मुलाचे पाय पाळण्यात दिसतात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

mansa_1  H x W:



ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राज्यस्तरीय नेमबाजीच्या स्पर्धेत अवघ्या आठव्या वर्षी सुवर्णपदकावर आपले नाव कोरणार्‍या दिव्यांश जोशीच्या आयुष्याविषयी...



विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचा एक वेगळा ठसा उमटविणार्‍या भारताने क्रीडाविश्वातही आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला
. आजघडीला जागतिक दर्जाच्या विविधांगी क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची नावे सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहेत. ‘क्रिकेटवेडा देश’ म्हणून भारताची ओळख असली, तरी अन्य क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी जगासमोर आपली एक वेगळी छाप पाडली असून त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ यांसह विविध जागतिक स्पर्धांमध्ये पदके पटकावून त्यांनीही भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावली आहे. ‘क्रिकेटप्रेमींचा देश’ म्हणवणार्‍या या देशात अन्य खेळांसाठीही असे काही खेळाडू घडतात, की जे स्वतःसोबतच संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करतात. भारतातील अनेक खेळाडू जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तर पटकावितातच; मात्र या पदकविजेत्या खेळाडूंप्रमाणेच स्वतःला घडविण्यासाठी जीवापाड मेहनत करणारेही अल्पवयातच अनेक विक्रम स्वतःच्या नावावर रचतात. आठ वर्षीय दिव्यांश जोशी हा त्यांपैकीच एक म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ज्या वयात अनेक मुले मोबाईलमधील विविध गेम्स खेळण्यातच दंग असतात, त्याच वयात दिव्यांशने राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकत एक नवा विक्रम आपल्या नावावर रचला आणि सर्वांसमोर आपली एक ओळख निर्माण केली. अगदी अल्पावधीत त्याने केलेला हा पराक्रम खरोखरच कौतुकास पात्र असून येथपर्यंत पोहोचण्यास त्याने जीवापाड मेहनत केली आहे.



दिव्यांश जोशी हा मूळचा उत्तराखंडचा
. येथील पिथौरगढ जिल्ह्यात तो आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तवास आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या सीमेवर त्याचे गाव असून या इतक्या कमी वयात राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा तो आपल्या गावातील पहिला मुलगा ठरला आहे. सीमेवरील गाव असल्यामुळे आत्तापर्यंत तेथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव असून इतरांना सहजरित्या उपलब्ध होणार्‍या साधनांसाठीही येथे संघर्ष करावा लागतो. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे मोबाईलचे नेटवर्क न मिळणे, इंटरनेट वापरण्यात अडचणी यांसारख्या गैरसोयी येथे नित्याच्याच आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही दिव्यांश जोशीने लहानपणापासूनच नेमबाज होण्याचे स्वप्न बाळगले आणि ते आपल्या जोरावर पूर्णही केले. त्यामुळे त्याचे हे कर्तृत्व कौतुकास पात्र असून त्याने केलेल्या विक्रमानंतर संपूर्ण देशभरात त्याचे गोडवे गायले जात आहेत.



दिव्यांशचे वडील मनोज जोशी हे स्वतः एक अभियंते
. ‘एअर पिस्टल’च्या (नेमबाजी) या खेळात त्यांना आधीपासूनच रस होता. नोकरीतून मिळणार्‍या वेळात ते यासाठी सराव करत आपला छंद जोपासायचे. यासाठी त्यांनी एक विशेष अकादमी सुरू करत अनेकांना प्रशिक्षणही देण्याची सुरुवात केली. वडिलांप्रमाणेच दिव्यांशची मोठी बहीण यशस्वी हिलादेखील या खेळाची प्रचंड आवड. तिनेही वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित एक नवा विक्रम आपल्या नावावर करण्यात यश मिळवले आहे. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत दिव्यांशनेही अगदी लहानपणापासूनच नेमबाजीसाठी सराव करण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षणातून यासाठी तो आधी स्वतंत्र वेळ देत नेमबाजीचा सराव करू लागला. वडिलांनीही त्याला यासाठी प्रोत्साहन देत नेमबाजी हे लक्ष्य ठेवण्याचा सल्ला दिला. आपल्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, तो यासाठी कसून सराव करू लागला. नेमबाजीच्या सरावादरम्यान शालेय अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने तो भल्या पहाटे ४ वाजता उठून नेमबाजीचा सराव करी. नेमबाजीचा सराव केल्यानंतर तो शाळेत जाई. दुपारी शाळेतून आल्यानंतर काही वेळ अभ्यास करून दिवसभरातील उरलेला सर्व वेळ तो नेमबाजासीठी राखीव ठेवायचा. अशाप्रकारे त्याने या क्षेत्रात आपले करिअर घडविण्यास सुरुवात केली. ५० मीटर ‘एअर पिस्टल फायरिंग’ (नेमबाजी) राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचा पराक्रम केला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही अव्वल राहण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. बालवयातच विविध विक्रमांची नोंद करणार्‍या या दिव्यांशचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. नेमबाजीच्या प्रकारात घवघवीत यश मिळविताना दिव्यांशने शालेय शिक्षणामध्येही उत्कृष्ट कामिगिरी केली असून त्याचे कौतुक करावे तितके कमी. बालवयातच नेमबाजी स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावत स्वतःला सिद्ध करणार्‍या या दिव्यांशने ध्येय निश्चित केले आहे, ते राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे. या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून नेमबाजीच्या मुख्य भारतीय संघात प्रवेश करण्याची त्याला प्रतीक्षा आहे. यासाठी तो प्रयत्नशील असून ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकाविण्याचा त्याचा निर्धार आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून दिव्यांशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@