गूढ आहे, इथपासून ते तिने काळा वेष परिधान केलाय. कारण ती विधवा होती, ती लिओनार्दोची प्रेयसी होती, रखेल होती, चित्र काढण्याच्या वेळेला ती गरोदर होती. इत्यादी नाना प्रकारच्या चित्रविचित्र उपपत्ती आजवर मांडण्यात आलेल्या आहेत. मोनालिसाच्या चेहर्‍याचा बाज बराचसा पुरुषी वळणाचा आहे. त्यावरून कुणीतरी लिओनार्दोच्या स्वतःच्या उपलब्ध चित्रातील चेहर्‍याचा आणि मोनालिसाच्या चेहर्‍याचा अभ्यास करून अशी उपपत्ती मांडली की, मोनालिसा हे स्वतः लिओनार्दोचं स्त्री वेषातलं चित्र म्हणजे ‘सेल्फ पोर्ट्रेट’ आहे. अलीकडे युरोपात असेही संशोधक आहेत की, त्यांना ऐतिहासिक व्यक्तींच्या भानगडी, कुलंगडी, लफडी यात फार रस असतो आणि या मानसिक विकृतीची पुढची पायरी म्हणजे त्यांना एखादा ऐतिहासिक पुरुष हा स्त्रीलंपट होता, असं सिद्ध करण्यापेक्षा तो ‘गे’ म्हणजे समलिंगी होता, असं सिद्ध करायला फार आवडतं. त्यानुसार काहींनी उपपत्ती मांडली की, स्वतःचंच चित्रण स्त्रीवेषात करणारा लिओनार्दो हा ‘गे’ असला पाहिजे.


तीच गोष्ट शेक्सपिअरची. विल्यम शेक्सपिअर हा इंग्लंडमधल्या वॉरविकशायर परगण्यातल्या स्टॅ्रटफर्ड-अपॉन-अ‍ॅव्हान नावाच्या खेड्यातल्या एका खाटकाचा मुलगा. ३७ लहान-मोठी नाटकं आणि काही काव्यसंग्रह असा त्याचा साहित्यसंभार आहे. आज ४०० वर्षांनंतरही त्याच्या नाटकांमधलं नाट्य असं जबरदस्त आहे की, मोठमोठ्या नटांना, चुकलो, अभिनेत्यांना रंगभूमीवर शेक्सपिअरच्या व्यक्तिरेखा उभ्या करणं हे आव्हान वाटतं. पण, संशोधकांचं एवढ्यावर समाधान होत नाही. शेक्सपिअरची म्हणून समजली जाणारी नाटकं ही त्याची नव्हेतच, इथंपासून सुरुवात झाली. शेक्सपिअरच्या काळात इंग्लंडवर राणी एलिझाबेथ पहिली हीचं राज्य होतं. तिचा एक मंत्री सर फ्रान्सिस वॉल्सिंगहॅम याने गुप्तहेर खात्याची पुनर्रचना करून जोरदार काम चालवलेलं होतं. शेक्सपिअरचा मित्र ख्रिस्तोफर मार्लो हा स्वतः उत्तम नाटककार होता आणि वॉल्सिंगहॅमचा हस्तकही होता. पुढे त्याचा एका दारूच्या अड्ड्यावर खून झाला. काही संशोधकांचं म्हणणं असं की, मार्लो हा प्रतिभावंत नाटककार होता. गावोगाव फिरणार्‍या नाटक कंपनीत आपला हस्तक असावा, म्हणून वॉल्सिंगहॅमने मार्लोला गुप्तहेर बनवलं. पण, शत्रुराष्ट्रांना ही खबर मिळाली आणि त्यांनी त्याचा काटा काढला. काही गोपनीय राजकीय कारणांमुळे, मोर्लोने लिहिलेली नाटकं त्याच्या कंपनीचा मालक विल्यम शेक्सपिअर याच्या नावावर दाखवण्यात आली. काहींचं म्हणणं असं की, मोर्लो हा मुळात गुप्तहेरच होता. पण, तो उत्तम लेखकही असल्यामुळे शेक्सपिअरच्या मालकीच्या नाटक कंपनीचा लेखक, असं त्याचं स्वरूप ठेवण्यात आलं. ‘टायटस अँड्रोनिकस’, ‘लव्ह्स लेबर लॉस्ट’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’, ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ इत्यादी नाटकं लिहिण्यात शेक्सपिअरबरोबर तोसुद्धा सहभागी होता. इथपर्यंतही ठीक आहे. पण, शेक्सपिअर नावाचा खराखुरा माणूसच नव्हता. तो ‘गे’ होता; तो पुरुष नसून स्त्री होता, असली संशोधनं म्हणजे आचरटपणाच म्हटला पाहिजे. शेक्सपिअरच्या साहित्यकृतींमधून प्रकट होणार्‍या जीवनविषयक चिंतनाची स्तुती जगभरच्या समीक्षकांनी तर केलीच आहे. पण, योगी अरविंदांसारख्या महर्षीनेही केली आहे. अशा श्रेष्ठ चिंतकाबद्दलची अशी आचरट संशोधनं म्हणजे, ‘चार ठाव फुकट गिळायला मिळतंय म्हणून केलेले नसते उपद्व्याप,’ असंच म्हटलं पाहिजे. तीच तर्‍हा नेपोलियनची. ‘फ्रेंच राज्यक्रांती’ ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा उद्घोष करणारी, सामान्य माणसाला दिलासा देणारी एक महान घटना वगैरे गोष्टी आपण शालेय इतिहासात शिकत असतो. प्रत्यक्षात, राजा, राणी, सरदार यांना गिलोटिनखाली ठार मारल्यावर, राज्यकारभार कुणी नि कसा चालवायचा, यावरून क्रांतिकारकांमध्येच सुंदोपसुंदी माजली. अनेक प्रसिद्ध क्रांतिकारक नेते त्यांच्या प्रतिस्पर्धी नेत्यांकडून गिलोटिनखाली ठार झाले. मग एक प्रतिनिधी मंडळ अस्तित्वात आलं नि एकमेकांच्या विचारविनिमयाने राज्यकारभार हाकू लागलं. पण, या सगळ्या घटनाक्रमात सामान्य माणसाच्या समस्या होत्या तशाच राहिल्या, किंबहुना वाढल्याच.


