गुवाहाटी : आसाममध्ये बंदी घातलेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या (एनडीएफबी) चारही गटातील १६१५ नक्षलवाद्यांनी गुरुवारी आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करताना १७८ शस्त्रे आणि स्फोटकेही जमा केली आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशिवाय राज्याचे अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे देखील उपस्थित होते. यावेळी सीएम सोनोवाल म्हणाले, "बोडो करारात ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आसामला ईशान्येकडील विकसित राज्य बनवावे लागेल. २७जानेवारी रोजी आसामच्या बंदी घातलेल्या ८ संघटनांमधील ६४४ नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे निकामी केली.”
विशेष म्हणजे, नुकताच केंद्र सरकारने आसामच्या बंदी घातलेल्या नक्षलवादी गट 'नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड'सह (एनडीएफबी) त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार एनडीएफबी किंगपिन बी. सौरैगववार यांच्यासह सर्व उग्रवादी हिंसक कारवाया थांबवून आणि सरकारशी शांततापूर्ण मार्गाने चर्चेत सामील होईल. या करारामध्ये पुढील तीन वर्षांसाठी बोडोलँड क्षेत्राच्या विकासासाठी १५००कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याचेही सरकारने ठरविले आहे. त्याचबरोबर याभागात केंद्रीय विद्यापीठासह अनेक शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था उघडण्याचा विश्वासही राज्यसरकारने दिला आहे.