अमेरिकेचा राष्ट्रीय दिन आणि गुलामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020   
Total Views |


JP_1  H x W: 0


अमेरिकेमध्ये 'इक्वल जस्टिस इनिशिएटिव्ह' ही एक सामाजिक संस्था आहे. तिच्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेमध्ये गुलामगिरी पद्धती संपली नाही. आज अमेरिकेमध्ये तुरुंगात जवळ जवळ २० लाख लोक आहेत. पण, यामध्ये कृष्णवर्णीय लोकांची संख्या जास्त आहे.


ब्रिटिशांनी लादलेल्या प्रदीर्घ कालावधीच्या पारतंत्र्यातून अमेरिका मुक्त झाली. मात्र, अमेरिकेमध्ये १ फेब्रुवारी हाही स्वातंत्र्य दिनाच्या तोलामोलाचा दिन मानला जातो. अमेरिका १ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय दिन' म्हणून साजरा करते. कारण, १ फेब्रुवारी १८६५ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी राष्ट्रातर्फे जाहीर केले आणि मान्यताही दिली की, यापुढे सर्व अमेरिकन समान असतील. वर्णभेद, वंश किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अमेरिकेमध्ये कुणीही कुणाला गुलाम करू शकणार नाही. थोडक्यात, अमेरिकेमधील 'गुलामी प्रथा' कायद्याने बंद झाली. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेने हे त्यावेळच्या अमेरिकन परिस्थितीच्या अनुषंगाने धाडसी पाऊल उचलले होते. कारण, अमेरिकेमध्ये श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यामध्ये कमालीची तफावत होती. ब्रिटिशांनी अमेरिकेवर कब्जा केला आणि स्थानिक 'रेड इंडियन'ना गुलाम केले. ब्रिटिश वंशांच्या गोऱ्यांनी १६१९ मध्ये अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये आफ्रिकेतून माणसे आणली. पुढे गुलाम म्हणून ब्रिटिशांनी सातत्याने आफ्रिकी लोकांना अमेरिकेत आणले. ते वर्णाने आणि एकंदर शारीरिक ठेवणीने ब्रिटिश गोऱ्यांपेक्षा अतिशय भिन्न प्रकृतीचे. श्वेतवर्णीय श्रेष्ठ आणि कृष्णवर्णीय तुच्छ! कृष्णवर्णीय उर्फ काळे उर्फ निगर हे गुलाम बनण्यासाठीच जन्माला येतात, असा भयंकर समज तत्कालीन ब्रिटिशांनी अमेरिकेत पेरला. तो गैरसमज स्वतंत्र अमेरिकेमध्ये कायम राहिला. त्यातूनच श्वेत आणि कृष्णवर्णीय यांचा संघर्ष विकोपाला पोहोचला.

 

अमेरिकेची एक राष्ट्र म्हणून जडणघडण होण्यात मोठा धोका निर्माण झाला. स्वातंत्र्य लढा लढलेल्या अमेरिकेमध्ये अर्धी जनता केवळ वर्ण काळा म्हणून गुलामीचे, बंधकाचे जीणे जगत होती. हे स्वातंत्र्याचे गीत गाणाऱ्या अमेरिकेसाठी लांच्छनास्पदच होते. त्यामुळे १८६५ साली अब्राहम लिंकन यांनी गुलामी नष्ट करण्यासाठीचे स्तुत्य पाऊल उचलले. कायद्याने अमेरिकेतील गुलामी नष्ट झाली. पण, लिंकनला त्यांच्या या कृत्यासाठी जीव गमवावा लागला. १८६५ सालीच लिंकन यांचा खून झाला. तर अशी ही अमेरिकेच्या राष्ट्रीय दिनाची कहाणी. सध्या जगभरात अमेरिका मानवी हक्कासाठी या ना त्या देशात काम करते. पण, अमेरिकेमधील वर्णभेद, वंशभेद संपला आहे का? अमेरिकेमध्ये 'इक्वल जस्टिस इनिशिएटिव्ह' ही एक सामाजिक संस्था आहे. तिच्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेमध्ये गुलामगिरी पद्धती संपली नाही. आज अमेरिकेमध्ये तुरुंगात जवळ जवळ २० लाख लोक आहेत. पण, यामध्ये कृष्णवर्णीय लोकांची संख्या जास्त आहे. तीनपैकी एका अमेरिकन कृष्णवर्णीयाला वाटते की, आपल्याला विनाकारण तुरुंगात डांबू शकतात. तसेच एखादा अपराध घडल्यास अमेरिकन श्वेतवर्णीयांपेक्षा अमेरिकन कृष्णवर्णीयास सजा होण्याची शक्यता सहा पट जास्त आहे. तसेच 'राष्ट्रीय दिन' अस्तित्वात येण्यापूर्वी, उत्तर अमेरिका गुलामी पद्धतीच्या विरोधात होती, तर दक्षिण अमेरिका गुलामीच्या समर्थनार्थ होती. गुलामीचे समर्थन करणाऱ्यांचे केंद्र होते 'सिव्हिल वॉर कॉन्फेडेरेट संघ'. आज कायद्याने अमेरिकेमध्ये गुलामी बंद आहे. मात्र, आजही अमेरिकेमध्ये 'कॉन्फेडेरेट मेमोरिअल दिन' साजरा केला जातो आणि तोही सरकारच्या सहकार्याने.

 

'सीएनएन'ने मागे अमेरिकेमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ४९ टक्के लोकांनी अमेरिकेमध्ये 'वर्णभेद' आणि 'वंशवाद' ही गंभीर समस्या आहे असे सांगितले होते. असो, आपल्याकडे बालकांना चिऊकाऊची बडबडगीते शिकवली जातात. पण, अमेरिकेमध्ये आजही नर्सरीमध्ये प्रमुख बालगीत आहे

 

इनी मीनी मायनी मो

कॅच अ निगर बाई द टो

 

'गालोप' या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेमध्ये वंशभेद, वर्णभेद प्रवृत्तीमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली. कारण, तेथील अमेरिकेतील बहुसंख्य श्वेतवर्णीयांचे मत होते की, हा आंतरराष्ट्रीय कट आहे. शुद्ध श्वेतवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याएवजी बराक ओबामासारखी कृष्णवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होऊच कशी शकते? यावरून एक मात्र वाटते की, कायद्याचे महत्त्व असतेच, पण जोपर्यंत कायदा माणसाच्या संवेदनशीलतेची नीती बनत नाही, तोपर्यंत कायदा कधीही सर्वार्थाने लोकाभिमुख होतच नाही. गुलामगिरी प्रथेविरूद्ध अमेरिकेचा राष्ट्रीय दिन, हे याचे उत्तम उदाहरण आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@