असे घडले 'ओरॅकल'चे लॅरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |



लॉरेन्स एलिसन हे कोणत्याही बड्या उद्योगपतींचे चिरंजीव नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील लॉरेन्स यांनी जगातील द्वितीय क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास कसा केला, हे जाणू घेऊया...


आजच्या घडीला जगात अनेक महत्त्वपूर्ण कामे उरकण्यासाठी संगणकांचा वापर केला जातो. जगातील संगणकांची एकूण संख्या सांगणे हे कठीण कामांपैकी एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगात आज अब्जाधीश संगणक असून विविध प्रकारच्या आज्ञावलीच्या (सॉफ्टवेअर) आधारे अनेक कामे सोपी झाली आहेत. विविध प्रकारचे सॉफ्टवेअर्स जतन करण्यासाठी 'डेटाबेस' ही प्रणाली आवश्यक असते. डेटाबेस तयार करण्यात जगभरात आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ओरॅकल' कंपनीची स्थापनालॉरेन्स जोसेफ एलिसन यांनी केली. ही कंपनी जगभरात प्रचलित असून लॉरेन्स हे एकेकाळी जगातील द्वितीय क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले. लॉरेन्स हे कोणत्याही बड्या उद्योगपतींचे चिरंजीव नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले लॉरेन्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे झाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

नाव जरी 'लॉरेन्स' असले तरीही त्यांना 'लॅरी' या नावानेच सर्वत्र संबोधले जाते. १७ ऑगस्ट, १९४४ रोजी त्यांचा जन्म अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को या शहरात झाला. आई आणि वडिलांचा संसार फार काळ टिकू न शकल्याने शिकागो येथील त्यांच्या आत्या लिलियान यांनीच लॅरींचे पालनपोषण केले. शिकागो येथील शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. मात्र, शिक्षणात त्यांना फारसा रस नव्हता. तांत्रिक बाबींची त्यांना आवड होती. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान आत्या लिलियान यांचे निधन झाले आणि त्यांचे शिक्षणही अर्ध्यावरच थांबले. आत्याच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढे न शिकवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना नोकरी करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अनेक तांत्रिक बाबींची ओढ असलेल्या लॅरी यांनी याच क्षेत्रात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. १९६० च्या दशकात अमेरिकेत संगणकाचा बोलबाला होता. अनेक बड्या कंपन्यांमध्ये 'प्रोग्रॅमर्स'ची गरज होती. त्यामुळे लॅरी यांना एका बँकेत नोकरी मिळाली. बँकेची नोकरी उत्तम प्रकारे करत त्यांनी चांगला पैसा कमावला. तारुण्यातच त्यांनी सॅन फ्रान्सिस्को शहरात स्वतःचे घर, दुचाकी, चारचाकी आदी घेत आपले जीवन सावरले. आई-वडिलांचा आधार नसतानाही वयाच्या २५व्या वर्षी लॅरी सॅन फ्रान्सिस्को शहरात स्थिरावले. मात्र, जगावेगळे काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लॅरी यांना स्वस्थ बसवतच नव्हते. बँकेच्या नोकरीनंतर मिळणाऱ्या इतर वेळेतून त्यांनी 'डेटाबेस'चे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. फक्त संगणक असून चालत नाही, तर माहिती वर्षानुवर्षे जतन करून ठेवण्यासाठी डेटाबेस प्रणालीची आवश्यकता आहे, हे ओळखून त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला तयार केलेले डेटाबेस त्यांनी बँकेत वापरले. हे डेटाबेस व्यवस्थितरीत्या सुरू झाल्यानंतर अमेरिकेच्या 'सीआयए' या गुप्तचर संस्थेने लॅरी यांचे डेटाबेस वापरण्यास सुरुवात केली.

 

संगणक आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध आज्ञावली तयार करणाऱ्या आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या कंपन्यांनी डेटाबेस तयार करण्याआधीच लॅरी यांनी डेटाबेसची प्रणाली वापरात आणली होती. येथूनच लॅरी हे जगभरात प्रसिद्ध होऊ लागले. विविध बँका आणि कार्यालयांमध्ये त्यांनी तयार केलेल्या डेटाबेस प्रणालीचा वापर होऊ लागला. लॅरी यांनी तयार केलेली ही प्रणाली जगभरात प्रसिद्ध झाली. जगभरातून याची मागणी होऊ लागल्यानंतर त्यासाठी त्यांनी 'ओरॅकल' ही कंपनी स्थापन केली. 'ओरॅकल' कंपनीचे डेटाबेस जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर लॅरी यांचे नशीबच फुलले. मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यानंतर त्यांनी जगभरातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने 'ओरॅकल' कंपनीचा विस्तार वाढविण्याचा निर्णय घेतला. १९८६ साली त्यांनी या कंपनीचे समभाग भांडवली बाजारात विकण्यास सुरुवात केली आणि कंपनीने जवळपास ३.१ कोटी डॉलर्सची कमाई केली. 'ओरॅकल'नंतर अनेक कंपन्यांनी 'डेटाबेस' तयार केले पण ते ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकले नाहीत. नामांकित कंपन्यांनीही डेटाबेस बनवण्यासाठी गुंतवणूक केली. मात्र, 'ओरॅकल'पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. कंपनीची ही यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहिली आणि १९९६ साली कंपनीने सहा कोटी डॉलर्सची कमाई करण्याचा टप्पाही गाठला. जागतिक स्तरावर बड्या कंपन्यांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाऊ लागले. आत्तापर्यंत कंपनीने सुमारे २७०० कोटी डॉलर्सचा व्यवसाय केला असून 'फोर्ब्स' या मासिकाच्या यादीत एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी ते विराजमान झाले. आई-वडिलांच्या मायेचे छत्र लहानपणीच हरपलेल्या लॅरी यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले खरे, मात्र स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी श्रीमंत व्यक्ती होण्याचे स्वप्न बाळगले आणि ते पूर्णही केले.

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@