या कालखंडात नेपोलियन बोनापार्ट हा फ्रेंच तोफखाना दलातला एक कनिष्ठ अधिकारी होता. त्याचा बाप साधा सैनिक होता. तो कॉर्सिकन होता. फ्रान्सच्या दक्षिणेकडे भूमध्य समुद्रात कॉर्सिका नावाचं बेट आहे. फ्रान्सच्या मुख्य भूमीवरचे लोक कॉर्सिकन लोकांना हलके समजतात. म्हणजे, नेपोलियन बोनापार्ट हा एका कथित हलक्या समाजातला, सामान्य बापाचा पोरगा होता. पण, प्रतिनिधी मंडळाच्या कारभाराच्या कालखंडात त्याने आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवायला सुरुवात केली. पराक्रमाने चढत चढत तो प्रमुख सेनापती बनला. सामान्य नागरिकांच्या तर तो कंठातला ताईतच बनला. मग योग्य वेळ पाहून त्याने नालायक प्रतिनिधी मंडळाची हकालपट्टी केली आणि तो फ्रान्सचा अभिषिक्त सम्राट बनला. रणांगणावर त्याने फ्रान्सला अनेक चमकदार विजय मिळवून दिलेच. पण, तो उत्तम प्रशासक होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या लंब्याचवड्या बाता करणार्‍या इंटेलेक्युअल क्रांतिकारकांना जे जमलं नाही, ते त्याने केलं. ते म्हणजे सर्वसामान्य माणसाचं कल्याण करणार्‍या कायद्याची रचना. हा कायदा ‘नेपोलियन कोड’ म्हणून ओळखला जातो. आजच्या फ्रेंच राज्यघटनेतही त्यातली अनेक मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत.


