गोष्ट एका संघर्षमय जीवनाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |



विलक्षण परिस्थितीतही केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर 'वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जळगावमधील किशोर सूर्यवंशीच्या आयुष्याची ही संघर्षमय कहाणी...


आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक वेगळे, स्वत:चे असे एक महत्त्व. यांपैकी एखाद्या अवयवाचे काम जरी बिघडले, तर मानवाला दैनंदिन जगणे असह्य होते. शरीरातील मूत्रपिंडासारखा अत्यंत महत्त्वाचा भाग निकामी झाल्यानंतर मानवाच्या जगण्याच्या आशाच संपुष्टात येतात. मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणानंतर आयुष्याच्या नव्या 'इनिंग'ची सुरुवात होते खरी. मात्र, प्रत्यारोपणापूर्वीचे आयुष्य आणि नंतरची 'इनिंग' यात बरीच तफावत असल्याचे अनेकांना जाणवते. मात्र, अशा विलक्षण परिस्थितीतही विविध प्रकारचे शारीरिक कष्ट करून 'वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स'मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या जळगावच्या किशोर सूर्यवंशी यांच्या आयुष्याचा प्रवासही असाच संघर्षमय राहिला आहे. मूळचे जळगाव येथील रहिवासी असणारे किशोर सूर्यवंशी यांचा जन्म १९८१ साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. किशोर यांचे वडील विश्वनाथ सूर्यवंशी हे जळगावातच एका खासगी कंपनीत नोकरी करायचे. आई इंदू सूर्यवंशी या गृहिणी असून किशोर यांना एकूण सहा भावंडे. जळगावमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी म्हणजेच २००५ साली पदव्युत्तर शिक्षणसाठी अर्ज केला. 'कटऑफ लिस्ट'मध्ये नंबर लागल्यानंतरही ते पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकले नाहीत. खरं तर येथूनच त्यांच्या जीवनाचा संघर्ष सुरू झाला. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षीच त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. तारुण्यात तब्येत सुदृढ होण्याऐवजी दिवसेंदिवस ढासळू लागली. डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यानंतर किशोर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निदान झाले. याबाबत अधिक तपास केला असता, त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळले आणि जीवनातील पुढील दिशाच दिसेनाशा झाल्या. डॉक्टरांनी डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण असे दोन पर्याय किशोर यांच्यासमोर ठेवले.

 

डायलिसिस करत आयुष्य काढणे हा पर्याय शक्य नव्हता. त्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय त्यांनी निवडला. त्याकाळात अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्यामुळे मूत्रपिंड मिळणे फार कठीण. इतरत्र कोठेही मूत्रपिंडांची सोय होत नसल्याने मोठ्या बहिणीनेच यासाठी पुढाकार घेत किशोर यांना स्वतःचे मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. आजही त्यांची बहीण एकाच किडनीवर जगत असून यानंतर त्यांनी लग्नही केले नाही. ९ ऑगस्ट, २००७ साली किशोर यांची मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागताच आता पुढील आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शारीरिक कष्टाची कामे फारशी जमत नसल्याने सुमारे वर्षभराच्या काळात त्यांनी वाचनावर भर दिला. गिटार वादनाचे प्रशिक्षण घेत संगीत कलाही अवगत केली. त्यानंतर आयुष्य खुलून जगण्याचा निर्धार करत मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी त्यांनी बहिणीच्या नावाने 'छाया किडनी फाऊंडेशन' या संस्थेची स्थापना केली. शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासही त्यांनी सुरुवात केली. अवयवदानाबाबत लोकांना जास्त माहिती नसल्याने ते याबाबत जनजागृती करू लागले. हे सर्व करताना आर्थिक चणचण जाणवत असूनही त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे आपल्यासारख्याच एखाद्या तरुणीशी विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १ जानेवारी, २०१२ रोजी त्यांनी आरती यांच्याशी लग्न केले. आरती आणि किशोर यांच्या लग्नाची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नेही घेतली. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले भारतातील पहिले दाम्पत्य म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. आयुष्य स्थिरावत आहे, असे दिसत असतानाच त्यांच्या पत्नी आरती यांचे काही महिन्यांनी निधन झाले. परंतु, मनातील दुःख बाजूला सारत त्यांनी आयुष्याची घडी पुन्हा सावरण्याचा निर्णय घेतला. विविध खेळांचीही तयारी सुरू केली.

 

किशोर यांनी पुढे धावणे आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये जास्त मेहनत घेतली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी २०१७ मध्ये १०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक, तर २०१८ मध्ये ५० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. गेल्या पाच वर्षांपासून किशोर 'वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स'मध्ये भाग घेत आहेत. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना जगण्याची नवी ऊर्मी मिळावी यासाठी 'वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स'मध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. इंग्लंडमध्ये १९७८ साली ही स्पर्धा जागतिक पातळीवर पहिल्यांदा खेळवण्यात आली. त्यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित होते. ४ ते ८० वर्षं वयोगटातील खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. अवयवदाते आणि ज्यांना अवयव मिळाले आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना यामध्ये सहभाग घेता येतो. यंदा भारताकडून या स्पर्धेत १४ जणांनी सहभाग घेतला होता. यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान किशोर सूर्यवंशी यांना मिळाला. यंदा या स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरू असून किशोर सुवर्णपदक पटकावतील अशी आशा तमाम भारतीयांना आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर शारीरिक कष्ट त्रासदायक वाटणाऱ्या किशोर यांनी प्रवाहाच्या विरोधात जात स्वतःचे आयुष्य घडविले. किशोर यांच्या शौर्याला सलाम!

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@