नेपोलियनच्या तुफानी घोडदौडीला पायबंद घालण्यासाठी युरोपातली नऊ लहान-मोठी राष्ट्रं ब्रिटनच्या नेतृत्वाखाली एकवटली. त्यांनी नेपोलियनचा पराभव करून त्याला फ्रान्सपासून दूर एल्बा नावाच्या बेटात कैदेत ठेवलं आणि फ्रान्सच्या सिंहासनावर पुन्हा बुर्बाँ राजघराण्याची स्थापना केली. पण नेपोलियन एल्बातून निसटला आणि बुर्बाँ राजा अठरावा लुई याला हाकलून देऊन तो पुन्हा सम्राट बनला. पण, त्याची ही राजवट फारच अल्पजीवी ठरली. ब्रिटिश सेनानी ड्यूक ऑफ वेलिंग्टन याने वॉटर्लूच्या रणमैदानावर नेपोलियनचा साफ मोड केला. या वेळेस ब्रिटनने, नेपोलियनचा कायम बंदोबस्त करायचा या हेतूने, त्याला अटलांटिक महासागरातल्या सेंट हेलेना या दूरच्या, एकाकी बेटावर कैदेत ठेवलं. १८१५ ते १८२१ अशी सहा वर्षं विजनवासात काढून अखेर नेपोलियन पोटाच्या कॅन्सरने मरण पावला. त्यावेळी तो फक्त ५१ वर्षांचा होता. अनेकांना ताबडतोब विषप्रयोगाचा संशय आला. प्रतिस्पर्ध्यावर विषप्रयोग करून त्याचा काटा काढणं, ही जागतिक राजकारणात अगदी सर्रास घडणारी गोष्ट आहे. १८२१ सालापासून अगदी आजपर्यंत नेपोलियनच्या मृत्यूबद्दल परस्परविरोधी उपपत्ती हिरिरीने मांडल्या जात आहेत. काहीचं म्हणणं असं की, त्याला खरोखरच पोटाचा कर्करोग झाला होता, तर विषप्रयोग झाला असं म्हणणार्‍यांमध्ये पुन्हा दोन पंथ आहेत. एका पंथाचं म्हणणे, त्याला ब्रिटिशांनी अन्नातून रोज ठरावीक प्रमाणात ‘आर्सेनिक’ हे विष घातलं म्हणजे ‘स्लो पॉयझनिंग’ केलं, तर दुसर्‍या पंथाचं म्हणणं, त्याच्या खोलीचा रंग ‘आर्सेनिकयुक्त’ होता. श्वासोच्छ्वासाबरोबर आपसूकच ‘आर्सेनिक’ त्याच्या शरीरात जात राहिलं.


इटलीतल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स’ या संस्थेतल्या दहा संशोधकांच्या गटाने नुकतेच, नेपोलियनच्या केसांच्या बटांवर प्रयोग केले. या केसांच्या बटा त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या कालखंडातल्या आहेत. त्यांच्या काळाची अधिकृत नोंद आहे. शिवाय, तुलनेसाठी त्यांनी, नेपोलियनची पहिली बायको सम्राज्ञी जोसेफाईन व मुलगा नेपोलियन दुसरा यांच्याही केसांच्या बटांवर प्रयोग केले. त्यातून निघालेल्या निष्कर्ष असा की, नेपोलियन सेंट हेलेनामध्ये बंदिस्त होण्यापूर्वीच्या कालखंडात त्यांच्या केसांमध्ये जेवढा ‘आर्सेनिक’चा अंश होता, तेवढाच नंतरच्या कालखंडातल्या केसांतही आढळला. विशेष म्हणजे, जोसेफाईन आणि युवराज यांच्या केसांमध्येही तेवढ्याच प्रमाणात ‘आर्सेनिक’ आढळलं. म्हणजे नेपोलियनवर विषप्रयोग झालेला नव्हता. पण यातून आता प्रश्न उभा राहतो की, शरीरात ‘आर्सेनिक’चं एवढं प्रमाण असूनही तो जीवंत कसा होता? आणि तो एकटाच नव्हे, त्याची बायको आणि मुलगासुद्धा! की जुन्या अद्भुत कादबर्‍यांमध्ये असतात तसे नेपोलियन आणि त्याची बायको, विषपुरुष व विषकन्या होते? सध्या अन्न, पाणी, हवा एवढी प्रदूषित आहे की, आपली तपासणी केली, तर आपल्या शरीरातसुद्धा वाटेल तेवढी प्राणघातक विषं सापडतील. हे ‘स्लो पॉयझनिंग’ कोण थांबवणार?

 
@@AUTHORINFO_V1@@